

हवामानात सतत होणारे बदल आणि बदलत्या वातावरणामुळे मायग्रेनच्या रुग्णांना त्याचा अधिक त्रास होतो. विशेषत: तापमानात अचानक झालेला बदल, दमट हवामान, प्रचंड उकाडा किंवा खूप थंडी या सगळ्यांचा थेट परिणाम डोकेदुखीवर होतो. जीवनशैलीतील काही ठराविक बदल आणि नैसर्गिक उपायांनी ही अस्वस्थता दूर करता येते.
डॉ. सुनील कुट्टी
मायग्रेनचा त्रास असलेल्या व्यक्तींची हवामान बदलले की डोकेदुखी वाढते. भरपूर सूर्यप्रकाश किंवा ढगाळ वातावरणदेखील मायग्रेनचा त्रास वाढवू शकते. यासाठी औषधे अनेकदा आवश्यक असली तरीही, हवामान बदलादरम्यान काही नैसर्गिक उपाय हे मायग्रेनची वारंवारता आणि तीव्रता कमी करण्यास मदत करतात.
हायड्रेशन : डिहायड्रेशनमुळे मायग्रेनची तीव्रता आणखी वाढते त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी प्या, किमान 3 ते 4 लिटर पाणी प्यावे. हायड्रेटेड राहिल्याने मायग्रेनची समस्या टाळण्यास मदत होईल.
पुरेशी झोप घ्यावी : डोकेदुखी टाळण्यासाठी झोपेच्या दिनचर्येचे पालन करावे. डोकेदुखी टाळण्यासाठी रात्री किमान 8 तासांची शांत झोप घेणे गरजेचे असते. पुरेशी झोप घेतल्याने डोकेदुखी टाळता येते.
संतुलित आहाराचे सेवन करा : प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन टाळावे, जेवण करू नका आणि आहारात ताजी फळे, भाज्या आणि तृणधान्यांचा समावेश करावा. त्यामुळे शारीरिक ऊर्जेची पातळी स्थिर ठेवता येते.
कॅफिनयुक्त पदार्थ आणि अल्कोहोलचे सेवन टाळावे : हे शरीराला डिहायड्रेट करतात. त्यामुळे समस्या वाढतात.
कोल्ड कॉम्प्रेस : कोल्ड कॉम्प्रेस म्हणजेच कपाळावर थंड असे पॅक ठेवणे फायदेशीर ठरते, ज्यामुळे डोकेदुखीपासून नक्कीच आराम मिळू शकतो.
योग, ध्यान आणि दीर्घ श्वासोच्छ्वासाचे व्यायाम मानसिक शांतता राखण्यात आणि मायग्रेनचा त्रास टाळण्यात मदत करतात. तसेच व्यायामामुळे रक्त प्रवाह सुधारण्यास आणि मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत होते.
रोजनिशी लिहा : आपल्याला डोकेदुखीचा अधिक त्रास केव्हा व कशामुळे होतो हे समजून घेण्यासाठी तसेच हवामानातील बदलामुळे वाढणारा त्रास आणि लक्षणांची नोंद करण्यासाठी आपली रोजनिशी फायदेशीर ठरते. वारंवार मायग्रेनचा त्रास होत असेल तर या नोंदींसह डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
दरवेळी जाणवणारी डोकेदुखी म्हणजे मायग्रेन असेलच असे नाही. जर वेदना खूप तीव्र असतील, वारंवार होत असतील, पॅटर्न बदलत असतील किंवा न्यूरोलॉजिकल, व्हिज्युअल किंवा असामान्य लक्षणे असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य राहील.