

रोजच्या रोज आंघोळ करणं हे मूलभूत स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यातही दिवसभर घराबाहेर राहणाऱ्या व्यक्तीला सर्व प्रकाराच्या प्रदूषणाला तोंड द्यावं लागतं. काही व्यक्तींना आंघोळीचा कंटाळा असतो. पण, खरंतर आंघोळ किंवा शरीराची घासून पुसून केलेली स्वच्छता फायदेशीर ठरत असते ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे.
केस, चेहरा, शरीराचा उघडा भाग यावर धूळ, धूर, अनेक रासायनिक रेणू, विषाणू, जीवाणू किंवा बुरशीचे कण चिकटतात. कपड्यांनी आच्छादलेल्या भागावर घाम असतो. रात्री झोपण्यापूर्वी शरीर आलेला स्वच्छ करणंही त्यामुळे हिताचं ठरतं.
कोमट पाण्याच्या स्नानाने दिवसभरातल्या श्रमांमुळे आलेला थकवा दूर होतो. झोप गाढ लागण्याची शक्यता वाढते. रात्रभर शांत झोपेतून जाग येण्याकरिता चेहरा धुणं आणि स्नान करणं या क्रिया उपयुक्ति ठरतात. चेहऱ्यावरच्या त्वचेतील स्पर्श आणि तापमान या संवेदनांचे स्वीकारक म्हणजे रिसेप्टर्स मेंदूतील पॉन्स या भागात संवेदना नेतात.
शरीराच्या अन्य भागांतील संवेदनादेखील इथूनच पुढे जातात. या मेंदूच्या भागात रेटिक्युलर फॉर्मेशन नावाचा एक पेशी समूह असतो. जाग येणं, लक्ष जाणं, मन केंद्रित करणं, या क्रियांना आवश्यक ती जाणीव निर्माण करण्याचं कार्य रेटिक्युलर फॉर्मेशनमध्ये होतं. थंड पाण्याने चेहरा धुतला आणि अंग घासत आंघोळ केली की या भागात चेतना निर्माण होते.
मांद्य, झापड, मरगळ झटकली जाते. उत्साह, चैतन्य, मनाची एकाग्रता वाढू लागते. आरोग्य राखलं जातं. सकाळी दिवस सुरू होताना आणि रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करण्याची सवय आरोग्यकारक मानली जाते ती या सगळ्या कारणांमुळेच !