Metabolism and Fitness | चयापचय क्रिया आणि फिटनेस

Metabolism and Fitness |
Metabolism and Fitness | चयापचय क्रिया आणि फिटनेस
Published on
Updated on

डॉ. संतोष काळे

आपले वजन आणि चयापचय क्रियेत संबंध आहेच, पण लठ्ठपणाचे कारण चयापचय क्रिया नसते. आपली रोगट आणि अनियमित दिनचर्येमुळे शरीराची चयापचय क्रिया मंद होत जाते आणि त्याची लक्षणे लठ्ठपणाच्या रूपात दिसू लागतात. चयापचय क्रिया आपोआप मंद होत नाही. आपली दिनचर्या त्यासाठी कारणीभूत असते.

चयापचय क्रिया म्हणजे काय?

आपण जे खातो, पितो, त्याला पचवून त्याचे ऊर्जेत रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे चयापचय क्रिया. इंग्रजीत याला ‘मेटाबॉलिजम’ असे म्हणतात. साध्या शब्दांत सांगायचे तर ही एक अशी प्रक्रिया आहे की जी कॅलरीचे ऊर्जेत रूपांतर करते. आपल्या शरीराला सतत ऊर्जेची आवश्यकता असते. शरीरात चयापचय क्रिया २४ तास सुरू असते. आपण विश्रांती घेत असतो किंवा झोपलेलो असतो तेव्हा ही क्रिया सुरूच असते. आपण झोपतो तेव्हा शरीराच्या अंतर्गत क्रिया म्हणजे रक्तप्रवाह, श्वासोच्छ्‌वास, पेशींची दुरुस्ती यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते.

चयापचय क्रिया दोन प्रकारची असते. बीएमआर म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट आणि आरएमआर म्हणजे रेस्टिंग मेटाबॉलिक रेट. आपण विश्रांती घेत असतानाही आपले शरीर ऊर्जा खर्च करत असते. आपण दिवसभर जितक्या कॅलरींचे सेवन केलेले असते, त्याच्या ७५ टक्के खर्च आरएमआर करतो. उरलेल्या कॅलरी पचन आणि अन्य शारीरिक हालचालींसाठी असतात. आता प्रश्न असा निर्माण होतो की आपल्याला किती कॅलरींची गरज असते? सर्वसाधारणपणे आरएमआरसाठी एका प्रौढ महिलेला १२०० कॅलरींची गरज असते. तर २०० ते ४०० अतिरिक्त कॅलरींची इतर शारीरिक हालचालींसाठी गरज असते. पुरुषांसाठी १३०० कॅलरी आरएमआरसाठी आवश्यक असतात, तर शारीरिक हालचालींसाठी त्यांना अतिरिक्त ४०० ते ६०० कॅलरींची आवश्यकता असते. अर्थात प्रत्येकाची शारीरिक हालचाल, सक्रियता वेगवेगळी असते, त्यामुळे त्यांच्या कॅलरी खर्च होण्याचे प्रमाणही वेगवेगळे असते. आपल्या शरीरात जितक्या कॅलरी खर्च होत नाहीत, त्या चरबीच्या रूपात शरीराच्या वेगवेगळ्या भागांत साठवल्या जातात आणि त्यातूनच लठ्ठपणा निर्माण होतो. चयापचय क्रिया कमी किंवा जास्त होते तेव्हा त्याचा परिणाम शरीराच्या वजनावर दिसू लागतो. चयापचय क्रिया कमी झाली तर शरीराचे वजन एके ठिकाणीच स्थिर राहू शकते. चयापचय क्रियेबरोबरच आणखी एक गोष्ट असते ती म्हणजे कॅटाबॉलिक रेट. कॅटाबॉलिक रेट वाढला की शरीराचे वजन कमी होऊ लागते.

थायरॉईड आणि ‘ड’ जीवनसत्त्वाची चाचणी करणे इष्ट

अनेक वेळा हार्मोन्समध्ये होणार्‍या बदलांमुळेही चयापचय क्रिया मंदावते. त्यासाठी डॉक्टरांकडून तपासणी करून थायरॉईड हार्मोन्स व्यवस्थित काम करत आहेत की नाही हे जाणून घ्या. थायरॉईड ग्रंथी निष्क्रिय किंवा मंद गतीने काम करत असतील तर त्याचा परिणाम शारीरिक हालचाल मंद होण्यात होतो आणि त्यामुळे चयापचय क्रियाही कमी होते. ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असेल तरीही वजन हळूहळू कमी होऊ लागते. अन्य हार्मोन्समध्येही गडबड होते. म्हणूनच ‘ड’ जीवनसत्त्वाची तपासणी करून घेणे आवश्यक असते.

चयापचय क्रियेवर परिणाम करणारे घटक

सकाळच्या वेळी चयापचय क्रिया जलद होते. तुमची दिनचर्या व्यस्त असेल तर ऊर्जेची गरज आणि खर्च वेगाने होते. म्हणूनच सकाळी पौष्टिक नाश्ता करणे आवश्यक असते. संध्याकाळी आपली कामे कमी होतात. साहजिकच शारीरिक हालचालही कमी होते. चयापचय क्रियाही मंदावते. म्हणूनच संध्याकाळी हलका आहार घ्यावा, असे सांगितले जाते.

सकाळच्या वेळी नाश्ता न करणे आरोग्यासाठी चांगले नाही. एकदम दुपारीच जेवल्याने चयापचय क्रियेवर वाईट परिणाम होतो. सकाळी उठल्यावर दीड ते दोन तासांच्या आता आपण काही तरी पौष्टिक खाणे आवश्यक असते. सकाळी योग्य वेळी नाश्ता केल्यावर दुपारी आणि संध्याकाळचे जेवणही योग्य वेळेतच केले जाते. खाण्यापिण्यातील नियमितपणाचा चयापचय क्रियेवर चांगला परिणाम होतो.

महिलांची चयापचय क्रिया पुरुषांच्या तुलनेत कमी असते. मासिक पाळीच्या चार-पाच दिवसांत सर्वसाधारणपणे महिला व्यवस्थित आहार घेत नाहीत. अनेकदा या काळात शारीरिक हालचालही होत नाहीत. चार-पाच दिवसांच्या काळात आहारात आलेल्या अनियमितपणामुळे चयापचय क्रियाही मंदावते. याशिवाय सकाळचा नाश्ता करण्याबाबतही महिला फारशा उत्साही नसतात. त्याचाही विपरीत परिणाम होतो.

चयापचय क्रिया केवळ पौष्टिक खाण्यापिण्याने वाढते असे नाही. नियमित व्यायामामुळे अतिरिक्त ऊर्जा खर्च होते आणि चयापचय क्रिया व्यवस्थित ठेवते.

आपण घेत असलेल्या जेवणाचे छोट्या कणांत आणि त्यानंतर ऊर्जेत रूपांतर होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. आपल्या शरीरात पाणी कमी असेल तर चयापचय क्रिया मंदावेल. म्हणूनच ताजी फळे आणि भाज्या यांचा आहारात समावेश करावा. मधुमेह किंवा हृदयविकाराच्या रुग्णांनी याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news