Sattu Flour | सातूचे पीठ : वजन वाढवायचे की कमी करायचे? उत्तर एकाच पेयात!

Sattu Flour |
Sattu Flour | सातूचे पीठ : वजन वाढवायचे की कमी करायचे? उत्तर एकाच पेयात!
Published on
Updated on

डॉ. हेमंत जोशी, डॉ. अर्चना जोशी

सातू पीठ आपल्याला लागणाऱ्या सर्व ७ गोष्टी देते. म्हणून ते पूर्णान्न आहे. अनेकांना आहारात जीवनसत्त्वे व खनिजे कमी पडतात म्हणून कमजोरी आहे. डी.एच.ए. या तेलाअभावी मेंदू खराब होतो. पाचक रसाअभावी अन्न पचत नाही. या सर्व गोष्टी नव्या सातूमध्ये आहेत.

सातूचे पीठ घट्ट खाल्ले की त्याने वजन वाढते. ३०, ग्राम सातू पीठ १ पेला पाणी, ताक किंवा दुधातून पेय करून घेतले की त्याने वजन घटते. स्वतःला फीट ठेवायला सिनेतारिका सातू पेये पितात.

७ वस्तूचे सातूचे पीठ कसे बनवायचे?

जुन्या काळापासून सातूचे पीठ बनवायला ७ वस्तू वापरतात. म्हणून त्याला ‘सातू’ म्हणतात. नवीन सूत्राप्रमाणे बनविलेले सातू पीठ आपल्याला लागणाऱ्या सर्व ७ गोष्टी देते. म्हणून ते पूर्णान्न आहे. अनेकांना आहारात जीवनसत्त्वे व खनिजे कमी पडतात म्हणून कमजोरी आहे. चोथा कमी पडतो म्हणून ‘शौचास’ होत नाही. डी.एच.ए. या तेलाअभावी मेंदू खराब होतो. पाचक रसअभावी अन्न पचत नाही. या सर्व गोष्टी नव्या सातू मध्ये आहेत. १०० ग्रॅम हे सातू पीठ ३५० कॅलरी, १९ ग्रॅम प्रथिने [प्रोटिन्स] व ६.७ ग्रॅम तेल देते. एवढे प्रथिने देणारे दुसरे अन्न दुर्मीळ आहे.

सातू पीठ बनवायला प्रत्येकी १ वाटा खालील ७ वस्तू घेता येतात.

१] तेल बी : जवस.

२] ३ धान्ये . नाचणी [रागी] ज्वारी, बाजरी, गहू, यापैकी

३] हरभरा, मूग, मटकी, मसूर यातील ३ कडधान्ये. या ७ वस्तू घ्या. धुवा. त्यांना १२ तास पाण्यात भिजवा. नंतर त्यांना मोड आणा. अंकुरित करा. यासाठी त्यांना ओल्या कपड्यात अंधाऱ्या जागी २ दिवस म्हणजे ४८ तास बांधून ठेवा. त्यांना चांगली मोड येईल. मग त्यांना सुकवा. उन्हात किंवा सावलीत. मग त्यांना भाजा. एकत्र दळा. असे सातूचे पीठ तयार होते. हवे तर चवीसाठी त्यात जिरे पावडर, वेलची इत्यादी घाला. ही धान्ये अंकुरित होतात त्यानंतर पाचक रस व जीवन सत्त्वे बनतात. हे इतर अन्नात नसते.

सातू आपल्याला लागणाऱ्या सर्व ७ गोष्टी देते.

कर्बोदके यातील ३ धान्ये कर्बोदके देतात.

प्रथिने. यातील कर्बोदके व ३ डाळी एकत्र सर्व प्रथिने देतात.

तेल. यातील जवसाच्या तेलात डी. एच. ए.म्हणजे डोकोसा- हेक्साए- नोइक ऍसिड हे ओमेगा 3 या प्रकारचे फॅटी ऍसिड असते. डी. एच. ए. आपले रक्तदाब, हृदय चांगले ठेवायला मदत करते. आपला ६० टक्के मेंदू तेलाचा बनला आहे. यात सर्वाधिक डी. एच. ए. म्हणजे डोकोसा- हेक्साए- नोईक असिड हे ओमेगा 3 या प्रकारचे फॅटी ॲसिड असते.

बाळाचा मेंदू वाढायला हे सर्व लागते. हे आपले डोळे, मेंदू व यांचेसाठी आपल्या आहारात रोज असणे जरूरी आहे. मुलांचा मेंदू आईच्या पोटात व नंतर पहिले २ वर्षांत सर्वाधिक वाढतो. तेव्हा गर्भवती व दूध पाजणाऱ्या मातांना हे मिळायला हवे. म्हणून त्यांना सातूचे पीठ द्यावे. वय वाढले की मोठ्यांच्या मेंदूची कार्यक्षमता १ टक्केने दरवर्षी घटते. मोठ्यांनी डी. एच. ए. असलेले सातू खाल्ले की त्यांचा मेंदू छान राहण्यास मदत होईल.

जीवनसत्त्वे : ही धान्ये आपण भिजवतो तेव्हा ते अंकुरित होतात. त्यातील जीवनसत्त्वांचे प्रमाण ३०० टक्के पटीने वाढते.

पाचक रस : अंकुरित होताना गहू आदी धान्यात कर्बोदके, म्हणजे पीठ पचवणारा अमायलेज हा पाचक रस बनतो. मूग, मटकी, हरभरा यात प्रथिने म्हणजे प्रोटिन पचवणारा प्रोटिएज नावाचा पाचक रस बनतो. तेल बियात तेल पचवणारा लायपेज नावाचा पाचक रस बनतो. फायटेज आदी इतर उपयुक्तरस पण बनतात. पाचक रस सातू पचवायला मदत करतात. हे पाचक रस इतर अन्नात नाहीत.

खनिजे, लोह, कॅल्शिअम आदी खनिजे.

चोथा : याने पोट साफ होते. पोटातील चांगले जीवाणू छान वाढतात. सातू १ मिनिटात तयार होते. दूध, ताक किंवा पाण्यात कालवा व बाळाला भरवा. बाळ ६ महिन्यांचे झाले की त्याला दर वेळी आईचे दूध देण्याआधी सातू भरवा.

सर्वांसाठी सातू

मोठे लोक सातूच्या पिठात मसाले, लोणचे कोशिंबिरी, फळे इत्यादी घालून खातात. सातू पिठाच्या पोळ्या, पराठे, लाडू इडली, मिठाईसुद्धा बनवतात. ज्या वस्तू कणिक व बेसन यापासून बनतात त्या सर्व सातूपासून बनतात. घरी केले तर सातू बनवायला लागणाऱ्या वस्तूंची किंमत १०० रु. किलो पडते. घरी सातू पीठ करा. बाजाराचे साधे बालकांचे अन्न १००० रुपये किलो पडते. त्याऐवजी महिला बचत गटांना हे सातू पीठ करायला सांगा. सातूचे पदार्थ सर्वात स्वस्त व घरचा नाश्ता म्हणून खा. बाजाराचे बिस्कीट फरसाण आदी सर्व काही ३०० ते ६०० रुपये किलो असते, सातूच्या पिठापेक्षा ते खूप महाग पडते. त्या तुलनेत सातू उपयुक्त, स्वस्त आणि आरोग्यदायी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news