डोळे कोरडे पडल्यास…

डोळे कोरडे पडल्यास…
Published on
Updated on

वास्तविक, हिवाळा हा आरोग्यासाठी चांगला मानला जातो. परंतु, काही आरोग्य समस्या याच मोसमात होतात. यापैकीच एक डोळे कोरडे पडणे.

जेव्हा डोळ्यात अश्रू निर्माण करणार्‍या ग्रंथी या पुरेशा प्रमाणात पाणी निर्माण करू शकत नाहीत, तेव्हा ड्राय आईजचा प्रॉब्लेम निर्माण होतो. ही समस्या हिवाळ्यात अधिक होते. ही समस्या कनेक्टिव्ह टिशूच्या डिसऑर्डरमुळेदेखील होते.

समस्येचे कारण : हिवाळ्यात डोळे कोरडे पडण्यामागेदेखील अनेक कारणे असू शकतात. व्हिटॅमिन-सीची कमतरता, महिलांना मेनोपॉज आल्यानंतर, काही औषधांचे जसे की सल्फा ग्रुप आदींची अ‍ॅलर्जी किंवा रिअ‍ॅक्शन होणे, अ‍ॅलर्जी असणे, काही आजारपण जसे की थॉयराईड, दीर्घकाळापर्यंत संगणकावर पापणी न लवता काम करणे, सलग टीव्ही, मोबाईल पाहणे तसेच प्रदूषणांमुळे देखील हा त्रास होऊ शकतो.

समस्येची लक्षणे : ड्राय आईजची समस्याग्रस्त लोकांत अनेक प्रकारची लक्षणे दिसू शकतात. जसे डोळे कोरडे पडणे, डोळ्याला खाज सुटणे, जळजळ होणे, प्रत्येक वेळी डोळे चोळणे, डोळ्यात कचरा गेल्याचा भास होणे, डोळ्यातून अकारण पाणी येणे, डोळे थकणे आदी.

उपचाराचे माध्यम : ड्राय आईजचे उपचार म्हणून डोळे चांगले राहण्यासाठी अनेक ड्रॉप उपलब्ध आहेत. मात्र, हा त्रास थांबवण्यासाठी एक पंकटल प्लग हा पर्यायदेखील उपलब्ध आहे. हे खूपच लहान डिव्हाईस प्लग असून, ते अश्रूंचे स्राव रोखतात. हे अकारण वाहणार्‍या अश्रूंना थांबवण्यासाठी मदत करतात. या उपकरणामुळे डोळ्यात ओलसरपणा राहतो. परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या उपकरणाचा वापर करू नये. त्यांच्या निर्देशानुसार वापर करावा.

बचावाचे उपाय :

* डोळ्यातील कोरडेपणा घालवण्यासाठी काही घरगुती उपायदेखील करता येतील.
* डोळ्यांना थंड वार्‍याच्या संपर्कात येऊ देऊ नये.
* हिवाळ्यात गॉगल किंवा चष्मा घालूनच घराबाहेर पडावे.
* संगणकावर काम करताना पापण्यांची हालचाल सुरूच ठेवावी.
* कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करत असाल आणि डोळे कोरडे पडत असतील तर नेत्ररोगतज्ज्ञांशी सल्ला घ्यावा.
* हेअर ड्रायर, कार हिटर, एसी ब्लोअर, पंख्यासमोर डोळ्यांना आणू नये.
* डोळ्याला खाज सुटल्यास किंवा जळजळ होत असेल तर त्याला घासण्याऐवजी डोळ्यावर थंड पाण्याचा मारा करावा.

डॉ. संतोष काळे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news