पावसाळ्यात घ्या डोळ्यांची काळजी, ‘या’ संसर्गाचा धोका

पावसाळ्यात घ्या डोळ्यांची काळजी, ‘या’ संसर्गाचा धोका

[author title="डॉ. पोपट सुरवसे" image="http://"][/author]

कडक उन्हाळ्यानंतर पावसाळा आला की आनंदाचे वातावरण पसरते. घाम, उकाडा यापासून सुटका होते. पावसाने वातावरणातील गरमी कमी होते. अर्थात, पावसाची विविध रूपे या काळात पाहायला मिळतात. पावसाळ्यात थोडीफार काळजी आपण घेतच असतो. पण, त्यातही डोळ्यांची काळजी घेण्याची विशेष गरज असते.

विविध प्रकारचे संसर्ग पावसाळ्यात होऊ शकतात. विशेषतः लहान मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असते. कारण ते सतत बाहेर राहात असल्याने संसर्ग होण्याचा धोका त्यांना अधिक असतो.

जूनच्या मध्यापासून सप्टेंबरपर्यंत असलेल्या पावसाने उमसल्यासारखे होते. जुलैमध्ये पावसाचा जास्त जोर असतो. माणसाच्या शरीरातील नाजूक अवयव असणार्‍या डोळ्यांवर बाहेरील वातावरणाचे परिणाम होत असतात. या काळात प्रदूषणही अधिक असते. अशा वातावरणात, धावपळीच्या जीवनात लोक डोळ्यांची काळजी घेण्याविषयी तितकेच सतर्क नसतात. पावसाळ्यात डोळ्यांना काही सर्वसाधारण संसर्ग दिसून येतात.

डोळे येणे : कन्जक्टिव्हायटिस अर्थात डोळे येणे. यामध्ये डोळ्याच्या आतील पांढऱा भाग तसेच पापणीचा आतील भाग याला कंटक्टीवा असे म्हटले जाते. डोळ्याच्या या भागात जळजळ होणे, लाल होणे, सूज येणे यालाच आपण डोळा येणे किंवा कन्जक्टिव्हायटिस असे म्हणतो. त्याचे मुख्य कारण आहे संसर्ग आणि अ‍ॅलर्जी. पावसाळ्यात जो विषाणूजन्य ताप येतो त्याचा परिणाम म्हणूनही डोळे येणे किंवा कन्जक्टिव्हायटिस होतो. पावसाळ्यात हाच त्रास अधिक प्रमाणात होतो. मुख्य म्हणजे कन्जक्टिव्हायटीसचा संसर्गही मोठ्या प्रमाणात आणि वेगाने होतो.

रांजणवाडी : आय स्टाई म्हणजे रांजणवाडी. पापण्यांच्या आसपास लाल होऊन येणार्‍या सुजेला रांजणवाडी म्हणतात. रांजणवाडीत पू होतो आणि ती फुटून पू बाहेर येऊन त्याचा पूर्ण निचरा झाल्याशिवाय ती बरी होत नाही. अस्वच्छ हातांनी डोळे चोळल्यास रांजणवाडी होऊ शकते किंवा जीवाणूंमुळेही ती होते. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात रांजणवाडी हा आजार सर्वसाधारणपणे आढळतो.

कॉर्निल अल्सर : यामध्ये डोळ्यात सतत टोचल्यासारखे होते तसेच जळजळ होते. डोळ्यात काही तरी गेले आहे, असे सतत वाटते. त्यामुळे व्यक्तीला सतत त्रास होतो. डोळ्याला खूप उजेड आणि प्रकाश सहन होत नाही. डोळे थकतात आणि दुखतातही. काही वेळा डोळ्यांच्या बाहुल्यांवर दाणे पडल्यासारखे वाटते. योग्य उपचार न झाल्यास दुसर्‍या जीवाणूंचा संसर्ग होऊन एक चिकट पांढर्‍या रंगाचा पदार्थ डोळ्यांच्या कडेला किंवा पापण्यांच्या कडेला एकत्र होतो. त्यामुळे पापण्या एकमेकांना चिकटतात.

  • कन्जक्टिव्हायटिस झाल्यास डोळे सतत धुवावेत.
  • पावसाळ्यात डोळे येणे आणि रांजणवाडी या संसर्गाचा अधिक प्रादुर्भाव पाहायला मिळतो. त्यामुळे वापरलेले टॉवेल, रुमाल, लेन्सेस,
  • चष्मा आणि इतर गोष्टी एकमेकांच्या वापरू नयेत.
  • डोळ्यात औषध घालण्याआधी आणि नंतरही हात स्वच्छ धुवावेत. हात थंड आणि स्वच्छ पाण्याने धुवावेत. हाताने डोळे चोळू नये.
  • कमी प्रकाशात वाचन करू नये.

उपचार काय करावेत?

सुरुवातच्या टप्प्यातच नेत्रविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्याशिवाय मेडिकल स्टोअरमधून स्टिरॉईड असलेले औषध घेऊ नये. प्रखर उजेडापासून डोळ्यांचा बचाव करा. डोळ्यांच्या या आजारात दोन गोष्टींचा उपयोग उपचारासाठी करायला हवा. विसंक्रामक औषधाने डोळ्यांची स्वच्छता आणि दुसरी गोष्ट म्हणजे डोळ्यांला इतर कुठलाही संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिजैविक औषधांचा वापर. डोळ्यांचा त्रास झाल्यावर डोळ्यातून बाहेर पडणारा हानिकारक पदार्थ धुणे खूप महत्त्वाचे आहे. डोळ्यात जमा झालेला चिकट पांढरा द्रव पूर्णपणे साफ होईपर्यंत डोळे स्वच्छ धुतले पाहिजेत.

या काही गोष्टींची काळजी घेतल्यास डोळ्यांच्या आजारापासून बचाव करू शकतो किंवा हे आजार झाल्यास योग्य उपचाराने ते बरेही करू शकतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news