‘ला-निना’ स्थितीकडे वाटचाल!

दिवसेंदिवस हवामानात बदल
La Nina
वातावरण कसे राहील, याचा निर्णय अल-निनो किंवा ला-निनावर अवलंबून असतो.
Published on
Updated on
रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक

दिवसेंदिवस हवामानात बदल होत आहेत; पण आपल्या देशातील पाऊस हा सातासमुद्रापारच्या स्थितीवर अवलंबून आहे, हे वास्तव नाकारून चालणार नाही. आपल्याकडे वातावरण कसे राहील, याचा निर्णय अल-निनो किंवा ला-निनावर अवलंबून असतो. या वर्षी जून आणि जुलै महिन्यांमध्ये भारताने भयंकर उष्णता अनुभवली आणि मागचे सर्व विक्रम मोडले गेले. या हवामानासाठी अल-निनोला जबाबदार धरले जाते.

दक्षिण अमेरिकेपासून भारतापर्यंतच्या भूप्रदेशातील हवामान बदलांमागचे सर्वांत मोठे कारण म्हणजे अल-निनोचा प्रभाव असल्याचे अनेक अभ्यासकांचे मत आहे. अल-निनोचा संंबंध भारत व ऑस्ट्रेलियातील दुष्काळाशी आणि उष्णतेच्या लाटेशी आहे. त्याचवेळी ला-निना हा चांगल्या पावसाचा निदर्शक असल्याने तो एकप्रकारे भारतासाठी वरदानही म्हणता येईल. ‘एपीईसी’ क्लायमेंट सेंटर (एपीसीसी) या संस्थेच्या मते, सप्टेंबर 2024 ते फेब—ुवारी 2025 या काळात ला-निना स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सध्याच्या काळात आशिया खंडात प्रामुख्याने भारतात पावसाळा सुरू असताना हा अंदाज अचूक ठरला, तर आगामी काळात आपल्याकडे आणखी मुसळधार पाऊस पडू शकतो. ला-निना आणि मान्सून यांचा संबंध शास्त्रीय सिद्धांतावर आधारित आहे. वास्तविक दर दोन ते सात वर्षांपर्यंत अल-निनो आणि ला-निनाची परिस्थिती वातावरणात निर्माण होत असते आणि त्याचा परिणाम पावसाळ्यात दिसतो. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 1953 ते 2023 या काळात एकूण 22 ला-निना वर्षे नोंदवली गेली. त्यातील केवळ दोन वेळा म्हणजे 1974 आणि 2000 मध्ये पावसाळ्यात तुलनेने कमी पावसाची नोंद झाली.

आपल्या देशातील पाऊस हा सातासमुद्रापारच्या स्थितीवर अवलंबून आहे, हे वास्तव नाकारून चालणार नाही. आपल्याकडे वातावरण कसे राहील, याचा निर्णय अल-निनो किंवा ला-निनावर अवलंबून असतो. नैसर्गिक वातावरणात अनेक रहस्ये दडलेली असतात आणि त्याच्या अनेक बाजू संपूर्ण परिस्थितीवर प्रभाव टाकत असतात. अशीच घटना 1600 मध्ये पश्चिम पेरूच्या किनारपट्टीवर मच्छीमारांनी अनुभवली. ख्रिसमसच्या काळात समुद्राची पातळी त्यांनी सामान्यापेक्षा अधिक वाढताना पाहिली. या हवामान बदलाला स्पॅनिश शब्दांत ‘अल-निनो’ असे म्हटले गेले. अल-निनोची स्थिती ही वास्तविकपणे मध्य आणि पूर्व मध्य भूमध्यरेषेवरील समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानात ठरावीक काळानंतर होणारी वाढ आहे, तर त्या उलट ला-निना असे तापमान कमी होण्याच्या हवामानातील स्थितीला म्हटले जाते. ला-निनाही स्पॅनिश भाषेतील शब्द आहे.

भारतात त्याचा परिणाम होत असला तरी अल-निनो आणि ला-निनाच्या हालचाली पेरूच्या किनारपट्टीवर आणि ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीवर घडलेल्या असतात. हवेची गती या प्रभावाला कमी करण्याचे काम करते. भूमध्य रेषेवर सूर्याची थेट किरणे पडतात. या भागात संपूर्ण 12 तास सूर्यदर्शन होते. याप्रमाणे सूर्याची उष्णता पृथ्वीच्या पृष्ठभागावर अधिक काळ राहते. त्याचवेळी भूमध्य क्षेत्र किंवा मध्य प्रशांत भागात अधिक उष्णता जाणवते आणि त्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानावर परिणाम होतो. सामान्य स्थितीत भूमध्य वारे हे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात आणि उष्ण वारे हे सागरी पाण्याला ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीकडे घेऊन जातात. उष्ण पाण्याने बाष्पीभवन होते आणि त्यापासून पाऊस, म्हणजेच पूर्व किनारपट्टी भागात दमदार पाऊस पडतो. आर्द्रतायुक्त दमट वारे जेव्हा वरच्या दिशेने जातात, तेव्हा आर्द्रता शोषली जाते आणि ते वारे थंड पडतात. अशा वेळी ‘ट्रोस्फोफियर’ने पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे थंड वारे पेरूच्या किनारपट्टीवर आणि त्याच्या परिसरात खालच्या दिशेने जातात. त्याचवेळी ऑस्ट्रेलियात समुद्रातून निर्माण होणारे उष्ण वारे त्याला धडकतात. त्यापासून निर्माण झालेल्या चक्रीवादळाला ‘वॉकर चक्रीवादळ’ असे म्हणतात.

अल-निनोच्या परिस्थितीत पश्चिमेकडील वारे कमकुवत होतात व ते समुद्राच्या उष्ण पाण्यात मिसळत पेरूच्या किनारपट्टीवर विलीन होतात. याप्रमाणे समुद्राची पातळी 90 सेंटिमीटरने वाढते व त्याचा परिणाम म्हणजे बाष्पीभवन वाढते व पावसाला पोषक वातावरण तयार होते. यामुळे पेरूमध्ये मुसळधार पाऊस पडत असताना दुसरीकडे मान्सूनच्या वार्‍यांवरील त्याच्या विपरीत परिणामामुळे ऑस्ट्रेलियापासून भारतापर्यंत दुष्काळाचे चटके बसू लागतात. 1982, 1987, 2002 व 2009 ही वर्षे अल-निनोची वर्षे मानली गेली आणि या सर्वच वर्षांमधील मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी होता. 1994, 1997 व 2006 ही वर्षेही अल-निनोची होती. तथापि, या वर्षांत सरासरीइतका पाऊस पडला; पण 2014 आणि 2015 ही वर्षे अल-निनोची होती आणि या दोन वर्षांत दुष्काळ पडला.

भारतासारख्या कृषिप्रधान देशाचे भविष्य प्रत्यक्षात पेरूच्या किनारपट्टीवर अवलंबून असते. साहजिकच या दिशेने अभ्यास करण्याची गरज आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने अल-निनोवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे; कारण ही स्थिती केवळ हवामानावरच नाही, तर आरोग्यावरही परिणाम करते. हवामान खात्याचे बहुतांश अंदाज चुकीचे ठरण्यामागे आजही आपण अल-निनोच्या प्रभावाबाबत गांभीर्याने काम करत नसल्याचे स्पष्ट होते. सरतेशेवटी एक गोष्ट मान्य करावी लागेल, ती म्हणजे निसर्ग रहस्यांनी भरलेला आहे व समग्र सृष्टीला प्रभावित करणारे असे निसर्गाचे अनेक पैलू आहेत. अशा पैलूंच्या किंवा घटनांच्या कारणांविषयीचे संशोधन आजही अधुरे असून, या बाबतीत आपले ज्ञान वास्तव व ठोकताळे यांच्या दरम्यानच आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news