भारत हा येणार्या काही वर्षांमध्ये मधुमेहींची राजधानी बनेल, अशी भीती काही अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे. सध्याच्या जीवनशैलीमुळे बहुतांश लोकांचे आहारचक्र आणि जीवनचक्र बदलले आहे, त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. मधुमेह हा प्रामुख्याने आहारावर अवलंबून असलेला आजार असून, त्यात संतुलन राखल्यास आजार होण्यापासून बचाव होऊ शकतो.
गेल्या काही वर्षांत भारतात मधुमेहग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. विशेष म्हणजे यापैकी बहुतांश जणांना आपल्याला मधुमेह असल्याचेही ठाऊक नाही. अशा लोकांची संख्या अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा रुग्णांना प्री डायबेटिक असे म्हटले जाते. या मंडळींनी आहाराकडे वेळीच लक्ष दिल्यास मधुमेह होण्यापासून त्यांचा बचाव होऊ शकतो.
मधुमेहवाढीसाठी वेळेवर नाश्ता न करणे ही बाब बर्याच अंशी कारणीभूत ठरू शकते. वेळच्या वेळी नाश्ता आणि योग्य आहार केल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहू शकते. प्रीडायबेटिसग्रस्त रुग्णांनी सकाळी साडेआठच्या अगोदर नाश्ता घेणे गरजेचे आहे.
एंडोक्राइन सोसायटीशी निगडित असलेल्या डॉक्टरांनी अभ्यासात म्हटले की, सकाळी आठच्या अगोदर नाश्ता करणार्या रुग्णांत साखरेची पातळी आणि इन्शुलिन रेजिस्टंन्स कमी असल्याचे निदर्शनास आले.
इन्शुलिन रेजिस्टन्स केल्याने शरीर संतुलित हार्मोनसाठी योग्य प्रतिक्रिया देत नाही, अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर साखर वाढू लागते. मधुमेहग्रस्त किती आहार घेतात, किती उशिरा खातात, यापेक्षा वेळेवर आहार महत्त्वाचा आहे.
वेळेवर आहार घेत असतील तर त्याचा अधिक सकारात्मक परिणाम शरीरावर होतो. सकाळी आठच्या अगोदर नाश्ता होत असेल तर शरीरातील कार्य संतुलित राहते आणि साखर नियंत्रित राहते.
आहाराच्या वेळांबरोबरच झोपेच्या वेळाही सांभाळायला हव्यात. उशिरापर्यंतची जागणे, अतिझोप, दुपारची झोप यांपेक्षा झोपेची नियमित वेळ ठरवून घेतल्यास त्याचे आरोग्यावर चांगले परिणाम दिसून येतात आणि ते दीर्घकालीन राहतात.
आज 80-90 वर्षे वयोगटातील व्यक्तींची उदाहरणे घेतल्यास पूर्वीपासून ही मंडळी 8-9 वाजल्यानंतर झोपी जात आणि पहाटे पाच वाजता उठून आपला दिनक्रम सुरू करत. त्यांच्या जेवणाच्या वेळाही ठरलेल्या असायच्या. शारीरिक हालचालीही मुबलक होत्या, त्यामुळे त्यांच्यामध्ये काटकपणा दिसतो आणि तुलनेने आरोग्यव्याधी कमी दिसतात.
आजची जीवनशैली याच्या अगदी विरुद्ध बनल्यामुळे आणि आहारातील सकसता, पोषण कमी झाल्यामुळे मधुमेहासारख्या व्याधी पाठीशी लागल्या आहेत. त्या दूर ठेवायच्या असतील तर आहार, झोप, व्यायाम याबाबत वेळ आणि शिस्त पाळायलाच हवी.