

Kerala Virus Outbreak: भारतामध्ये जेव्हा जेव्हा एखाद्या नव्या आणि धोकादायक विषाणूचा उद्रेक होतो, तेव्हा त्याची पहिली नोंद अनेकदा केरळमध्येच झालेली दिसते. कोरोना, निपाह, मंकीपॉक्स, शिगेला यांसारख्या संसर्गजन्य आजारांची सुरुवात किंवा पहिली प्रकरणे केरळमध्ये आढळल्याने अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे केरळमध्येच अशा आजारांचा उद्रेक का होतो?
अलीकडेच केरळमध्ये पुन्हा एकदा निपाह विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी शिगेला संसर्गामुळे एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेसमोर नवे संकट उभे राहिले आहे. मात्र, या परिस्थितीमागे काही विशिष्ट भौगोलिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक कारणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
केरळचा मोठा भाग पश्चिम घाटातील घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. या जंगलांमध्ये फळे खाणाऱ्या वटवाघळांची मोठी वस्ती आहे. निपाहसारख्या विषाणूंचे हे प्रमुख वाहक मानले जातात.
गेल्या काही वर्षांत वाढत्या शहरीकरणामुळे आणि विकास कामांमुळे जंगलतोड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे वटवाघळांची नैसर्गिक राहण्याची ठिकाणे कमी झाली आहेत. परिणामी, ही वटवाघळे मानवी वस्त्यांच्या जवळ येऊ लागली. यामुळे वन्यजीव आणि माणूस यांच्यातील अंतर कमी झाले असून, प्राण्यांमधील विषाणू माणसांपर्यंत पोहोचण्याचा धोका वाढला आहे.
केरळच्या ग्रामीण भागात ताजी ताडी आणि फळांचे सेवन मोठ्या प्रमाणावर केले जाते. वटवाघळे अनेकदा फळांवर किंवा ताडी साठवलेल्या भांड्यांवर बसतात. त्यांच्या लाळेतून किंवा विष्ठेतून ही फळे दूषित होऊ शकतात.
अशा संक्रमित फळांचे किंवा ताडीचे सेवन केल्यास निपाहसारखे विषाणू थेट मानवी शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे झूनॉटिक अर्थात प्राण्यांकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढतो.
केरळमध्ये लोकसंख्येची घनता तुलनेने जास्त आहे. कमी जागेत जास्त लोक राहत असल्यामुळे कोणताही संसर्गजन्य आजार झपाट्याने पसरू शकतो. लोकांचा सामाजिक संपर्क जास्त असल्याने एखाद्या रुग्णाकडून त्याच्या नातेवाईकांपर्यंत विषाणू सहज पोहोचतो. त्यामुळे संसर्गाचा प्रसार जलद गतीने होण्याची शक्यता वाढते.
केरळमधील लाखो नागरिक रोजगारासाठी खाडी देशांमध्ये राहतात. याशिवाय युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशियातील अनेक देशांशीही केरळचा सतत संपर्क असतो.
या आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे जगात कुठेही उद्भवलेला नवा विषाणू सर्वप्रथम केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता वाढते. 2020 मध्ये भारतातील पहिला कोरोना रुग्णही चीनमधून केरळमध्ये परतलेल्या विद्यार्थिनीमध्ये आढळला होता.
निपाह हा बाहेरून आलेला विषाणू नसून तो केरळमधील काही भागांमध्ये नैसर्गिकरीत्या अस्तित्वात असल्याचे मानले जाते. विशेषतः कोझिकोड आणि मलप्पुरम या जिल्ह्यांमध्ये निपाहचे अनेक उद्रेक झाले आहेत.
या भागांत शेती आणि मानवी वस्ती जंगलांच्या अगदी जवळ पोहोचली आहे. त्यामुळे वटवाघळांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप वाढला असून संसर्गाचा धोका अधिक झाला आहे.
केरळमध्ये संसर्गजन्य आजारांची प्रकरणे जास्त आढळतात, याचा अर्थ तेथे आजार अधिक आहेत असे नाही. उलट, केरळची आरोग्य यंत्रणा देशात सर्वात सक्षम मानली जाते. केरळमध्ये संशयित रुग्णांची तपासणी, संपर्क शोध मोहीम (Contact Tracing) आणि रोगनियंत्रण यंत्रणा अत्यंत प्रभावीपणे काम करते. त्यामुळे नवीन संसर्ग सुरुवातीलाच ओळखला जातो.
केरळमध्ये प्रत्येक संशयित प्रकरणाची नोंद पारदर्शकपणे केली जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) निकषांनुसार त्वरित रिपोर्टिंग केले जाते. त्यामुळे आजार लवकर समोर येतात.
तज्ज्ञांच्या मते, केरळमध्ये आजार जास्त नाहीत, तर तेथील आरोग्य व्यवस्था अधिक सजग आहे. नवीन संसर्ग ओळखण्याची क्षमता इतर अनेक राज्यांपेक्षा अधिक असल्यामुळे अशा आजारांची पहिली माहिती अनेकदा केरळमधूनच समोर येते.
म्हणूनच कोरोना असो, निपाह असो किंवा इतर कोणताही संसर्गजन्य आजार असो केरळ हे केवळ नवीन विषाणूंचे प्रवेशद्वार नसून, देशासाठी एक प्रकारची ‘अर्ली वॉर्निंग सिस्टीम’ म्हणूनही काम करत असल्याचे तज्ज्ञ मानतात.