

आपण दिवसभर कामात इतके व्यग्र असतो की संध्याकाळी घरी आल्यावर पायावर उभे राहून काही करायची क्षमता राहत नाही. दिवसभर उभ्याचे काम असेल तेव्हा संध्याकाळी पाय दुखतात, सुजतात. अशा वेळी पायास आरामाची अतोनात गरज असते त्यामुळे उभ्याने काही काम करण्याचा विचारही मनात आणता येत नाही. पायाच्या या दुखण्यावर, सुजेवर काही नैसर्गिक उपचार करता येतात.
पायावरील नियमित सूज आणि आरोग्याचे धोके –
आपल्या पायाला सूज येत असेल तर त्याठिकाणी बोटाने दाब द्या. दाब दिल्यावर खड्डा किंवा खळीसारखे तयार होईल. बोट काढल्यावर काही सेकंदभर हा खड्डा तसाच राहत असेल तर पायाला आलेली ही सूज काही आजारांचे पूर्वलक्षण असू शकते. हृदय, यकृत किंवा मूत्रपिंडाशी निगडित काही आजारांमध्ये अशा प्रकाराची सूज पायाला आलेली असू शकते. त्यामुळे अशा प्रकारे पायावरील सुजेवर बोटाने दाबल्यावर खड्डा पडत असेल तर पहिल्यांदा वैद्यकीय सल्ला घ्यावा.
तसेच कोणत्याही एकाच पायावर सतत सूज येत असेल तरीही वैद्यकीय सल्ला घेण्याची गरज आहे. कारण, काही वेळा पायातील नसेमध्ये रक्ताची गाठ झाल्याने रक्तपुरवठ्यात अडथळा आलेला असतो. त्यामुळेच पायावरही सूज आलेली असते.
पायावर येणारी सूज तसेच श्वसनास त्रास, छातीत दुखणे, ताप, त्वचा काळवंडणे अशी काही लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय तपासण्या करून घ्यावात. अर्थात वरीलपैकी सर्व गोष्टीं नकारात्मक असतील तर कामाच्या स्वरुपामुळे सुजणार्या पायांवर आपण नैसर्गिक उपायाने आराम मिळवू शकतो.
डॉ. मनोज कुंभार