

Impact of Air Pollution on Menstrual cycle Research Paper In Marathi
जगभरात वाढणारे वायू प्रदूषणाची ( Air pollution) समस्या ही आरोग्यविषयक चिंतेपैकी एक आहे. अनेक शहरवासीय खूपच खराब ते गंभीर वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI)शी झुंजत आहेत. दिवसेंदिवस प्रदूषित होणारी हवेचा आरोग्यासाठी धोकादायक आहेच, त्याचबरोबर त्याचा थेट परिणाम महिलांच्या मासिक पाळी चक्रावरही ( Menstrual cycle ) होत आहे. गेल्या काही वर्षांत केलेल्या काही अभ्यासातून वायू प्रदूषण आणि महिलांच्या मासिक पाळी यांच्यातील संबंध निश्चितच सिद्ध झाला आहे. आता आणखी एका आंतरराष्ट्रीय अभ्यासातून हाच निष्कर्ष समोर आला आहे. हे संशोधन अमेरिका, ब्राझील आणि मेक्सिकोमधील २३० शहरांतील महिलांच्या माहितीवर आधारित आहे. या संशाेधनाचा अहवाल प्रख्यात लॅन्सेट मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.
एअर क्वालिटी इंडेक्स (हवा गुणवत्ता निर्देशांक)ला आठ प्रदूषण घटकांच्या आधारे निश्चित केले जाते. यामध्ये PM10, PM 2.5, NO2, SO2, CO2, O3 आणि NH3 Pb यांच्या समावेश होतो. २४ तासांत या घटकांच्या प्रमाणावर हवेची गुणवत्ता ठरते. PM 2.5 हा हवेत विरघळलेला एक सूक्ष्म पदार्थ आहे. या कणांचा व्यास 2.5 मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी असते. PM2.5 हा मानवी आरोग्यावर सर्वाधिक परिणाम करणारा प्रदूषक मानला जातो.मात्र दीर्घकालीन PM2.5 संपर्क व मासिक पाळीतील बदल यावर व्यापक संशोधन झाले नव्हते.
नियमित मासिक पाळी ही महिलांच्या प्रजनन आरोग्याचे लक्षण मानली जाते. पाळीमध्ये अत्यधिक चढ-उतार असणाऱ्या महिलांमध्ये हृदयरोग, मधुमेह, कर्करोग आणि अपुऱ्या आयुर्मानाचा धोका वाढतो, असे या पूर्वीच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. मात्र दीर्घकालीन PM2.5 संपर्क व मासिक पाळीतील बदल या संशोधनातील निरीक्षणात्मक अभ्यासासाठी Clue नावाच्या मोबाईल अॅपमधून महिलांनी स्वतः नोंदवलेला ( माहिती देणार्या महिलांची ओळख लपवलेला ) डेटा संकलित करण्यात आला. अॅप BioWink (बर्लिन, जर्मनी) या संस्थेने विकसित केले. १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान १९०,२५४ वापरकर्त्यांकडून ४५,९९,३३९ पाळीच्या चक्रांची नोंद करण्यात आली. अमेरिकेसह ब्राझील व मेक्सिकोत झालेल्या संशोधनासाठी महिलांनी स्वतः मोबाइल हेल्थ अॅप वापरून मासिक पाळीची माहिती नोंदवली. वय १८ ते ४४ वयाेगटातील महिला यात सहभागी झाल्या. त्या कोणतेही गर्भनिरोधक वापरत नव्हत्या. याआधी कोणत्याही अभ्यासामध्ये PM2.5 कणांशी संबंधित मासिक पाळीतील बदल यावर सखोल अभ्यास केलेला नव्हता. याआधीच्या चार अभ्यासांमध्ये इतर प्रदूषकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. तसेच केवळ एका शहरापुरतेच मर्यादीत होते. त्यातील नोंदीही मर्यादित होत्या. मात्र या अभ्यासात PM2.5 च्या अल्पकालीन व दीर्घकालीन संपर्काचा पाळीच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले.
वायू प्रदूषण मासिक पाळीवर लक्षणीय परिणाम करते. नायट्रोजन डायऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड सारख्या हानिकारक वायू प्रदूषकांच्या संपर्कात आल्याने हार्मोनल संतुलनावर प्रतिकूल परिणाम होतो, ज्यामुळे अनियमित मासिक पाळी येते, जास्त रक्तस्त्राव होतो किंवा मासिक पाळीचे चक्रामध्ये बिघाड हाेताे.
संशोधनात हवेतील दीर्घकालीन PM2.5 संपर्क व मासिक पाळीतील बदल यामध्ये स्पष्ट संबंध आढळून आले. हवेतील प्रदूषण महिलांच्या मासिक पाळीच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. दीर्घकालीन पीएम 2.5 प्रदूषणात वाढ झाल्यास महिलांमध्ये असामान्य म्हणजेच खूप दीर्घ (३८ दिवस) किंवा खूप कमी (२४ दिवस) पाळीचं प्रमाण वाढते. PM2.5 कणांमुळे मासिक पाळीच्या नियमिततेवर परिणाम होतो. या अभ्यासांमधून असे सूचित झाले की, हवेतील तीव्र प्रदूषणामुळे पाळीमध्ये अनियमितता आणते. याचा परिणाम महिलांच्या हार्मोनल सिस्टीमवर परिणाम होण्याचीही शक्यता आहे; पण यासाठी अजून सखोल जैविक संशोधनाची गरज असल्याचेही या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०२० या कालावधीत अमेरिका, मेक्सिको आणि ब्राझील या तीन देशांतील २३० शहरांमधील ९२,५५० महिलांनी मासिक पाळीच्या चक्रासंदर्भात माहिती दिली. २२,२०,२८१ नोंदी नोंदवण्यात आल्या. या अभ्यासानुसार, सुमारे ३,८८,७८९ मासिक पाळी असमान (abnormal) होत्या. शहरानुसार हे प्रमाण १६.९% ते १९.७% दरम्यान आढळले. देशानुसार काही महत्त्वाचे फरकही दिसून आले. २०१६ ते २०२० दरम्यानच्या प्रदूषणाच्या सरासरीच्या आधारे PM2.5 आणि असमान/लांब सायकल्समध्ये स्पष्ट संबंध आढळून आला. संशोधनानुसार, PM2.5 वाढल्यास पाळी उशीरा येण्याचा धोका वाढतो. PM2.5 चे प्रमाण दर १० μg/m3 वाढल्यास असमान पाळी होण्याचा धोका २.३%, तर लांब पाळीचा धोका ३.६% वाढतो, असाही निष्कर्ष या अभ्यासात नोंदविण्यात आला आहे. या अभ्यासात, दीर्घकाळीन PM2.5 प्रदूषणाचा संबंध मुख्यतः असामान्यपणे लांबलेल्या मासिक चक्रांशी आढळला. हा अभ्यास भविष्यातील संशोधनासाठी मासिक पाळी ट्रॅकर डेटा वापरण्याचे माध्यम प्रदान करतो. या अभ्यासातून PM2.5 प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर, विशेषतः मासिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची पुष्टी झाली आहे.