ताणतणावाची ‘ही’ ७ लक्षणे माहीत आहेत का?

ताणतणावाची ‘ही’ ७ लक्षणे माहीत आहेत का?

[author title="डॉ. अतुल कोकाटे" image="http://"][/author]

ताणतणाव हे रक्तदाबाप्रमाणेच सायलेंट किलर डिसीज असल्याचे मनोविकारतज्ज्ञ सांगतात. अनेकदा तर एखाद्या व्यक्तीला आपण तणावाचे शिकार बनलेले कळतही नाही. अशा स्थितीत परिस्थिती बिघडण्याअगोदर ताणाची, तणावाची ताणतणाव- 'ही' ७ लक्षणे माहीत असणे गरजेचे लक्षणे ओळखणे गरजेचे आहे.

तणावाची अनेक कारणे असू शकतात. स्पर्धात्मक युगात प्रत्येकाला पुढे जायचे आहे. कोणाला सेलिब्रिटी व्हायचे, तर कोणाला परदेशात स्थायिक व्हायचे आहे. लहानपणापासूनच सचिन तेंडुलकर होण्याचे संस्कार केले जातात. यातूनच जीवघेणी स्पर्धा वाढत चालली आहे. मुलांच्या परीक्षेत पालकही तणावाखाली वावरत असतात. अपयशाची अनामिक भीती मानगुटीवर असल्याने त्यातून मार्ग काढण्यासाठी नानाविध उपाय केले जातात. यामुळे ताण कमी होण्याऐवजी वाढतच असतो. एकीकडे नोकरी, उद्योगाचा ताण तर दुसरीकडे पाल्याचे भवितव्य या कात्रीत सध्याची पिढी अडकली आहे.

या ताणामुळे शरीरावर विपरीत परिणाम होत असून, त्याचे दुष्पपरिणाम पन्नाशी, साठीनंतर दिसू लागतात. मात्र, आतापासूनच आपण काळजी घेतली, तर आपण ताणतणावाचे बळी ठरणार नाहीत. साधारणपणे शारीरिक रोगाचे लक्षणे दिसताच आपण डॉक्टरांकडे जातो आणि उपचार सुरू करतो. मात्र, नागरिक आपल्या मानसिक आजाराकडे दुर्लक्ष करतात. अशा वर्तणुकीचा तब्येतीवर परिणाम होतो. सुरुवातीला आपण दुर्लक्ष करतो. कारण त्याची लक्षणे आपल्याला ठाऊकच नाहीत. अशा स्थितीत आपल्याला लक्षणे माहीत असणे गरजेचे आहे. जेणेकरून वेळीच त्याच्यावर उपचार सुरू करता येतील.

वजनात बदल : तणावामुळे कार्टिसोल हार्मोन रीलिज होतो आणि त्यातून फॅट, प्रोटिन आणि कार्ब्सच्या मेटाबॉलिज्म प्रक्रियेत बदल होतात. अतिरिक्त कार्टिसोलमधून मेटाबॉलिज्मचा दर संथ होतो. तणावामुळे काही जण अधिक आहार करतात तर काहींचा आहार कमी होतो. या बदलामुळे शरीरातील वजनावर परिणाम होतो.

मेंदूत गोंधळ आणि सुस्त : जेव्हा तणावामुळे कार्टिसोल हार्मोनचे उत्सर्जन अधिक होऊ लागते, तेव्हा आपला मेंदू एकाग्रचित्ताने काम करू शकत नाही आणि अनेक लहान मोठ्या गोष्टी विसरू लागतो. अशा स्थितीत शरीरात व्हिटॅमिन-डी आणि बी-12 ची कमतरता निर्माण होते. कामात लक्ष लागत नाही किंवा एखादी गोष्ट लवकर समजत नाही. त्यामुळे मानसिक गोंधळाचा सामना करणारा व्यक्ती हा कमालीचा ताणाखाली येतो.

डोकेदुखी : तणावामुळे शरीरातील नस अकारण ताणली जाते आणि त्यातून डोकेदुखी किंवा डोके जड पडू लागते. जर मायग्रेनची तक्रार असेल तर ताणात आणखीच भर पडते आणि ही बाब अधिकच तापदायक व ताण देणारी ठरू शकते. अतिविचार, काळजी यामुळे मेंदूवर अकारण ताण येतो आणि परिणामी डोके दुखू लागते. या काळात झोपही कमी लागते. अपुर्‍या झोपेमुळे शरीराला पुरेसा आराम मिळत नाही. परिणामी तब्येतीचे वेळापत्रक बिघडून जाते.

अ‍ॅसिडिटी : तणावामुळे रुग्णाच्या पोटात नेहमीच गडबड राहते. गॅस आणि अ‍ॅसिडिटीच्या समस्येमुळे छातीत जळजळ, पोट फुगणे, ढेकर येतात. तणावामुळे इरिटेबल बाऊल सिंड्रोमच्या देखील तक्रारी होतात. आजकाल सर्वच जण घडाळ्याच्या काट्याप्रमाणे पळत असल्याने जेवणाकडे लक्ष दिले जात नाही. कसेतरी जेवण उरकायचे आणि बाहेर पडायचे ही वृत्ती वाढत चालली आहे. त्यामुळे अ‍ॅसिडिटीला निमंत्रण मिळते.

रॅशेस उमटणे : तणावाच्या स्थितीत आपल्या शरीरातील हिस्टामाईन नावाचे केमिकल रीलिज होऊ लागते. यामुळे शरीरावर रॅशेस येतात. ताणामुळे कमकुवत झालेल्या इम्यून सिस्टीममुळे आपली त्वचा ही कोणत्याही इरिटेंट म्हणजे क्रिम, साबण, लोशन यावर ओव्हररिअ‍ॅक्ट करते आणि नाजूक होते. हाता, पायावर लाल रंगाचे पुरळ उमटतात तसेच खाज सुटते.

केस गळणे : केस गळण्याची अनेक कारणे असू शकतात. मग ती शारिरीक असो किंवा मानसिक. अचानक एखाद्याचे केस गळू लागले तर त्वचारोगतज्ज्ञांना भेटणे गरजेचे आहे. जर त्यांच्याकडून समाधानकारक उपचार किंवा सल्ला मिळाला नाही, तर मनोविकारतज्ज्ञांशी चर्चा करायला हवी. डोक्यावरचे केस गळणे ही बाब तणावाचे लक्षण समजले जाते.

सर्दी, पडसे : जर सर्दी सारखी होत असेल आणि ती सहजासहजी कमी होत नसेल तर ते तणावाचे लक्षण मानले जाते. अमेरिकी तज्ज्ञांनी केलेल्या एका संशोधनात तणावामुळे इम्यूनसिस्टीम कमकुवत पडत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सर्दी, पडसे, खोकला यांसारख्या आजाराचा सामना करावा लागतो. साधारणत: तणावाखाली असण्याचे ही लक्षणे ढोबळमानाने सांगता येतील. सकारात्मक विचाराने, आनंदी वृत्तीने, खिलाडूवृत्तीने जीवनमान व्यतीत केले, तर मनावरचा ताण हलका होतो. त्यामुळे अकारण ताण घेतल्यामुळे काम तर होतच नाही, उलट बिघडण्याचीच शक्यता अधिक असते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news