दम्याचा त्रास? नका करू दुर्लक्ष!

दम्याचा त्रास? नका करू दुर्लक्ष!
Published on
Updated on

सध्या आधुनिक जीवनशैलीमुळे आणि वाढत्या शहरीकरणामुळे श्वसनविकारांचे प्रमाण वाढले आहे. वाढता उन्हाळा, हवेचे प्रदूषण यामुळे जीव नकोसा होतो. उष्णतेच्या त्रासापासून बचावासाठी अनेक कार्यालयात वातानुकूलित यंत्र बसवून वातावरण सुसह्य करण्याचा प्रयत्न केलेला असतो; पण कामाच्या ठिकाणी अनेक घटकांमुळे श्वसनविकार होऊ शकतात. त्यात एसीत काम करताना अस्थमा विकार असलेल्यांनी तर स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

अलीकडे वायू प्रदूषण ही जगभरातील सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या बनली आहे. विशेषतः भारतात याचे प्रमाण सध्या वाढताना दिसून येत आहे. ज्यात जगातील वीस प्रदूषित शहरांपैकी तीन शहरे भारतातील आहेत आणि जेथे वायू प्रदूषणामुळे दरवर्षी दहा लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. कोणत्याही व्यक्तीला कामाशी संबंधित ठिकाणी दम्याचा त्रास आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याच्या दम्याची लक्षणं दिसून आल्यास तातडीने वैद्यकीय चाचणी करणे गरजेचे ठरते.

वारंवार खोकला, छाती भरून येणे, धाप लागणे आणि श्वास घेताना त्रास जाणवणे ही दम्याची प्राथमिक लक्षणे आहेत. दगड आणि कोळसा खाणीत काम करणार्‍या माणसांपासून कापड गिरण्या, इलेक्ट्रिक रिपेअर, औषध उद्योग, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचार्‍यांना फुफ्फुस रोगांना सामोरे जावे लागू शकते. सिलिकॉन, अ‍ॅस्बेस्टॉस, कापडाचे तंतू, आदी घटक सातत्याने श्वसनात आल्याने श्वसनसंस्थेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. सेंट्रलाईज्ड पद्धतीच्या एसीमुळे अनेकदा कर्मचार्‍यांना श्वसनविकार मोठ्या प्रमाणात होतात. अशा कार्यालयातील अनेकांना सर्दी होणे, शिंका येणे, खोकला येणे, डोके दुखणे आणि श्वसनविकाराशी संबंधित दम्याचा वारंवार त्रास होतो.

व्यावसायिक दमा 10% ते 25% दमा असलेल्या व्यक्तींना प्रभावित करतो. ऑक्युपेशनल अस्थमा हा एक प्रकारचा दमा आहे जो इनहेल्ड इरिटेंट्सच्या व्यावसायिक कारणांमुळे होतो. व्यावसायिक दमा हा वारंवार येण्याजोगा असतो.
दमा हा आजार अनुवंशिकतेने होऊ शकतो. जर कुटुंबात कोणाला दमा असेल तर पुढच्या पिढीलाही दमा होऊ शकतो. काही रासायनिक प्रक्रिया करणार्‍या उद्योगांमध्ये काम करणार्‍यांना तेथील वायू आणि रासायनिक द्रव्ये शरीरात गेल्यामुळे दमा होऊ शकतो. दमट हवामान, ढगाळ वातावरण यामुळेही दमा असलेल्या लोकांना त्रास होतो.
म्हणूनच कामाच्या ठिकाणी अ‍ॅलर्जी आणि त्रासदायक घटकांचा संपर्क कमी करण्यासाठी, सुरक्षित आणि निरोगी कामाचे वातावरण तयार करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. योग्य फेस मास्क, एअर फिल्टर आणि योग्य व्हेंटिलेशनचा वापर, दम्याचे लवकर निदान करण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी आणि रोजगारापूर्वीची तपासणी यामुळे दम्याचा अटकाव केला जाऊ शकतो.

प्राणायाम, ध्यानधारणा, योगामुळे आणि मनशांतीच्या व्यायामामुळे दमा नियंत्रित होऊ शकतो. श्वास रोखून धरण्याच्या पद्धती मानसिक तणावावर मात करतात. त्यामुळे दमा असणार्‍या रुग्णाने घाबरण्याचे कारण नाही. दम्याचे लवकर निदान झाल्यास लवकर उपचार होऊ शकतात. त्यामुळे त्वरित डॉक्टरांना संपर्क साधणे आणि लवकरात लवकर उपचार करणे, योग्य ठरेल. आपले वजन नियंत्रित ठेवणे, धूम—पान, मद्यपान यापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. जीवनशैलीत बदल करून आपल्याला दमा नियंत्रित आणता येतो.

अशी घ्या काळजी

  • कामाच्या ठिकाणच्या व्यक्तींची नियमित तपासणी करावी.
  • आजारी असणार्‍या व्यक्तींनी शक्यतो एसी किंवा कूलरचा वापर टाळावा.
  • आवश्यक उपचार घेऊन आपला आजार पसरणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • इतर व्यक्तींनीही मास्क, एअर फिल्टर, इनहेलर आदी आवश्यक गोष्टींचा वापर गरजेनुसार करावा.
  • नियमित स्वच्छता ठेवून आजारी व्यक्तींपासून सुरक्षित अंतर ठेवावे.
  • पथ्ये, औषधे व दक्षता याद्वारे दमा आटोक्यात ठेवू शकतो.
 डॉ. चेतन जैन

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news