

आजच्या धावपळीच्या आणि सोशल मीडियाच्या जगात प्रत्येकजण फिटनेस आणि आकर्षक शरीरयष्टीसाठी प्रयत्न करत आहे. वजन कमी करण्यासाठी आणि 'स्लिम-ट्रिम' दिसण्यासाठी अनेकजण कठोर डाएट प्लॅनचा अवलंब करतात. पण तुम्ही जो डाएट फॉलो करत आहात, तो तुमच्या शरीरासाठी खरोखरच योग्य आहे का? अनेकदा माहितीच्या अभावामुळे निवडलेला डाएट प्लॅन फायद्याऐवजी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.
बॉलिवूडमधील करिना कपूरसारख्या अनेक सेलिब्रिटींना मार्गदर्शन करणाऱ्या प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी चुकीचा डाएट ओळखण्याच्या काही सोप्या पद्धती सांगितल्या आहेत. त्यांच्या मते, आहार हा केवळ वजन कमी करणारा नसावा, तर तो पौष्टिक, चविष्ट आणि तुमच्या जीवनशैलीला अनुकूल असावा. चला तर मग जाणून घेऊया, तुमचा डाएट प्लॅन चुकीचा असल्याची लक्षणे कोणती.
ऋजुता दिवेकर नेहमीच संतुलित आणि पारंपरिक आहारावर भर देतात. त्यांच्या मते, जर तुमचा डाएट प्लॅन तुम्हाला मानसिक किंवा शारीरिक त्रास देत असेल, तर तो तुमच्यासाठी योग्य नाही. त्यांनी चुकीचा डाएट ओळखण्यासाठी काही सोप्या पद्धती सांगितल्या आहेत.
जेवणात नावीन्य, पण घरातलं काहीच नाही: तुमच्या डाएटमध्ये फक्त असेच पदार्थ आहेत का, ज्यांना स्थानिक भाषेत काही नावच नाही? (उदा. क्विनोआ, अव्हाकॅडो, ग्रीक योगर्ट). जर तुमच्या जेवणात घरातील पदार्थांऐवजी केवळ बाहेरून मागवलेल्या किंवा 'क्लाउड किचन'मधील पदार्थांचाच समावेश असेल, तर हा तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. चांगला आहार तोच, जो तुमच्या स्वयंपाकघरात सहज बनवता येतो.
जेवणापेक्षा सप्लिमेंट्सवर जास्त भर: तुमच्या आहारात नैसर्गिक अन्नापेक्षा सप्लिमेंट्सच्या गोळ्या जास्त आहेत का? जसे की, फॅट्ससाठी एक गोळी, फायबरसाठी दुसरी, प्रोटीनसाठी पावडर आणि शांत झोपेसाठी आणखी एक सप्लिमेंट. जर तुमचा आहार असा असेल, तर तो तुमच्या शरीरात आणि मनात गोंधळ निर्माण करण्याशिवाय दुसरे काहीही करणार नाही.
जेवताना अपराधीपणाची भावना: आहारामुळे तुमच्या मनाची शांती हिरावली आहे का? जेवताना 'दुसरी पोळी खाऊ की नको?', 'भाजी खावी की नाही?', 'आईस्क्रीम खाल्लं तर चालेल का?' असे प्रश्न सतत मनात येत असतील आणि तुम्ही जेवणाचा आनंद घेऊ शकत नसाल, तर तुमचा डाएट प्लॅन चुकीचा आहे. आहार हा ताण वाढवणारा नव्हे, तर आनंद देणारा असावा.
अयोग्य आहार पद्धतीचे दुष्परिणाम केवळ मानसिकच नव्हे, तर शारीरिक आरोग्यावरही दिसून येतात. खालील लक्षणे तुमच्यात दिसत असतील, तर त्वरित सावध व्हा:
सतत होणाऱ्या दुखापती: शरीरात पोषक तत्वांची कमतरता असल्यास स्नायू आणि हाडे कमकुवत होतात, ज्यामुळे किरकोळ दुखापतींचे प्रमाण वाढते.
अनियमित मासिक पाळी: महिलांमध्ये चुकीच्या डाएटमुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते, ज्यामुळे मासिक पाळी अनियमित होते किंवा रक्तस्रावाच्या प्रवाहात बदल होतो.
अपुरी झोप आणि भूक: रात्री भुकेमुळे झोप लागत नाही का? किंवा झोप येण्यासाठी तुम्ही सतत सोशल मीडियावर इतरांचे 'वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशन' पाहत असता का? ही दोन्ही लक्षणे तुमचा आहार योग्य नसल्याचे दर्शवतात.
ऋजुता दिवेकर सांगतात की, वजन कमी करण्याची प्रक्रिया ही हळू, स्थिर आणि शाश्वत (Slow, Steady, and Sustainable) असावी. डाएट प्लॅन असा निवडा जो तुमच्या जीवनशैलीला अनुकूल असेल आणि तुम्ही तो आयुष्यभर सहज पाळू शकाल. केवळ तीन महिन्यांत बारीक होण्याचे ध्येय ठेवण्याऐवजी कायमस्वरूपी निरोगी, तंदुरुस्त आणि आनंदी राहण्यावर लक्ष केंद्रित करा. कारण खरा फिटनेस हा केवळ वजनात नसून, तुमच्या एकूण शारीरिक आणि मानसिक आरोग्यात दडलेला आहे.