सुधारा नेत्रारोग्य

सुधारा नेत्रारोग्य
Published on
Updated on

निसर्गाने दिलेल्या शरीरात सर्वात संवेदनशील अवयव म्हणजे डोळे. तरीही त्यांची विशेष काळजी आपण घेत नाही. शरीर तंदुरुस्त राहाण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करतो, नियमित व्यायाम करतो तर चेहर्‍याचीही विशेष निगा राखतो. त्यासाठी विविध प्रकारची सौंदर्य उत्पादने वापरतो. त्यात डोळ्यांचा मेकअप करतो मात्र डोळ्यांची निगा राखायचे विसरतो. त्यामुळे कालांतराने डोळ्यांची द़ृष्टी कमी होऊ लागते तसेच काही द़ृष्टीविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. वास्तविक डोळ्यांमुळेच आपल्याला जगाला आणि स्वतःला पाहता येते. म्हणूनच डोळ्यांची विशेष काळजी घ्यायला हवी.

स्क्रीनचा प्रकाश

हल्ली बहुतेकदा कोणती कोणती स्क्रीन आपण सातत्याने पाहात असतो. कॉम्प्युटर किंवा मोबाईल हा जीवनावश्यक झाले आहेत. कॉम्प्युटरची स्क्रीन आणि बल्ब यांचा उजेड डोळ्यांवर ताण आणणारा असतो. त्यासाठी कॉम्प्युटरसमोर काम करताना स्क्रीनचा उजेड कमी ठेवावा जेणेकरून डोळ्यांवर त्याचा परिणाम होणार नाही. उजेड जास्त असेल तर डोळे सुकणे, ताण येणे, मान दुखणे यासारख्या समस्या भेडसावतात. त्यामुळे डोळ्यांचे नुकसानच होते.

डोळ्यांचे व्यायाम

डोळ्यांवरील ताण कमी होण्यासाठी काही डोळ्याचे व्यायाम करावेत. डोळे बंद करून आपल्या हातांच्या तळव्यांनी ते झाकून घ्यावेत. हलक्याने हात वरून खाली आणावेत. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.

* डोळे फिरवणे : डोळे चारही बाजूंना फिरवणे हा डोळ्यांसाठी उत्तम व्यायाम आहे. दहा मिनिटांपर्यंत डोळे चारही बाजूला फिरवावेत. एकदा घड्याळ्याच्या दिशेने तर एकदा विरुद्ध दिशेने फिरवावेत. त्यामुळे द़ृष्टी वाढते.

* डोळ्यांना मसाज : चेहर्‍याला फेशियल किंवा संपूर्ण शरीराला मसाज करतोच पण डोळ्यांना मसाज करण्यासाठी आवश्यकता असते. डोळ्यांचा मसाज करताना डोळे बंद करून बाहुल्यांच्या वर करावा. लहान बोटाचा वापर करून हा मसाज करावा. डोळ्यांना आराम आणि पोषण मिळण्यासाठी बदाम तेलाचा वापर करून मसाज करावा.

* थोडा आराम : काम करताना अधूनमधून डोळ्यांना विश्रांती मिळायला हवी. कॉम्प्युटर स्क्रीन वर काम करत असताना दर दहा मिनिटांनी आपली नजर दुसरीकडे वळवा. जवळपास वीस फूट लांब असणारी वस्तू पाहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.

* योगसाधना : योगा केल्याने द़ृष्टीत सुधारणा होतो. शीर्षासन, अधोमुखाश्वानासन, सर्वांगासन, धनुरासन इत्यादी आसने केल्याने डोळ्यांना विश्रांती मिळतेच परंतु नवे आयुष्य लाभते. त्यामुळे नियमित योगअभ्यास नक्कीच फायदेशीर ठरतो.

* पौष्टिक आहार : पौष्टिक आहार हा शरीराच्या तंदुरुस्तीसाठी आवश्यक असतो. आहारात 'अ' जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास द़ृष्टी कमी होते. 'अ' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणाची समस्या भेडसावू शकते. त्यामुळे आहारात अ जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक असावे.

-डॉ. संतोष काळे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news