आय ड्रॉप कसे वापरायचे, याबद्दल माहिती असणे आवश्यक

आय ड्रॉप कसे वापरायचे, याबद्दल माहिती असणे आवश्यक

डोळ्यांत औषधाचे थेंब सोडण्याची वेळ प्रत्येकावर कधी ना कधी येतेच. डोळ्यांच्या अनेक समस्यांमध्ये डॉक्टर संबंधिताला 'आय ड्रॉप' देतात. परंतुु, बर्‍याच वेळा ड्रॉप डोळ्यात कसे सोडायचे, याबद्दल माहिती नसल्याने ते प्रभावी ठरत नाहीत. त्यामुळे 'आय ड्रॉप' कसे वापरायचे, याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

डोळ्यांच्या अनेक समस्यांच्या वेळी डॉक्टर डोळ्यांत औषधाचे थेंब (आय ड्रॉप) टाकण्याचा सल्ला देतात. डोळ्यांत संसर्ग, किरकोळ दुखापत किंवा ग्लूकोमा, ड्राय आय अशा समस्यांच्या वेळीही लोक आय ड्रॉपचा वापर करतात.

अर्थात, योग्य परिणाम साधायचा असल्यास आय ड्रॉपचा वापर करण्याची आपली पद्धत योग्य असायला हवी. आय ड्रॉप योग्य प्रकारे डोळ्यांत घातले, तरच ते आत चांगल्या प्रकारे शोषले जातात आणि परिणामकारक ठरतात.

डोळ्यात ड्रॉप टाकण्यापूर्वी संसर्गाचा धोका टाळण्यासाठी आपले हात साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुऊन घ्यावेत. आय ड्रॉप डोळ्यांत टाकण्याची योग्य पद्धत म्हणजे तुम्ही पाठीवर झोपा आणि डोके मागील बाजूस झुकवा.

त्यानंतर बोटाने डोळ्याची खालची पापणी खालील बाजूस ओढा. त्याच भागात आय ड्रॉप सोडायचा असतो. आय ड्रॉपची बाटली डोळ्याच्या वर धरा आणि ड्रॉपर खालच्या दिशेला वळवा.

ड्रॉपरचे टोक आपल्या डोळ्याला न टेकू देता जितके शक्य आहे तितके डोळ्याजवळ ठेवा. आपले मनगट कपाळावर ठेवून ड्रॉप डोळ्यात टाकणार्‍या हाताला आधार द्या, जेणेकरून ड्रॉप टाकणारा हात थरथरणार नाही.

ड्रॉपची बाटली अशा प्रकारे दाबा जेणेकरून एकच थेंब खालच्या पापणीच्या आतील भागावर पडेल. आता डोळा हळुवारपणे बंद करा. यावेळी पापण्यांची उघडझाप, बुब्बुळांची हालचाल किंवा पापण्या घट्ट मिटणे टाळा. जेव्हा डोळा बंद असेल तेव्हा डोळ्यांच्या आतील कोपर्‍यावर हलका दाब देण्यासाठी एका बोटाचा वापर करा.

ही प्रक्रिया आय ड्रॉप तुमच्या नाकपुडीत, तोंडात किंवा घशात जाऊ देत नाही. तुम्हाला त्याच डोळ्यात पुन्हा दुसरा ड्रॉप टाकायचा असेल, तर पहिला थेंब टाकल्यानंतर पाच ते दहा मिनिटे प्रतीक्षा करा आणि मग दुसरा ड्रॉप सोडा.

डोळ्यांसाठी वेगवेगळ्या दोन प्रकारची औषधे लिहून दिली असतील, तर त्याचा क्रम योग्य ठेवावा. तुम्ही 'आय सोल्यूशन' आणि 'आय सस्पेन्शन' अशा दोहोंचा वापर करीत असाल, तर आधी सोल्यूशन डोळ्यांत सोडा आणि नंतर सस्पेन्शन.

याखेरीज तुम्ही जर आय ड्रॉप आणि आय ऑइन्टमेन्टचा वापर करीत असाल, तर आधी आय ड्रॉप डोळ्यांत सोडला पाहिजे आणि नंतर दहा मिनिटांनी ऑइन्टमेन्टचा वापर केला पाहिजे.

जर तुम्हाला स्वतःला डोळ्यात ड्रॉप सोडणे अवघड जात असेल, तर कुटुंबातील एखाद्या सदस्याची मदत जरूर घ्यावी. डोळ्यांच्या आसपास औषधाचे थेंब पडल्यास ते पुसण्यासाठी स्वच्छ टिश्यू पेपरचा वापर करावा.

आय ड्रॉपच्या बाटलीचे झाकण उघडण्यापूर्वी नेहमी हात साबणाने स्वच्छ धुवावेत. अन्यथा डोळ्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. बाटली उघडल्यानंतर बाटलीवर लिहिलेली 'एक्सपायरी डेट' जरूर तपासून पाहावी.

लेबलवर लिहिलेल्या सूचनांचे पालन करावे. तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करीत असाल, तर आय ड्रॉप डोळ्यात सोडल्यानंतर कमीत कमी पंधरा मिनिटे प्रतीक्षा करा.

आय ड्रॉप सोडल्यानंतर डोळे जळजळणे किंवा टोचल्यासारखे वाटणे स्वाभाविक आहे; पण डोळ्यांना सूज आल्यास मात्र तातडीने डॉक्टरांना भेटावे. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.

डॉ. मनोज कुंभार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news