Nerve Pain | नसांच्या वेदना आणि त्याचे निवारण

Nerve Pain |
Nerve Pain | नसांच्या वेदना आणि त्याचे निवारण
Published on: 
Updated on: 

डॉ. आरती जाधव

नसांच्या वेदना (न्यूरोपॅथिक पेन) हा दीर्घकालीन वेदना (क्रॉनिक पेन) चा एक प्रकार आहे. जो कायिक संवेदी मज्जासंस्थेशी निगडीत आहे. कायिक मज्जासंस्था स्पर्श, दाब, तापमान, वेदना आणि शरीराच्या अवयवांची हालचाल ओळखण्याचे व त्यावर प्रक्रिया करण्याचे काम करते.

काही आजांरामुळे मज्जासंस्थेच्या कार्यात बिघाड होतो व रुग्णाला असह्य वेदना होऊ लागतात. असे आजार मधुमेह, नागिणीनंतरच्या वेदना, किमोथेरपीमुळे होणाऱ्या वेदना, चेहऱ्याच्या नसेच्या वेदना ज्याला वैद्यकीय भाषेत ट्रायजेमिनल न्यूराल्जिया म्हणतात. मेंदूचे काही आजार जसे स्ट्रोक, प्रमाणाबाहेरचे मद्यपान व ‘ब’ जीवनसत्वाची कमतरता ऑपरेशननंतरच्या नसांच्या वेदना, मनगटातील नसेचे दुखणे (कार्पल टनेल सिंड्रोम), कुष्ठरोग, सी आर पी एस, शरीराचा एखादा अवयव काढून टाकल्यानंतर होणाऱ्या वेदना या आहेत. या आजारांचे वार्षिक १००० नवीन रुग्णांमध्ये हे प्रमाण ८.२ असे आहे. सर्वसाधारणपणे या आजाराचा प्रभाव ७-१० टक्के आहे.

स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा या आजाराचे प्रमाण जास्त आहे. असे रुग्ण सुई टोचल्यासारखे, पिन टोचल्यासारखे, जळजळ, दाह, निर्माण करणाऱ्या वेदना, बधिरपणा किंवा तो भाग थंडगार पडणे अशा स्वरूपाच्या तक्रारी घेऊन ओपीडीला येत असतात.आजाराचे निदान व तपासण्या करताना प्रथम रुग्णाची सर्व माहिती घेतली जाते. नेहमीच्या तपासण्यांबरोबरच नसांची संवेदना वाहून नेण्याची क्षमता, तीव्रता व स्नायूंची कार्यक्षमता या तपासण्या केल्या जातात.

भारतामध्ये डायबेटीसचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. मधुमेहामुळे होणाऱ्या नसांची वेदना चार प्रकारची असते.

1. परिधीय मज्जातंतू कमजोरी (पेरिफेरल न्यूरोपॅथी) – हा कॉमन प्रकार आहे. सुरुवात पायांपासून होते व नंतर हातापर्यंत पसरते (स्टॉकींग – ग्लोव्ह पॅटर्न) यामध्ये स्नायूंमध्ये अशक्तपणा हातापायाला मुंग्या, जळजळ, झिणझिण्या येतात.

2. स्वायत्त मज्जासंस्था कमजोरी (ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी) - यामध्ये शरीरांतर्गत अवयवांवर Control ठेवणाऱ्या नसांना इजा पोहोचते. त्यामुळे हृदयाचे ठोके, रक्तदाब, पचनक्रिया, लघवीवर नियंत्रण यावर परिणाम होतो.

3. प्रॉक्सिमल न्यूरोपॅथी - हा तसा दुर्मीळ प्रकार आहे. यात कटिप्रदेशातील नसांना इजा होते.

4. फोकल मोनोन्यूरोपॅथी - एखाद्या विशिष्ट नसेला अचानक इजा होते. उदा. मनगटाची नस.

साखरेचे प्रमाण सतत जास्त असणे हेच यामागचे मुख्य कारण असते.

नागिणीनंतरच्या वेदना-

या प्रकारात नागिणीचे दुखणे बरे होते. पण साधारण ३ ते ६ महिन्यांनंतर जिथे नागिणीची रॅश आली होती, तिथे वेदना सुरू होतात. नागीण हा एक व्हॅरिसेला झोस्टर नावाच्या विषाणूमुळे होणारा आजार आहे. जो नसांना इजा पोहोचवतो व रुग्णाला जळजळ, बर्निंग पेन, असह्य वेदना होऊ लागतात. अगदी त्वचेचा कपड्यांशी संपर्क आला तरी वेदना होतात. रुग्णाला जरा हात लावला तरी असह्य कळा सुटतात, ज्याला वैद्यकीय भाषेत अलोडायनिया म्हणतात.

तिसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे ट्रायजेमिनल न्यूराल्जिया - चेहऱ्याच्या नसेच्या वेदना या प्रकारात रुग्णाला त्याच्या चेहऱ्याला अचानक तीव्र स्वरूपाच्या इलेक्ट्रिक शॉक बसल्यासारख्या वेदना होतात. थंड पदार्थ खाल्ले, ब्रश करताना, दाढी करताना, चावताना, गार वाऱ्याची झुळूक आली की प्रामुख्याने कळ येते. कळ काही सेकंद ते काही मिनिट राहते. रुग्ण वेदनेने हैराण होतो. खाताना खूप त्रास होतो, त्यामुळे अन्न नको वाटते. वजन कमी होऊ लागते. विशेष म्हणजे दाढेचे दुखणे समजून दाढ ही काढली जाते व परिणाम शून्य. अचूक निदानासाठी मेंदूचा MRI केला जातो. हे झाले कॉमन न्यूरोपॅथिक पेनचे प्रकार साधारण सर्वच प्रकारांमध्ये रुग्णाला झिणझिण्या येणे, मुंग्या येणे, इलेक्ट्रिक शॉक इ. प्रकारच्या वेदना होतात.

दीर्घकालीन वेदना निवारण (क्रॉनिक पेन मॅनेजमेंट) ही भूलशास्त्राची विस्तारलेली शाखा आहे. भूलतज्ज्ञ ऑपरेशनदरम्यान होणाऱ्या वेदना तर दूर करतातच, पण त्याचबरोबर दीर्घकालीन वेदना निवारण या विषयाचे ज्यांनी विशेष प्रशिक्षण घेतलेले असते, असे डॉक्टर नक्कीच मदत करू शकतात. सुरुवातीला वेदना कमी करण्यासाठी काही गोळ्या, मलम, तेल इ. दिले जाते, जे नेहमी वापरल्या जाणाऱ्या पेन किलर गोळ्यांपेक्षा वेगळे असते. कधीकधी औषधी पॅचही दिले जाते. औषंधाबरोबरच नर्व्ह ब्लॉक, गॅलिऑन ब्लॉकचे इंजेक्शन दिले जाते. भूलतज्ज्ञ डॉक्टर यामध्ये निष्णात असतात. हे इंजेक्शन ऑपरेशन थिएटरमध्ये सी आर्म नावाचे मशिन किंवा सोनोग्राफीचे मशिन वापरून दिले जाते. या इंजेक्शनमुळे नसांची मेंदूकडे वेदना वाहून न्यायची क्षमता कमी होते. याबरोबरच रुग्णाला सलाईनमधूनही काही औषधे दिली जातात. ट्रायजेमिनल न्यूराल्जियाच्या आजारामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी मशिनच्या साहाय्याने नस बधीर केली जाते. अब्सील्यूट अल्कोहोलसारखे औषधही वापरले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news