अनेकांना प्रवासादरम्यान उलटया, मळमळ, डोकेदुखीचा त्रास होतो. कोणत्याही वयोगटातील लोकांना हा त्रास होऊ शकतो. हा त्रास मोशन सिकनेस म्हणून ओळखला जातो. यामुळे अनेकजण प्रवास करण्याचे टाळतात. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर काही सोप्या टिप्सनी तुम्ही मोशन सिकनेस टाळू शकता.
प्रवासात शरीर हलत असते. यावेळी डोळे, सांधे आणि कानातील आतील स्नायूमधील संतुलन विस्कळीत होते. उदाहरण द्यायचंच झालं तर प्रवासात डोळ्यासमोर दृश्य गतिमान असतात. पण शरीर स्थिर असते. अशा वेळी डोळ्यांकडून मेंदूला दिला जाणारा सिग्नल आणि शरीर स्थिर असल्याने कानाकडून दिला जाणारा सिग्नल यात गल्लत होते. यामुळे आपल्याला उलटी किंवा चक्कर आल्यासारखे वाटत राहते. अनेकदा virtual reality गेम्स खेळणाऱ्यांनाही, जत्रेतील उंच पाळण्यात बसणाऱ्या व्यक्तींना हा त्रास जाणवू शकतो.
सर्वसाधारणपणे मोशन सिकनेसमुळे उलट्या होतात. पण अनेकांना डोकेदुखी, चक्कर, भीती वाटणे, खूप घाम येणे हा त्रास होतो.
मोशन सिकनेसचा त्रास टाळण्यासाठी वाहनात कुठे बसावं हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही बसने प्रवास करत असाल तर ड्रायवरच्या मागे असलेल्या विंडो सीटवर बसा. कारमध्ये बसतानाही फ्रंट पॅसेंजरसीटवर बसण्यास प्राधान्य द्या. ट्रेनमध्ये ज्या दिशेला ट्रेन जाते आहे त्या दिशेच्या विंडोसीटला बसा.
मोकळ्या हवेत रहा. प्रवासादरम्यान शक्य असल्यास खिडकी उघडा. मोकळ्या हवेने त्रास कमी होण्यास मदत होईल.
या दरम्यान मोबाइल, पुस्तक याचा वापर टाळा. लांबची दृश्ये पाहण्याचा प्रयत्न करा.
पेपरमिंटची गोळी खा. अनेकदा आवळा, पेपरमिंट किंवा आल्याचा वास मोशन सिकनेसचा त्रास कमी करण्यास उपयुक्त ठरतो.