पुढारी ऑनलाईन डेस्क: गर्भधारणेदरम्यान स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात. यामध्ये प्रामुख्याने हार्मोनल, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी, श्वसन, पाचक, मूत्र आणि असे बरेच बदल होतात. पण गर्भधारणेदरम्यान किंवा त्यानंतर स्त्रीच्या मेंदूमध्ये नेमकं काय बदल होतात, याविषयी अधिक माहिती अद्याप समोर आला नव्हती. परंतु सध्या एका नवीन संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. अशी बातमी 'इंडिया टुडे' ने दिली आहे.
नेचर न्यूरोसायन्स या वैज्ञानिक मसिकात या गर्भधारणेदरम्यानच्या स्त्रीयांच्या मेंदूतील बदला संबंधित संशोधन प्रकाशित झाले आहे. या नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की, गर्भधारणेदरम्यान स्त्रीच्या शरीराप्रमाणेच मेंदूमध्येही लक्षणीय बदल होतात. त्यातील काही तात्पुरत्या स्वरूपात असतात, तर काही अधिक काळ टिकतात.
संशोधनात गर्भधारणा होण्यापूर्वीपासून गर्भधारणेचे ९ महिने आणि गर्भ जन्मल्यानंतर दोन वर्षापर्यंत संबंधित स्त्रीच्या मेंदूचे २६ वेळा स्कॅनिंग करण्यात आले. यानंतर अभ्यासात असे आढळून आले की, मेंदूचा बाह्य स्तर, ज्याला ग्रे मॅटर म्हणतात, त्याचे प्रमाण कमी झाले होते, तर सखोल पांढरा पदार्थ, जो मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना संवाद साधण्यास मदत करतो, तो अधिक संरचित झाला होता. हे बदल गर्भधारणेच्या हार्मोन्स, एस्ट्रॅडिओल आणि प्रोजेस्टेरॉनच्या पातळीत वाढ झाल्यामुळे झाल्याचे देखील संशोधनातून समोर आले आहे. ग्रे मॅटरमधील घट हानिकारक आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.
ग्रे मॅटरमध्ये मेंदूच्या मज्जातंतूंच्या पेशींच्या पेशी असतात, तर पांढऱ्या पदार्थात लांब तंतू असतात जे संपूर्ण मेंदूमध्ये सिग्नल प्रसारित करतात. हा अभ्यास फक्त एका विषयावर केंद्रित आहे, असे न्यूरोसायंटिस्ट आणि या अभ्यासाच्या सह-लेखिका एलिझाबेथ क्रॅस्टिल यांनी स्पष्ट केले आहे. तसेच अद्याप काही स्त्रियांनी गर्भधारणेदरम्यान 'मॉमी ब्रेन' अनुभवले नसल्याचेही म्हटले आहे.
न्यूरोसायंटिस्ट आणि संशोधन अभ्यासाच्या सहलेखिका क्रॅस्टिल पुढे म्हणाल्या की, ज्या स्त्रीचा या संशोधनामध्ये अभ्यास केला आहे तिच्या गर्भधारणेवेळी ती ३८ वर्षाची होती. तिने एका निरोगी मुलाला जन्म दिला आहे. तो आज साडेचार वर्षाचा आहे. दरम्यान 'मातृ मेंदू प्रकल्प' (Maternal Brain Project) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संशोधनात इतर गर्भवती महिलांमध्ये देखील अशाच प्रकारचा समान बदल दिसून आला आहे. या संशोधनाचा उद्देश शेकडो महिलांपर्यंत अभ्यासाचा विस्तार करणे हा आहे, असेही त्या म्हणाल्या.
अभ्यासादरम्यान गर्भधारक स्त्रियांच्या स्कॅनिंगमध्ये असे दिसून आले की, मेंदूच्या 80% भागांमध्ये राखाडी पदार्थाचे प्रमाण सरासरी 4% ने कमी झाले. मुल जन्मानंतर यामध्ये थोडी पुनर्प्राप्ती झाली. परंतु हे प्रमाण पूर्व-गर्भधारणेच्या पातळीवर परत आले नसल्याचेही संशोधनात म्हटवे आहे. दुसरीकडे, गर्भधारणेच्या काळात मेंदूतील पांढऱ्या पदार्थाने संरचनेत 10% सुधारणा दर्शविली. तर मूलाच्या जन्मानंतर पूर्व-गर्भधारणेच्या स्थितीत परत येण्याआधी, दुसऱ्या आणि तिसऱ्या त्रैमासिकाच्या उत्तरार्धात शिखर गाठले.
मागील संशोधनात केवळ गर्भधारणेपूर्वी आणि नंतरच्या मेंदूच्या स्कॅनची तुलना केली गेली होती. परंतु शास्त्रज्ञांना गर्भधारणेदरम्यान मेंदू बदलत असल्याचे पाहण्याची ही पहिलीच वेळ आहे. पण हे आश्चर्यकारक आहे की आज 2024 मध्ये देखील, गर्भधारणेचा स्त्रियांच्या मेंदूवर कसा परिणाम होतो याबद्दल आपल्याला अजून फारच कमी माहिती आहे. हा अभ्यास उत्तरांपेक्षा अधिक प्रश्न उपस्थित करतो आणि आम्ही नुकतेच त्यांचे अन्वेषण करण्यास सुरुवात केली आहे, असेही न्यूरोसायंटिस्ट एलिझाबेथ क्रॅस्टिल म्हणाल्या.
संशोधनाच्या प्रमुख लेखिका लॉरा प्रिटशेट म्हणाल्या, "तारूण्यामध्ये येताना जे घडतात त्यामुळे मेंदू विशेषज्ञ बनतो. तसेच गर्भधारणेच्या काळात देखील मेंदू स्वतःला चांगले ट्यून करतो. काही बदल गर्भधारणेच्या शारीरिक मागण्यांना प्रतिसाद देखील असू शकतो आणि हे दर्शवितो की मेंदू किती अनुकूल होऊ शकतो."