Liver Health | निसर्गाचा चमत्कार! स्वतःची पुनर्निर्मिती करणारा शरीरातील एकमेव अवयव; जाणून घ्या यकृताची जादू

Liver Health |
Liver Health | निसर्गाचा चमत्कार! स्वतःची पुनर्निर्मिती करणारा शरीरातील एकमेव अवयव; जाणून घ्या यकृताची जादू
Published on
Updated on

डॉ. राजेश जोशी

मानवी शरीरातील यकृतामध्ये इतर अवयवांच्या तुलनेत स्वतःची पुनर्निर्मिती करण्याची आणि झालेल्या नुकसानीतून स्वतःला बरे करण्याची एक अद्‌भुत नैसर्गिक क्षमता असते.

सध्याच्या काळात यकृताचे आजार ही एक मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे. लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारख्या आधुनिक जीवनशैलीशी संबंधित समस्यांचा थेट संबंध यकृताच्या आरोग्याशी जोडलेला आहे. शरीरातील इतर अवयवांना दुखापत होते, तेव्हा तिथे निरुपयोगी व्रण तयार होतात. परंतु, यकृत स्वतःचे निकामी भाग पुन्हा जसेच्या तसे तयार करू शकते.

यामधील मुख्य कार्यरत पेशींना ‘हेपेटोसाइटस्‌’ म्हणतात. यकृताला दुखापत झाल्यास किंवा शस्त्रक्रियेद्वारे त्याचा काही भाग काढल्यास या पेशी वेगाने विभागल्या जातात आणि नवीन पेशी तयार करतात. यादरम्यान, शरीरातील चयापचय प्रक्रिया खंडित न होता सुरू राहावी यासाठी यकृताच्या निरोगी पेशींचा आकार वाढतो. काही कालावधीत यकृत त्याचा मूळ आकार आणि कार्यक्षमता पूर्णपणे परत मिळवते.

यकृताची पुनर्निर्मिती अत्यंत शिस्तबद्ध प्रक्रिया असून ती 3 टप्प्यांत पार पडते.

प्रारंभिक टप्पा : यकृताला दुखापत झाल्यानंतर किंवा शस्त्रक्रिया झाल्यावर अवघ्या काही तासांत हा टप्पा सुरू होतो. शरीरातील विशिष्ट प्रथिने (उदा. ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर अल्फा आणि इंटरल्युकिन ६) हेपेटोसाईटस् पेशींना नवीन पेशी तयार करतात.

प्रसरण टप्पा : या टप्प्यात हेपेटोसाइट ग्रोथ फॅक्टर आणि एपिडर्मल ग्रोथ फॅक्टर हे पेशींच्या जलद विभाजनाला गती देतात. यामुळे खराब ऊतींची जागा नवीन निरोगी ऊती घेतात.

अंतिम टप्पा : पेशींची अमर्याद वाढ शरीरासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे, यकृत त्याच्या आवश्यक आकारात आल्यानंतर ‘ट्रान्सफॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर बीटा’ सारखे मार्ग या पेशीविभाजनाच्या प्रक्रियेला सुरक्षितपणे थांबवतात. यकृत किती दिवसांत बरे होईल, हे त्याला झालेल्या नुकसानीच्या तीव्रतेवर अवलंबून असते. शस्त्रक्रियेद्वारे यकृताचा भाग कापला असल्यास, एक निरोगी यकृत ३० ते ६० दिवसांत त्याचा मूळ आकार परत मिळवू शकते. अल्कोहोलिक हिपॅटायटीस (दारूमुळे आलेली सूज) असल्यास, मद्यसेवन पूर्णपणे बंद केल्यास ३ ते ६ महिन्यांत यकृताच्या कार्यात लक्षणीय सुधारणा होते.

यकृताची पुनर्निर्मिती करण्याची क्षमता अफाट असली तरी त्यालाही एक मर्यादा आहे. यकृतावर सतत विषारी घटकांचा (उदा. अति प्रमाणात दारू पिणे) मारा होत राहिला किंवा दीर्घकाळ विषाणूजन्य संसर्ग राहिला, तर यकृतावर कायमस्वरूपी जखमा होतात. या गंभीर स्थितीला ‘लिव्हर सिरोसिस’ म्हणतात. सिरोसिसच्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर यकृताची स्वतःला बरे करण्याची क्षमता कायमची नष्ट होते. यामुळे कावीळ, पोटातील रक्तस्राव, पोटात पाणी होणे (असायटिस) आणि किडनी, मेंदू व फुफ्फुसांचे कार्य निकामी होणे यांसारख्या गंभीर समस्या उद्‌भवतात. या अंतिम टप्प्यात केवळ लिव्हर ट्रान्सप्लांट हाच एकमेव पर्याय उरतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news