Mobile Addiction: 'जेन झी'चा बुद्ध्यांक पालकांपेक्षाही कमी? मोबाईलचा मेंदूवर काय होतोय परिणाम? पाहा व्हिडिओ

screen time impact on kids: डिजिटल तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून असल्यामुळे 'जनरेशन जी'चा (१५ ते २७ वयोगट) बुद्ध्यांक त्यांच्या पालकांच्या पिढीपेक्षा कमी झाला आहे. पालकांनी काय करावे?

नवी दिल्ली: गाझियाबादमध्ये 'कोरियन लव्ह गेम'चा टास्क पूर्ण करण्याच्या नादात तीन सख्या बहिणींनी नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले. या घटनेमुळे मुलांचे मोबाईलचे व्यसन आणि त्यातून येणारे नैराश्य हा पुन्हा एकदा चिंतेचा मोठा विषय ठरला आहे. या बहिणींच्या डायरीतून हा निर्णय मोबाईलच्या व्यसनाचाच परिणाम असल्याचे समोर आले आहे.

स्क्रीन टाईम आणि वाढते नैराश्य

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दोन वर्षांपर्यंतच्या मुलांनी स्क्रीन पाहू नये, परंतु भारतात ६१% मुले दोन वर्षांच्या आधीच स्क्रीन पाहू लागतात. ज्या मुलांचा स्क्रीन टाईम ४ तासांपेक्षा जास्त आहे, त्यांच्यात नैराश्याचे प्रमाण २६% इतके जास्त आहे. ५० टक्क्यांहून अधिक किशोरवयीन मुले दररोज ४ तासांपेक्षा जास्त वेळ स्क्रीनसमोर घालवत आहेत, ज्यामुळे त्यांच्यात स्थूलपणा, चिडचिडेपणा आणि झोप पूर्ण न होण्याच्या समस्या निर्माण होत आहेत.

बुद्ध्यांक घटला

न्यूरो शास्त्रज्ञ डॉ. जरेड कोनी हॉरवॉक यांच्या दाव्यानुसार, डिजिटल तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून असल्यामुळे 'जनरेशन जी'चा (१५ ते २७ वयोगट) बुद्ध्यांक त्यांच्या पालकांच्या पिढीपेक्षा कमी झाला आहे. मुले अभ्यासासाठी किंवा कोणत्याही माहितीसाठी त्वरित गुगल किंवा एआयचा वापर करतात, ज्यामुळे त्यांची स्वतःची विचार करण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता कमी होत आहे.

या दुष्परिणामांमुळे स्वीडनसारख्या देशांनी शाळांमधून डिजिटल गॅजेट्स काढून पुन्हा कागद, पेन आणि छापील पुस्तकांकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रान्स, नेदरलँड आणि ब्रिटननेही शाळांमध्ये टॅबलेट्स आणि लॅपटॉपच्या वापरावर मर्यादा आणल्या आहेत. संशोधनानुसार, माणूस स्क्रीनपेक्षा सखोल अभ्यास आणि संवादातून अधिक चांगले शिकतो.

पालकांनी काय करावे?

शिक्षण तज्ज्ञांनुसार, मुलांचे रडणे थांबवण्यासाठी त्यांच्या हातात स्मार्टफोन देण्याची घाई पालकांनी करू नये. अशा प्रकारे मुले हळूहळू मोबाईलच्या विळख्यात अडकतात, ज्याचे परिणाम भविष्यात घातक ठरू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news