

डॉ. महेश बरामदे
सुरुवातीला किरकोळ वेदना किंवा बोटांमध्ये जडपणा जाणवतो. पुढे काही व्यक्तींमध्ये ही समस्या तीव्र होऊ शकते. विशेषतः एकाच अंगठ्याने सतत स्क्रोलिंग करणे आणि मनगट वाकवून मोबाईल वापरणे त्रासदायक ठरू शकते.
रिपिटिटिव्ह स्ट्रेन इंज्युरी म्हणजे काय?
एकाच प्रकारच्या हालचाली वारंवार केल्यामुळे स्नायू, टेंडन्स आणि आसपासच्या उतींवर ताण निर्माण होऊ शकतो. अशा समस्यांसाठी ‘रिपिटिटिव्ह स्ट्रेन इंज्युरी’ ही व्यापक संज्ञा वापरली जाते. मोबाईलवर सतत टायपिंग करणे, गेम खेळणे किंवा स्क्रोलिंग करणे यामुळे अंगठ्याच्या हालचाली करणार्या टेंडन्सवर अतिरिक्त ताण पडू शकतो.
डी क्वेर्वेन टेनोसिनोव्हायटिस
अंगठ्याच्या बाजूला मनगटाजवळ असलेल्या टेंडन्सभोवतीच्या आवरणात दाह निर्माण होण्याच्या अवस्थेला ‘डी क्वेर्वेन टेनोसिनोव्हायटिस’ म्हणतात. यामध्ये अंगठ्याच्या मुळाशी वेदना, सूज आणि वस्तू पकडताना त्रास जाणवू शकतो. अंगठ्याच्या वारंवार होणार्या हालचालींमुळे काही व्यक्तींमध्ये या विकाराची लक्षणे वाढू शकतात.
कार्पल टनेल सिंड्रोमचा धोका
मनगटातील ‘मीडियन नर्व्ह’ या मज्जातंतूवर दाब आल्यामुळे ’कार्पल टनेल सिंड्रोम’ निर्माण होतो. यामध्ये अंगठा, तर्जनी आणि मधल्या बोटामध्ये मुंग्या येणे, बधिरपणा किंवा वेदना जाणवू शकतात. काही वेळा रात्री लक्षणे अधिक तीव्र होतात. मनगट दीर्घकाळ वाकलेल्या स्थितीत ठेवल्याने आधीपासून असलेली लक्षणे वाढू शकतात.
मोबाईल पकडण्याची पद्धत महत्त्वाची
अनेक जण मोबाईल एकाच हातात धरून अंगठ्याने टायपिंग करतात. काही जण फोन घट्ट पकडतात किंवा मनगट सतत वाकलेल्या स्थितीत ठेवतात. त्यामुळे स्नायूंवर अनावश्यक ताण पडतो. सुरुवातीला जाणवणारा जडपणा, दुखणे किंवा थकवा दुर्लक्षित केल्यास काही व्यक्तींमध्ये वेदना दीर्घकाळ टिकू शकतात.
हातांचे संरक्षण कसे कराल?
मोबाईल वापरताना शक्यतो दोन्ही हातांचा उपयोग करावा. एकाच अंगठ्याने सतत टायपिंग करणे टाळावे. ठरावीक अंतराने छोट्या विश्रांती घ्याव्यात. मनगट शक्यतो सरळ आणि आरामदायी स्थितीत ठेवावे. मोबाईल घट्ट पकडण्याऐवजी सैल पकडावा. अधिक टायपिंग करावे लागत असल्यास व्हॉईस-टू-टेक्स्टसारख्या सुविधांचा वापर करता येतो.