अपूर्वाला मिळाला होता वजन कमी करण्याचा सल्ला : 10 वर्षांचा चंदेरी प्रवास उलगडला

Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रात्रीस खेळ चाले मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या शेवंता म्हणजे अपूर्वा नेमळेकरला कला क्षेत्रात १० वर्ष पूर्ण झाली आहेत. हा दहा वर्षांचा कालावधी किती संघर्षाचा होता हे अपूर्वाने फेसबुकवर पोस्ट करून उलघडा केला आहे. कला क्षेत्रात संधी कशी मिळाली ते आजवरच्या प्रवासात आलेल्या अनुभवांना शब्दात मांडून भावना व्यक्त केल्या आहेत. 

अपूर्वा आपल्या पोस्टमध्ये म्हणते की, मुंबई ते गोवा ही किनारपट्टी म्हणजे निसर्गाचे एक अवखळ रूप या रूपात दडलेले कितीतरी चाकरमाने या मुंबापुरीत स्थिरावले. यातीलचं एका चाकरमान्यांच्या पोटी जन्मलेली मी तुमची लाडकी शेवंता उर्फ अपूर्वा  सुभाष नेमळेकर मुंबईच्या रुपारेल कॉलेजमधून बी.एम.एस ची पदवी संपादन करून पुढील उच्च शिक्षणासाठी मला परदेशी जायचं होतं परंतु अंगातल्या कलागुणांनी मला शांत बसू दिलं नाही. 

2011साली झी मराठी वरील " आभास हा " या टीव्ही सिरीयल च्या ऑडिशन साठी मला फोन आला आणि बाबांना घेऊन मी त्या ऑडिशनला गेले तोपर्यंत ऑडिशन हा शब्द पण मला माहिती नव्हता माझ्यातील कलाकार पाहून आभास हा या मालिकेतून मी या चंदेरी दुनियेत प्रवेश केला. त्यानंतर एकापेक्षा एक हा डान्स शोमध्ये भाग घेतला. भाखरखाडी, 7किमी, इश्क वाला लव्ह, व्हीला, द ऍक्सीडेन्टल प्रायं मिनिस्टर, सब कुशल मंगल यासारख्या हिंदी वं मराठी फिल्म करण्याची संधी मिळाली.. आराधना, तू जीवाला गुंतवावे, प्रेम हे, तू माझा सांगती … या  टीव्ही मालिकांमधून मी घराघरात पोहचले. हे पाहून जगन्नाथ गंगाराम पेडणेकर सारख्या सुप्रसिद्ध ज्वेलरीचा ब्रँड अँबेसिडर म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली.

बर्‍याचदा असं झाले की हीरोइन म्हणून मुख्य रोलसाठी माझी निवड झाली आणि अंतिम क्षणी मला बदलण्यात आलं.. तेव्हा खुप डिप्रेशन पण आलं.आणि असंही झालं की मुख्य हिरोईन म्हणून रोल केलेल्या फिल्म शूटिंग पूर्ण होऊनसुद्धा दुर्देवाने काही ना काही कारणानं रिलीज झाल्या नाहीत..कधी वजन वाढवा, तर कधी वजन कमी करा.. त्यामुळे जीवनात यश- अपयशाच्या पायऱ्या खालीवर होने चालूच होतं. म्हणून धीर सोडला नाही. आणी खचूनही गेले नाही. यशाची वाट पाहत प्रयत्न चालूच ठेवले.

खरंतर आम्हा कलाकार मंडळींना कलाकारातील कला जिवंत दाखवण्यासाठी प्रथम नाट्य रंगमंचावर वावरावं लागतं नाटक हृदयात जपावं लागतं तिथेच खऱ्या जिवंत कलेचा कस लागतो म्हणून मी " आलाय मोठा शहाणा या आयुष्यातील पहिल्यां नाटकातून रंगमंचावर पाऊल ठेवल. आणि याच नाटकासाठी मला नाट्य परिषदेचा बेस्ट एक्ट्रेस इन कॉमिक रोल  हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर चोरीचा मामला आणि आता इब्लिस हे नाटक मी करत आहे. कोरोना मुळे त्याचे प्रयोग थांबलेले आहेत पाहूयात लवकरच सुरू होतील.

मध्ये बराच काळ हातात काहीच काम नव्हते. आयुष्यात अनेक चढ-उतार आले मधेच माझा आधारवड असलेले माझे बाबा सोडून गेले. अगदी आभाळ फाटल्या सारखं झालं. अनेक संकटांना तोंड देत क्राइम पेट्रोल,सावधान इंडिया  यासारखे  एपिसोडीक शो सुरू ठेवले. पॉलिटिक्स सारखी वेब सिरीज केली चढा नंतर उतार असतोच या निसर्ग नियमाने मी  कार्यरत राहिले.. बे बेभरवशाच्या बेगडी दुनियेत स्त्रीमनाची ससेहोलपट मी अनुभवली. पण खचून गेले नाही परिस्थितीशी दोन हात करत तटस्थ उभी राहिले अगदी सह्याद्रीच्या पहाडासारखी…….

कलागुणांनी ठासून भरलेल्या सौंदर्याला शिक्षण, आणि आई-वडिलांच्या संस्काराची जोड मिळाली तर आभाळ ठेंगणं व्हायला वेळ लागत नाही,अगदी नेमकं तसंच माझ्या बाबतीत घडलं आणि ज्या मालिकेने मला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवलं ती झी मराठी  ची मालिका रात्रीस खेळ चाले त्यातील माझी भूमिका म्हणजे शेवंता……!! आज दहा वर्षाच्या लहानग्यापासून ते 80 वर्षाच्या वयास्कच्या  ह्रदयावर वर अजरामर झाली आहे.. शेवंता भूमिकेसाठी मला झी मराठीने  झी बेस्ट एकट्रेस पुरस्कार देऊन गौरवले आहे…… कुटुंबाच्या सहकार्याने, आईच्या आशीर्वादाने आणि मायबाप रसिक प्रेक्षकांच्या उदंड प्रेमामुळे मी आजही तुमच्या मनात रुतून बसलेली आहे….!

कलेला परमेश्वर मानणारी मी शांत बसेल तर ती अपूर्वा कसली लॉकडाऊन काळातही " अशी मी? तशी मी ?कशी मी? " होऊन  यूट्यूब चैनल वर कार्यरत राहिले…कारण कलेचे बाजीगर जिवंत ठेवणारे कलाकारांचे सौदागर जोपर्यंत कोंदन तयार करणार नाहीत.. तोपर्यंत कलेची रत्ने कोंदनवीणा पडून राहतील..आणि माझ्यासारखं कोंदन नव्या उमेदीने तयार होईल…आणि तुमची सेवा करण्याचं बळ मला मिळेल हाच आशावाद मनात ठेवून " तुझं माझं जमतय  ही सीरिअल संपून आता " रात्रीस खेळ चाले भाग 3" मधून  तुमच्या सेवेत आलेली आहे….!!!

माझ्या या सांस्कृतिक सेवेची 2011 ते  2021  दशक पूर्ती 30 मे ला पूर्ण होत आहे.. त्यानिमित्ताने माझा फिल्म सृष्टीतल्या प्रवास तुमच्या समोर मांडून तुमच्याशी हितगूज केलं भविष्यात आपलं प्रेम माझ्या पाठीशी नक्की राहील आपल्या दिलखुलास प्रेमळ उल्हासित नजरकैदेत कायमची टिकून राहण्याचा प्रयत्न करेन, त्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तोच आशावाद पुढे ठेवून पुढे पाऊल ठेवते…अगदी तुम्हा रसिक प्रेक्षकांच्या भरवश्यावर तुमची लाडकी…….. शेवंता!!!!!!  म्हणजेच अपूर्वा सुभाष नेमळेकर !

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news