Normal Delivery After C Section: सिझेरियननंतर दुसऱ्या बाळाची नॉर्मल डिलिव्हरी शक्य; मात्र कोणत्या महिलांसाठी हा पर्याय सुरक्षित?

गर्भाशयावरील छेद, पहिल्या सिझेरियनचे कारण आणि दोन प्रसूतींमधील अंतर महत्त्वाचे; आई-बाळाची सुरक्षितता पाहून डॉक्टर घेतात निर्णय
Pregnancy
PregnancyPudhari
Published on: 
Updated on: 

पहिल्या बाळाच्या जन्मासाठी सिझेरियन शस्त्रक्रिया झाली असेल, तर दुसऱ्या वेळीही सिझेरियनच करावे लागेल का, असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. मात्र, एकदा सिझेरियन झाले म्हणजे प्रत्येक वेळी सिझेरियनच करावे लागते असे नाही. काही महिलांना दुसऱ्या गर्भधारणेत नॉर्मल डिलिव्हरीचा पर्याय निवडता येऊ शकतो. याला वैद्यकीय भाषेत व्हीबॅक (VBAC – Vaginal Birth After Caesarean) असे म्हणतात. मात्र, हा पर्याय सर्वच महिलांसाठी योग्य असेल असे नाही. आई आणि बाळाची सुरक्षितता लक्षात घेऊन डॉक्टर याबाबत निर्णय घेतात.

सिझेरियननंतर नॉर्मल डिलिव्हरी कोण करू शकते?

पहिल्या सिझेरियननंतर दुसऱ्या वेळी नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्न करता येईल की नाही, हे काही महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून असते.

१. गर्भाशयावर दिलेल्या छेदाचा प्रकार : पहिल्या सिझेरियनवेळी गर्भाशयाच्या खालच्या भागात आडवा छेद दिला असेल, तर अनेक महिलांसाठी नॉर्मल डिलिव्हरीचा पर्याय विचारात घेता येतो. मात्र, केवळ पोटावर दिसणाऱ्या व्रणावरून गर्भाशयावर कोणत्या प्रकारचा छेद दिला होता, हे समजत नाही. त्यासाठी आधीच्या शस्त्रक्रियेची कागदपत्रे तपासणे आवश्यक असते. गर्भाशयावर उभा छेद दिला असेल किंवा यापूर्वी गर्भाशयाला तडा गेला असेल, तर नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो.

२. पहिल्या सिझेरियनचे कारण : पहिल्या प्रसूतीवेळी बाळाची स्थिती चुकीची असणे, बाळ आडवे असणे किंवा त्या गर्भधारणेपुरती मर्यादित असलेली काही समस्या यामुळे सिझेरियन करावे लागले असेल, तर दुसऱ्या वेळी नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता असू शकते. मात्र, पहिल्या सिझेरियनमागे आईच्या प्रसूतीशी संबंधित कायमस्वरूपी अडचण असेल, तर डॉक्टर वेगळा निर्णय घेऊ शकतात.

३. आई आणि बाळाची सध्याची प्रकृती : सध्याच्या गर्भधारणेत बाळाचे डोके खाली असणे, बाळाची प्रकृती चांगली असणे आणि आईला नॉर्मल डिलिव्हरीमध्ये अडथळा ठरणारी कोणतीही समस्या नसणे महत्त्वाचे असते. याशिवाय गर्भधारणेदरम्यान निर्माण झालेल्या इतर आरोग्यविषयक समस्यांचाही विचार केला जातो.

४. दोन प्रसूतींमधील अंतर : पहिल्या सिझेरियननंतर पुढील गर्भधारणा किती काळाने झाली, हेदेखील महत्त्वाचे असते. दोन गर्भधारणांमधील अंतर कमी असल्यास गर्भाशयाच्या जुन्या व्रणाशी संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे डॉक्टर या अंतराचाही विचार करतात.

कोणत्या महिलांसाठी नॉर्मल डिलिव्हरीचा पर्याय योग्य नसतो?

गर्भाशयावर आधी उभा छेद दिलेला असेल, गर्भाशयाला यापूर्वी तडा गेला असेल किंवा वार (प्लॅसेंटा) गर्भाशयाच्या मुखाजवळ किंवा त्यावर असेल, तर नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्न सुरक्षित नसू शकतो. अशा परिस्थितीत सिझेरियन करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. एकापेक्षा अधिक वेळा सिझेरियन झाले असलेल्या काही महिलांमध्येही विशिष्ट परिस्थितीत नॉर्मल डिलिव्हरीचा विचार केला जाऊ शकतो. मात्र, त्यासाठी अधिक काळजीपूर्वक तपासणी आणि तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक असतो.

व्हीबॅकचे फायदे आणि संभाव्य धोके काय?

नॉर्मल डिलिव्हरी यशस्वी झाल्यास मोठ्या शस्त्रक्रियेची गरज टाळता येते. तसेच रुग्णालयात कमी दिवस राहावे लागू शकतात आणि प्रसूतीनंतर आई लवकर बरी होऊ शकते. भविष्यात आणखी मुले होणार असतील, तर वारंवार सिझेरियनमुळे निर्माण होणाऱ्या काही संभाव्य धोक्यांपासूनही बचाव होऊ शकतो.

मात्र, नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्न यशस्वी झाला नाही, तर तातडीने सिझेरियन करावे लागू शकते. काही प्रकरणांमध्ये प्रसूतीदरम्यान गर्भाशयाच्या जुन्या व्रणाला तडा जाण्याचा धोकाही असतो. त्यामुळे व्हीबॅकचा प्रयत्न अशा रुग्णालयातच करावा, जिथे बाळाच्या हृदयाचे ठोके सतत तपासण्याची सुविधा आणि गरज पडल्यास तातडीने सिझेरियन करण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वैद्यकीय कर्मचारी असणेही आवश्यक आहे.

नॉर्मल डिलिव्हरी की सिझेरियन, निर्णय कसा घ्यावा?

पहिल्या सिझेरियननंतर दुसऱ्या बाळाच्या प्रसूतीबाबत गर्भधारणेच्या सुरुवातीपासूनच स्त्रीरोगतज्ज्ञांशी चर्चा करावी. पहिल्या शस्त्रक्रियेची कागदपत्रे, सध्याच्या गर्भधारणेतील तपासण्या आणि आई-बाळाची प्रकृती यांचा विचार करून डॉक्टर योग्य पर्याय सुचवतात. नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्न सुरू असतानाही काही अडचण निर्माण झाल्यास सिझेरियन करण्याची तयारी ठेवणे गरजेचे आहे.

थोडक्यात, पहिल्या सिझेरियननंतर दुसऱ्या बाळासाठी नॉर्मल डिलिव्हरी शक्य असू शकते. मात्र, प्रत्येक महिलेची परिस्थिती वेगळी असल्याने केवळ नॉर्मल डिलिव्हरीचा आग्रह धरण्यापेक्षा आई आणि बाळासाठी सुरक्षित असलेला पर्याय निवडणे अधिक महत्त्वाचे आहे.

डॉ. सुप्रिया पुराणिक, संचालक, प्रसूती व स्त्रीरोग विभाग आणि आयव्हीएफ, मणिपाल हॉस्पिटल्स मॉमस्टोरी, शिवाजीनगर, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.