

डॉ. संतोष काळे
अनेकदा वारंवार लघवी होणे किंवा जळजळ जाणवणे या समस्येकडे किरकोळ जंतुसंसर्ग म्हणून दुर्लक्ष केले जाते किंवा स्वयंप्रचार करून अंगावर काढले जाते. मात्र, वैद्यकीय भाषेत हा त्रास मूत्राशयाची जळजळ म्हणजेच ‘सिस्टायटिस’ या गंभीर समस्येमुळे होऊ शकतो. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास हा संसर्ग थेट मूत्रपिंडापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे या लक्षणांना केवळ कमी पाणी पिण्याशी जोडणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
‘सिस्टायटिस’ म्हणजे ब्लॅडरमध्ये सूज येणे होय. साधारणपणे हा त्रास जिवाणूंच्या संसर्गामुळे होतो; परंतु प्रत्येक वेळी सिस्टायटिसमागे संसर्गच असेल असे नाही. सिस्टायटिस आणि मूत्राशयाचा संसर्ग हे दोन्ही वेगवेगळे आजार आहेत. संसर्ग हा सिस्टायटिसचे एक कारण असू शकतो, पण सूज येणे ही मुख्य प्रक्रिया आहे. अनेकदा जिवाणूंचा संसर्ग नसतानाही हा त्रास होऊ शकतो, ज्याला वैद्यकीय भाषेत ‘इंटरस्टीशियल सिस्टायटिस’ म्हटले जाते. यामध्ये जंतुसंसर्ग नसतानाही लघवीला वारंवार होणारा त्रास आणि वेदना जाणवू शकतात.
महिलांच्या शरीराची रचना पाहता त्यांच्यामध्ये या समस्येचा धोका पुरुषांपेक्षा अधिक असतो. महिलांमध्ये लघवीची नळी लहान असल्यामुळे जिवाणू मूत्राशयापर्यंत वेगाने पोहोचतात. तसेच रजोनिवृत्तीच्या काळात इस्ट्रोजेन संप्रेरकाची पातळी कमी झाल्यामुळे ऊतकांची नैसर्गिक सुरक्षितता कमी होते. याशिवाय, ज्या लोकांना मधुमेह आहे आणि ज्यांचे रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित असते, त्यांच्या शरीरात जंतुसंसर्गाचा धोका कैक पटीने वाढतो.
प्रतिबंधात्मक उपाय
शरीराच्या गरजेनुसार पुरेसे पाणी आणि पातळ पदार्थांचे सेवन केल्यामुळे लघवीवाटे जिवाणू बाहेर पडण्यास मदत होते. लघवीची भावना झाल्यावर ती कधीही रोखून धरू नका. मूत्राशय पूर्णपणे रिकामे करण्याची सवय ठेवा. घाम येणार्या कपड्यांमध्ये जास्त वेळ राहणे किंवा खूप घट्ट कपडे घालणे टाळा. गुप्तांगांची स्वच्छता पुढेमागच्या दिशेने ठेवावी, जेणेकरून जिवाणूंचा संसर्ग टळेल. पोट साफ न राहिल्यास आतड्यातील जिवाणू मूत्राशियापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे फायबरयुक्त आहार घ्यावा. शारीरिक संबंधांनंतर लघवी पास करण्याची आणि स्वच्छता राखण्याची सवय ठेवावी.
सतत होणार्या या समस्येकडे केवळ घरगुती उपायांनी मलमपट्टी न करता तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. योग्य वेळी केलेल्या वैद्यकीय चाचण्या आणि जीवनशैलीतील बदल या त्रासापासून पूर्ण मुक्ती मिळवून देऊ शकतात.
प्रमुख लक्षणे
लघवी करताना तीव्र जळजळ आणि वेदना जाणवणे.
वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होणे आणि अचानक लघवीचा वेग वाढणे.
पोटाच्या खालच्या भागात किंवा कंबरेच्या भागात अस्वस्थता आणि वेदना राहणे.
ब्लॅडर पूर्ण रिकामे न झाल्याची भावना सतत राहणे.
महिला आणि मधुमेही रुग्णांना अधिक धोका