डॉ. अनिल मडके
सर्दी ही विषाणूजन्य असते, म्हणून अँटिव्हायरल ड्रग किंवा विषाणूविरोधी औषधे घ्यावीत का असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा त्याचे उत्तर नाही, असे आहे. कारण, सर्दीला कारणीभूत विषाणू हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. एखाद्या व्यक्तीला नेमक्या कोणत्या विषाणूमुळे सर्दी झालेली आहे, हे सहजी ओळखता येत नाही. त्यामुळे सर्दीच्या रुग्णांना सरसकटपणे अँटिव्हायरल औषधे दिली जात नाहीत.
सर्दीवर कोणते उपचार असतात याचा विचार करण्याआधी सर्दीचे अनेक प्रकार असतात, हे लक्षात घ्यायला हवे.
'कॉमन कोल्ड' म्हणजे सर्वसामान्य किंवा विषाणूजन्य सर्दी होय, हे आपण पाहिले. सर्दीचे इतर प्रकारही आहेत. ते म्हणजे अॅलर्जीची सर्दी, सायनोसायटिस (म्हणजे हाडाच्या पोकळीत, कवटीमध्ये असणार्या हवेच्या पोकळ्यांमधील संसर्ग). याहून वेगळी, म्हणजे स्वाईन फ्लूमध्ये होणारी सर्दी अतितीव्र असते आणि त्यातील उपचारही वेगळा असतो.
जेव्हा सर्दी खूप तीव्र प्रमाणात सुरू होते, म्हणजे पहिल्या-दुसर्या दिवशीच खूप प्रमाणात नाकातून पाणी येणे, खूप शिंका येणे, नाक लाल होणे, नाक चोंदणे आणि लगेच घसा गवगवणे या तक्रारी झाल्या आणि उपचार घेऊनही सर्दी कमी झाली नाही किंवा खोकला येणे, श्वास लागणे, दम लागणे, छातीवर दडपण आल्यासारखे वाटणे अशा तक्रारी आढळल्या तर मग हा एन्फ्लूएंझाचा विषाणू असू शकतो आणि हा एन्फ्लूएंझा हा स्वाईन फ्लूचा असू शकतो. त्यामुळे अतितीव्र त्रास असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अजिबात दुर्लक्ष करू नये.
उपचार घेतल्यानंतर सर्दी एक आठवड्यात बरी होते; पण उपचार नाही घेतले तर ती बरी व्हायला सात दिवस लागतात ही म्हण तशी जुनी झाली असली, तरी त्यात तथ्य आहे; पण स्वाईन फ्लूच्या जमान्यात तिच्याकडे दुर्लक्ष करणे हे नक्कीच शहाणपणाचे नाही. विशेषतः, जेव्हा ऋतुबदल होतो किंवा आजूबाजूला स्वाईन फ्लूचे रुग्ण असतात तेव्हा कोणत्याही सर्दीकडे दुर्लक्ष करू नये. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सर्दी ज्या पद्धतीने पसरते ते समजावून घेतले आणि हात नाकाकडे न नेणे, हात वारंवार धुणे हे पथ्य पाळले तरी सर्दी आपल्याला होत नाही, हे लक्षात ठेवावे.
सर्दीवर उपचार कोणते, असा प्रश्न केला तर मुळात काही घरगुती उपायांनीसुद्धा सर्दी कमी होते. थंडीच्या काळात किंवा नाकाचे तापमान कमी झाल्यामुळे तिथे विषाणूंची वाढ होते, हे आपण इथे लक्षात घेतले आहे. र्हायनोव्हायरस नावाचा विषाणू हा अधिक तपमानात, विशेषतः गरम वातावरणात, साधारणत: 45 अंश सेल्सिअस तपमानाच्या हवेत जगत नाही. त्यामुळे गरम कपड्याने नाक शेकण्याचा उपाय जुना वाटला, तरी त्यामुळे सर्दी कमी होण्यास मदत होते.
सर्दी झाली की, अनेक जण ऊठसूट नाकात काही विशिष्ट थेंब सोडतात किंवा नाकात स्प्रे मारतात. आमच्याकडे येणारे काही रुग्ण आपल्याबरोबर नाकाचा स्प्रे जवळ बाळगूनच असतात. तो वापरला की सर्दी कमी होते, अशी त्यांची समजूत असते; पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, मेडिकल दुकानातून कोणता तरी स्प्रे किंवा ड्रॉप्स आणून वापरणे धोक्याचे असते. सर्दी झाल्यावर अँटिबायोटिक्स स्वतःहून घ्यावीत का, या प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे नाही, असे आहे. स्वतःहून कोणतीही औषधे वापरू नयेत. सर्दी झाल्यावर सरसकट अँटिबायोटिक्सचा वापर केला जात नाही. जेव्हा जीवाणूजन्य जंतुसंसर्ग असण्याची किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असल्याचे खात्री असते, तेव्हाच अँटिबायोटिक्स किंवा प्रतिजैविके द्यावी लागतात. नाकातून चिकट स्राव येत नसेल, खोकल्यातून कफ पडत नसेल, खूप मोठ्या प्रमाणात ताप नसेल तर ही सर्दी विषाणूजन्य असते. तेथे जीवाणूंची घुसखोरी झालेली नसते. अशावेळी प्रतिजैविकांचा वापर त्यांच्या साईड इफेक्टस्मुळे धोकादायक ठरू शकतो. सर्दीमुळे येणार्या खोकल्यासाठीसुद्धा खोकल्याचे औषध द्यावे लागत नाही. सर्दी कमी होण्याचे उपाय तेथे महत्त्वाचे असतात.
लहान मुलांसाठी सर्दी आल्यानंतर नाक शेकणे जसे महत्त्वाचे असते, तशीच साध्या गरम पाण्याची वाफ घेणे हासुद्धा महत्त्वाचा उपाय असतो. गरम पाण्याचा वाफारा हे शब्दप्रयोग जुन्या जाणत्या माणसांकडून ऐकलेले असतात. वाफारा सर्दीसाठी फायद्याचाच असतो. आजकाल बाजारात मिळणार्या प्लास्टिकच्या स्टीमरपेक्षा घरात पाणी उकळून सावधपणे वाफ घेणे जास्त चांगले. पाण्याची वाफ घ्या, असा उपाय रुग्णांना सांगितला की बरेच रुग्ण त्यात काही औषध टाकू का, असा प्रश्न करतात. जर आवश्यक असेल तर तुमचे डॉक्टर हे तुम्हाला त्यात टाकायला औषध देतीलच; पण औषधाशिवाय साध्या पाण्याची वाफसुद्धा तितकीच महत्त्वाची आणि उपयुक्त असते.
काही वेळा मोठ्या मुलांत आणि प्रौढ व्यक्तीत स्टीम बाथ घेणे उपयुक्त ठरते. लहान मुलांना सर्दी होते, तेव्हा बादलीत उकळते पाणी ठेवून बाथरूम बंद ठेवावी. खिडक्या-दारे बंद करावीत आणि वाफेने बाथरूम भरली की तेथे बाळाला न्यावे. तेथे चार-पाच मिनिटे थांबल्यास ही वाफ बाळाला मिळते आणि सर्दी कमी होण्यास मदत मिळते.
ज्यांना घशात खवखवते किंवा ज्यांचा घसा दुखतो त्यांनी मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्या तर त्याचा फायदा होतो. 'क' जीवनसत्त्व भरपूर असलेले लिंबू, आवळा, संत्री, यांचे सेवन केले किंवा 'क' जीवनसत्त्वाच्या गोळ्या घेतल्या तर त्याचा फायदा होतो. अशा काळात उपचारांचा भाग म्हणून पालेभाज्यांचे सूप किंवा गवती चहा यांचा वापर करायला हरकत नाही. सर्दीच्या काळात विशेषतः हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात सर्दी झाली तर थंड पाणी न पिता गरम पाणी घेतले तर फायदा नक्कीच होतो. गरम पेये किंवा गरम पाणी यामुळे नाकाच्या आतल्या स्तरातील रक्तपुरवठा चांगला वाढतो आणि तेथील रोगप्रतिकारक शक्ती वाढून विषाणूंच्या वाढीला अटकाव होतो आणि सर्दी कमी होण्यास मदत होते.
सर्दी झालेल्या व्यक्ती नाक शिंकरतात. नाक शिंकरायचे असेल तर एक नाकपुडी दाबून नाक शिंकरावे. दोन्ही नाकपुड्या दाबून नाक शिंकरल्यास नाकातील दाब वाढून नाकातील संसर्ग हा युस्टेशियन ट्यूबमधून कानात जाऊन कानात जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते.
ज्यांना सर्दीचा त्रास होतो त्यांनी हलका आहार घ्यावा. बाहेरचे खाणे टाळावे. तेलकट-तूपकट पदार्थ किंवा मेजवान्यांतील चटपटीत पदार्थ खाणे निश्चितच हितावह नाही. सर्दी झालेल्या रुग्णाने गर्दीची ठिकाणे टाळावीत. ऑफिस किंवा नोकरीच्या ठिकाणी न जाता विश्रांती घ्यावी. त्यामुळे उपचारही होतो आणि सर्दीचा प्रसार होण्याचेही टळते. 'क' जीवनसत्त्व – व्हिटामिन 'सी'मुळे रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते. त्यामुळे त्यांचा समावेश केवळ सर्दीच्या काळातच नव्हे, तर एरव्हीही आपल्या आहारात करावा.
सर्दी होऊ नये म्हणून काय करावे, असा अनेकांचा प्रश्न असतो. सर्दीबद्दल काही समज-गैरसमजही असतात. बर्याच जणांना वाटते की, काही केले तरी सर्दी होणारच; मग त्याला काय करावे? काही लोकांना वाटते की, आयुष्यात एखाद्याला सर्दीचा त्रासच होत नाही. आम्हालाच का होतो? शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे सर्दी वारंवार होते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला दीर्घकालीन विकार असेल (उदाहरणार्थ- मधुमेह, कर्करोग किंवा एचआयव्ही-एड्स) तर अशा व्यक्तींना सर्दी होण्याची शक्यता जास्त असते. अशा व्यक्तींनी आपला आहार समतोल ठेवणे हे महत्त्वाचे असते आणि आपला आजार आटोक्यात ठेवणे (मधुमेही व्यक्तींनी शुगर आटोक्यात ठेवणे, एचआयव्ही एड्सबाधित व्यक्तींनी सीडीफोर आणि व्हायरल लोड हा आटोक्यात ठेवणे) महत्त्वाचे असते. दमा, क्रोनिक ब्राँकायटिस, सीओपीडी, आयएलडी, फुफ्फुसाचा क्षयरोग असे विकार असणार्या व्यक्तींनी सर्दीबाबत विशेष जागरूक राहावे. सर्दी टाळण्याचे उपाय महत्त्वाचे आणि सर्दी झालीच तर त्वरित उपचार घ्यावेत. नियमित व्यायाम करणार्या व्यक्तींना सर्दी क्वचित होते ही अनेक अभ्यास गटांनी अनुभवलेली वस्तुस्थिती आहे. त्यामुळे नियमित व्यायाम करावा.
सर्दी ही विषाणूजन्य असते, म्हणून अँटिव्हायरल ड्रग किंवा विषाणूविरोधी औषधे घ्यावीत का असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा त्याचे उत्तर नाही असे आहे. कारण, सर्दीला कारणीभूत विषाणू हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. एखाद्या व्यक्तीला नेमक्या कोणत्या विषाणूमुळे सर्दी झालेली आहे, हे सहजी ओळखता येत नाही. त्यासाठी चाचणी नाही. त्यामुळे सर्दीच्या रुग्णांना सरसकटपणे अँटिव्हायरल औषधे दिली जात नाहीत. अर्थात, याला अपवाद आहे तो स्वाईन फ्लूचा. स्वाईन फ्लूचा आजार जीवघेणा असल्यामुळे जर स्वाईन फ्लूची शक्यता वाटली, तर अँटिव्हायरल औषधे तातडीने घ्यावी लागतात. तरच तिचा धोका टळतो. अशा व्यक्तीला न्यूमोनिया होण्यापूर्वी अँटिव्हायरल औषधे दिली तर त्यांचा फायदा होतो; अन्यथा सर्दीसाठी अँटिव्हायरल औषधे दिली जात नाहीत.
सर्दीच्या मोसमात किंवा ज्या व्यक्तींना कामाच्या निमित्ताने गर्दीत जावे लागते, अशा व्यक्तींनी, तसेच रुग्णालयात काम करणार्या व्यक्तींनी- मग ते डॉक्टर असोत, परिचारिका असोत किंवा प्रयोगशाळा तंत्रज्ञ असोत- रुग्णाच्या संपर्कात येणार्या सर्व व्यक्तींनी नाकावर मास्क लावल्यास सर्दीपासून आपण हमखास दूर राहू शकतो. याच्या जोडीला हात धुणे हेही आलेच. सर्दीच्या रुग्णाची शुश्रूषा करणार्यांनी म्हणजेच रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि पालकांनी ही काळजी घ्यावी.
ज्या मुलांना सर्दी होते त्या मुलांना आरोग्याच्या सवयी आवर्जून शिकवायला हव्यात. हे काम पालकांनी आणि शिक्षकांनी विशेषतः बालवाडी, पहिली-दुसरीपर्यंतच्या शिक्षकांनी शिकून घ्यायला हवे. अशा मुलांना रुमाल वापरणे सक्तीचे करावे. ज्यांना सर्दी आहे, त्यांचे हात रुमाल उकळत्या पाण्याने धुवावेत आणि त्यांच्या वस्तू इतर मुलांना वापरू देऊ नयेत. ज्यांना सर्दी झाली आहे त्यांनी लहान मुलांचे पापे घेऊ नयेत. त्यामुळे सर्दी पसरते. काही मुलांना नाकात बोट घालायची सवय असते. अशा मुलांच्या बोटावर विषाणूंचे प्रमाण असते.
अशी मुले ज्या पदार्थांना, वस्तूंना, कपड्यांना हात लावतील तिथे-तिथे जंतूंचा प्रादुर्भाव होतो आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना सर्दीचा फैलाव होतो. म्हणून काळजी आवर्जून घ्यायला हवी. वारंवार होणार्या सर्दीवर मात करायची असेल तर आपल्या जीवनशैलीत बदल करायला हवा. म्हणजे ज्या व्यक्ती बैठे काम, बैठा व्यवसाय करतात अशा व्यक्तींनी नियमितपणे व्यायाम करायला हवा. आहाराकडे लक्ष द्यायला हवे. आहार सकस, जीवनसत्त्वयुक्त असावा. म्हणून आहारात पालेभाज्या, फळभाज्या, फळे यांचा समावेश असावा. विशेषतः, 'सी' व्हिटामिनयुक्त फळे, आंबट फळे – लिंबू, संत्री, मोसंबी अशा प्रकारची फळे किंवा चिंच, आमसूल किंवा ताक असे पदार्थ कटाक्षाने आहारात घ्यावेत.
त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. पुरेशी विश्रांती किंवा नियमित झोप यांचे महत्त्व अनेकांना वाटत नाही. रोगप्रतिकारक क्षमता सुदृढ ठेवण्यात पुरेशी झोप आणि विश्रांती यांचा मोठा हात असतो. दिवस थंडीचे आहेत. रात्र वैर्याची म्हणजे विषाणूंची आहे. म्हणून सदैव सावधान!
(उत्तरार्ध)