तुम्हाला फिट राहायचं आहे? रोजच्या जगण्यात करा ‘हे’ बदल

तुम्हाला फिट राहायचं आहे? रोजच्या जगण्यात करा ‘हे’ बदल

[author title="डॉ. संतोष काळे" image="http://"][/author]

आजकाल फिटनेसविषयीची जागरूकता वाढली आहे, हा समाजात झालेला एक मोठा बदल आहे, पण दुसरीकडे ज्या व्यक्ती जागरूक नाहीत किंवा ज्यांना प्रयत्न करूनही यश येत नाही, त्यांच्यामध्ये उगाचंच निराशा जाणवताना दिसते. आपण जिममध्ये जात नाही, एरोबिक्स करत नाही यासारख्या गोष्टींचा सुप्त तणाव त्यांच्यात दिसतो. हा तणाव एका अर्थानं सकारात्मक आहे; पण थोडा विचार केला तर खरोखरीच फिट राहाणं अवघड असतं का हो?

फिट राहायचं असं कुणाला नाही वाटणार? कॉलेजमध्ये असताना मित्रांबरोबर शायनिंग मारताना किंवा कुणावर इंप्रेशन मारताना तर त्याची जास्तच गरज असते नाही? मग त्यासाठी कायम आहाराच्या चक्रात अडकायला नको किंवा जीममध्ये नुसतं घाम गाळत बसायला नको. रोजच्या जगण्यातही काही छोटे बदल केले तर आरामात फिट अ‍ॅन्ड फाइन राहता येते.
फिट राहण्यासाठी शरीरात कॅलरीज साठून त्यांचं चरबीत रूपांतर होत नाही ना या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं, पण ही क्रिया अगदी हळू होत असल्याने चटकन लक्षात येत नाही. ही चरबी साठू नये म्हणून माणसाने सतत अ‍ॅटिव्ह राहणं गरजेचं आहे. स्वत:ला अ‍ॅटिव्ह ठेवायचं तर जीवनशैलीत काही बदल करायलाच हवेत.कसं ते बघा.

बसल्या बसल्या काम केल्यानं बरेच प्रश्न निर्माण होतात. मग त्यावर उपाय म्हणजे जेवण झाल्यावर लगेच टीव्ही किंवा मोबाईल, लॅपटॉपसमोर ठाण मांडून बसू नका. घराबाहेर पडून चक्कर मारा. कोपर्‍यावरच्याच दुकानातून काहीतरी आणायचं झालं तर लगेच गाडीला कीक मारू नका. चालत जा. आठवड्यातून एकदा गाडी स्वत: स्वच्छ करायलाही हरकत नाही. गार्डनिंगसारखा तर व्यायाम नाही. अधूनमधून तिथेही घाम गाळायला हरकत नाही. घरच्या फर्निचरवर फडकं मारायला किंवा सफाई करायला मागेपुढे पाहू नका. घरातल्या या कामांना तुमचा हात लागला तर घरातलेही तुमच्यावर खूश झालेच म्हणून समजा. घरातही कितीतरी लहान गोष्टींसाठी आपण कुणाला तरी कामाला लावत असतो. पाण्याचा ग्लास स्वत: आणून घेण्यापासून ते चहाचा कप सिंकमध्ये ठेवण्यापर्यंत कितीतरी कामात ऊर्जा खर्च होत असते.

लहान मुलांना खेळताना नुसतं बघू नका कधीतरी त्यांच्याबरोबर खेळाही. लिफ्टचा वापर कमीत कमी कसा करता येईल ते बघा. पहिल्या दुसर्‍या मजल्यावर राहात असाल तरी दोन-तीनदा वर-खाली कराच. घरातले केर काढणं किंवा फरशी पुसण्यासारखे व्यायाम तर तुमची तब्ब्येत ठणठणीत ठेवतीलच पण कामाबाबत अवलंबून राहणंही कमी करतील. पायी चालण्याचे गोडवे अनेकांनी गायले आहेत. त्यासाठी रोज अर्धा ते पाऊण तास पायी फिरायला जा. कधी मित्राच्या घरी नोटस् पोहचवायच्या असतील किंवा कुणाला कंपनी देत त्यांच्या घरचा रस्ता माहीत करून घ्यायचा असेल, बहाणा कोणताही असू दे,पायी चालण्याला महत्त्व द्या. कधीतरी आपलीच आपल्याशी स्पर्धा लावा. अमूक एक अंतर कापायला कालच्यापेक्षा कमी वेळ लागला पाहिजे हे उद्दिष्ट कायम डोळ्यासमोर असू द्या. जीवनशैलीत असे छोटे मोठे बदल केलेत तर तुमची कामंही वेळेवर होतील, दुसर्‍यांवर अवलंबून राहणंही कमी होईल आणि हो कधी कधी पैसेही वाचतील शिवाय आरोग्याची हमी मिळेल ती वेगळी!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news