

Why Love Makes You Blind Science Explained: प्रेम म्हणजे भावना, वेड, आकर्षण, नशा सगळं एकाच वेळेस अनुभवायला मिळणारं अनोखं मिश्रण. म्हणूनच लोक अनेकदा म्हणतात, "प्रेम अंधळं असतं." पण हे असं का होतं? विज्ञानाने या प्रश्नाचा शोध घेतला आहे आणि आता प्रेमाच्या वेडामागचं मेंदूचं गणित उलगडलं आहे.
वैज्ञानिक संशोधनानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात पडते, तेव्हा मेंदूत हार्मोन्स आणि केमिकल्सचा एक प्रचंड खेळ सुरू होतो. सुरुवातीला आकर्षण वाढवणारे एस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन सक्रिय होतात. त्यामुळे त्या व्यक्तीबद्दलची ओढ आणि जवळीक वाढते.
याच वेळी मेंदूचा “रिवॉर्ड सेंटर” प्रचंड वेगाने काम करू लागतो आणि डोपामिन नावाचा केमिकल मोठ्या प्रमाणात तयार होतो, जो आपल्यात आनंद आणि उत्साहाची भावना निर्माण करतो. त्यामुळे त्या व्यक्तीची आठवण सतत येते आणि त्याच्याकडे आकर्षण वाढत जातं.
प्रेमात आपला फ्रंटल कॉर्टेक्स म्हणजेच विचार करण्याचा, विश्लेषण करण्याचा भाग कमी होतो. म्हणूनच आपण समोरच्या व्यक्तीतील त्रुटी किंवा चुका पाहत नाही. यामुळेच लोक म्हणतात, “प्रेमात पडल्यावर बुद्धी बंद होते.”
प्रेमाच्या सुरुवातीच्या काळात केवळ चांगल्या भावना वाढत नाहीत, कोर्टिसोल नावाचं स्ट्रेस हॉर्मोनही वाढतं. त्यामुळे भीती निर्माण होते. “तो/ती माझ्यावर खरंच प्रेम करतो/करते का?” असा प्रश्नही सतत मनात येतो.
प्रेमाच्या सुरुवातीचा "रोमांचक" टप्पा काही महिन्यांपुरता असतो. नंतर नातं स्थिर होतं—
त्यानंतर:
विश्वास
समज
जवळीक
आणि कमिटमेंट वाढते
या टप्प्यात ऑक्सीटोसिन आणि वासोप्रेसिन हे दोन महत्त्वाचे हार्मोन्स काम करू लागतात.
यांनाच “बॉन्डिंग हार्मोन्स” म्हटलं जातं. हे हार्मोन्स नात्यात सुरक्षितता, विश्वास आणि स्थैर्य आणतात.
वैज्ञानिकांच्या मते शरीर संबंधांमुळे ऑक्सीटोसिन वाढतं, ज्यामुळे जोडप्यांतील भावनिक बंध अधिक मजबूत होतो. म्हणूनच शारीरिक जवळीक आणि प्रेम दोन्ही एकमेकांना पूरक असतात.
आई-वडील, मित्र, भावंडं किंवा पाळीव प्राणी यांच्याशी असलेल्या प्रेमातही ऑक्सीटोसिनची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे मन शांत राहतं, आरोग्य सुधारतं आणि आयुष्य अधिक आनंदी होतं.
विज्ञानाने प्रेमातील रासायनिक बदल समजावले आहेत, पण प्रेमाचा पूर्ण अर्थ अजूनही उलगडता आला नाही. कारण प्रेम हे हॉर्मोन्स, भावना आणि अनुभव यांचं सुंदर मिश्रण आहे, जे प्रत्येकासाठी वेगळं असतं.