

अलीकडील काळात किरकोळ समस्यांबाबतही डॉक्टर रक्त तपासणी करण्याचा सल्ला देतात, असा तक्रारीचा सूर काहींमध्ये दिसतो; पण रक्त तपासणीमधून काही महत्त्वाच्या घटकांवर प्रकाश पडल्यास उपचारांची दिशा स्पष्ट होते. रक्त तपासणीमधून नेमके निदान झाल्यानंतर केले जाणारे उपचार शीघ्रफलदायी ठरतात. हा रिपोर्ट किंवा तपासणी अहवाल पाहताना कोणकोणते घटक प्राधान्याने पाहणे गरजेचे असते याविषयी...
डॉ. संजय गायकवाड
कम्प्लीट ब्लड काऊंट अर्थात सीबीसी ही रक्ताची तपासणी आरोग्य तपासणीत सर्वात महत्त्वाची मानली जाते. यावरून शरीरातील रक्तातील हिमोग्लोबिन, लाल पेशी, पांढर्या पेशी आणि प्लेटलेटस् यांची स्थिती समजते.
हिमोग्लोबिन म्हणजे रक्तातील प्रथिन जे शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन पोहोचवते. पुरुषांमध्ये साधारण 13 ते 17 ग्रॅम प्रतिडेसिलिटर आणि महिलांमध्ये 12 ते 15 ग्रॅम प्रतिडेसिलिटर एवढे प्रमाण योग्य मानले जाते. त्यापेक्षा कमी असल्यास शरीरात अॅनिमिया, लोहाची कमतरता किंवा जीवनसत्वांची कमतरता असू शकते.
लाल रक्तपेशींची संख्या आणि त्यांचा आकारही तपासला जातो. पेशींचा आकार खूप लहान असल्यास लोहाची कमतरता आहे, असे मानले जाते; तर पेशी खूप मोठ्या असल्यास जीवनसत्व बी बारा किंवा फॉलिक अॅसिड कमी असल्याचे ते लक्षण मानले जाते. प्रत्येक लाल पेशीत किती हिमोग्लोबिन आहे, यावरून शरीरात ऑक्सिजनपुरवठा व्यवस्थित आहे, का ते समजते.
पांढर्या रक्तपेशींना शरीराचे सैनिक म्हटले जाते. कारण, त्या संसर्गाविरुद्ध लढतात. या पेशींचे शरीरातील सामान्य प्रमाण 4000 ते 11 हजार प्रतिमायक्रोलिटर इतके मानले जाते. या पेशी जास्त असल्यास शरीरात संसर्ग, दाह किंवा क्वचित प्रसंगी रक्ताचा कर्करोग यांचे निदर्शक ठरते. याउलट या पेशी कमी असल्यास व्हायरल संसर्ग, काही औषधांचे परिणाम किंवा बोन मॅरोशी संबंधित समस्या असू शकतात.
डिफरेंशियल काऊंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पांढर्या पेशींचे प्रमाण तपासले जाते. उदाहरणार्थ ईऑसिनोफिल्स जास्त असल्यास अलर्जी किंवा कृमी याचे संकेत मिळतात.
प्लेटलेटस् या रक्त गोठवण्याचे काम करतात. त्यांचे प्रमाण 1.5 लाख ते 4.5 लाख प्रतिमायक्रोलिटर योग्य मानले जाते. प्लेटलेटस् कमी असल्यास डेंग्यू, मलेरिया किंवा इतर व्हायरल आजार असू शकतात. प्लेटलेटस् जास्त असल्यास शरीरात दाह, लोहाची कमतरता किंवा बोन मॅरोशी संबंधित विकार असू शकतात.
हेमाटोक्रिट म्हणजे रक्तातील द्रव आणि पेशींचे प्रमाण. आरडीडब्ल्यू म्हणजे पेशींच्या आकारातील विविधता. या सर्वांचे प्रमाण पाहणेही महत्त्वाचे असते.
सोप्या शब्दांत सांगायचे, तर सीबीसी रिपोर्ट हा आपल्या शरीराची रक्ताशी संबंधित आरोग्यस्थिती दर्शवणारा आरसा असतो. या रिपोर्टमध्ये काही आकडे लाल किंवा हिरव्या रंगात जास्त कमी दाखवलेले दिसले, तरी तो नेहमी गंभीर आजाराचा संकेत असेलच असे नाही. शरीराची स्थिती, लक्षणे आणि इतर तपासण्या यांच्याशी जोडूनच त्याचे खरे निदान होते. त्यामुळे स्वतः रिपोर्ट वाचताना घाबरण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणे हेच योग्य ठरते.