

सर्दी सुरू झाली की घरातली थंडी अगदी अंगात शिरल्यासारखी वाटते. पण हीटर लावणं नेहमी शक्य नसतं कधी खर्च जास्त, तर कधी घरात लहान बाळं किंवा ज्येष्ठ लोक असतात. त्यामुळे घर नैसर्गिक आणि सुरक्षित पद्धतीनं गरम ठेवण्याचे काही सोपे उपाय माहित असणं खूप गरजेचं आहे. तुमच्या किचन, स्टोअर किंवा कपाटात असलेल्या छोट्या-छोट्या गोष्टींच्या मदतीनं तुम्ही तुमची खोली काही मिनिटांतच आरामदायक आणि ‘कॉजी’ बनवू शकता.
फर्शीवर जाड गालिचे किंवा ब्लँकेट
थंड हवा जमिनीपासून जास्त येते. त्यामुळे टाईल्स किंवा मार्बलच्या जमिनीवर चालताना पाय लगेच थंड पडतात. अशावेळी जमिनीवर जाड रग, दरी किंवा कारपेट टाकलं की खोलीचं तापमान काही अंशी वाढतं आणि चालताना शरीरही उबदार राहतं.
खिडक्या–दरवाज्यांवर थर्मल किंवा जाड पडदे
थंड हवेतून सर्वात मोठा मार्ग म्हणजे खिडक्यांचे फटी. जाड पडदे, थर्मल कर्टन्स किंवा दुहेरी पडदे लावल्यास थंडी आत येणं कमी होतं आणि खोली जास्त वेळ गरम राहते.
दुपारची सूर्यकिरणे खोलीत येऊ द्या
दुपारी जेव्हा सूर्य जोरात असतो, तेव्हा खिडक्या उघड्या ठेवा आणि सूर्यप्रकाश थेट खोलीत येऊ द्या. हा नैसर्गिक उष्णतेचा सर्वोत्तम स्रोत आहे. संध्याकाळ होताच पुन्हा खिडक्या-पडदे बंद करा.
ऊनी किंवा फ्लॅनेलची जाड रजई
फ्लॅनेल किंवा ऊनी रजई शरीराला जास्त काळ उबदार ठेवते. बेडवरील पांघरूण उबदार असेल तर खोलीही उबदार वाटू लागते आणि झोप अधिक आरामदायक होते.
मेणबत्त्यांची छोटी हीटिंग ट्रिक
परफ्यूम कॅन्डल किंवा साधी मेणबत्तीदेखील खोलीचा वातावरणिक तापमान काही प्रमाणात वाढवते. विशेषतः बंद खोलीत हलकी उब तयार होते आणि वातावरण मऊसूत, आरामदायक बनतं.
फटी बंद करा – ड्राफ्ट स्टॉपरचा वापर
दरवाजाखालून येणारी हवा खोलीला पटकन थंड करते. रोल केलेलं टॉवेल, जाड कापड किंवा ड्राफ्ट स्टॉपर वापरून फट सील करा. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे.
बेडखाली बॉक्सेस किंवा थर्मल शीट
बेडखाली रिकामी जागा असेल तर थंडी जास्त साचते. खाली बॉक्स, बॅग्ज किंवा थर्मल शीट ठेवल्यास बेड उबदार राहतो.
खोली लहान भागांत विभागा
मोठी खोली गरम करायला वेळ लागतो. पडदे टांगून किंवा फोल्डिंग पार्टिशनने छोटा झोन तयार करा हा झोन पटकन गरम होतो.
गरम पाण्याची बॉटल
बेडवर झोपण्याआधी गरम पाण्याची बॉटल चादरीखाली ठेवा. संपूर्ण बेड उबदार होतो आणि थंडी कमी जाणवते.
न वापरलेल्या खोलीचे दरवाजे बंद ठेवा
थंड हवा एका खोलीतून दुसरीकडे फिरते. त्यामुळे न वापरणारे रूम्स बंद ठेवल्यास मुख्य खोलीचं तापमान टिकून राहतं.