

नियमित मासिक पाळी येणे हा महिलांच्या आरोग्यासाठी शुभसंकेत मानला जातो. शारीरिक चक्रानुसार प्रत्येक महिन्यात महिलांची पाळी सुरू होते. मासिक पाळी आल्याने त्यांच्या शरीरात अनेक महत्त्वाचे बदल घडतात. मुळातच मासिक पाळी हे महिलांच्या आरोग्याचे प्रगतिपुस्तक असते. पाळीच्या दिवसांत शरीराबाहेर निघणार्या रक्तस्रावातून महिलांच्या प्रकृतीचा अंदाज येतो. तुमच्या शरीरात नेमका कोणता बिघाड होतोय, शरीराचे इतर चक्र व्यवस्थित सुरू आहे ना, याबाबतीत मासिक पाळीतील रक्ताच्या रंगावरून माहिती कळते. मासिक पाळीची नियमितता, रक्तस्राव, पोटदुखीची समस्या उद्भवल्यास हे सर्व घटक महिलांच्या शरीरातील बदल टिपतात. रक्तप्रवाहातील रंग बदलल्यास संबंधित महिलेला संसर्गाची बाधा, संप्रेरकांचे संतुलन, पोषणाची कमतरता किंवा प्रजनन आरोग्य बाधित झाले आहे का, याबद्दल माहिती मिळते.
दुर्दैवाने आपल्या देशात मासिक पाळीबद्दल खुलेआम चर्चा केली जात नाही. अनेक ठिकाणी महिलांच्या मासिक आरोग्याबद्दल बोलण्यास सामाजिक पातळीवर मज्जाव केला जातो. मासिक पाळीतील गांभीर्य समजणे तर सोडाच; पण या दिवसांतील मूलभूत गोष्टींबद्दलही चर्चा होणे अवघड होऊन बसते. आरोग्य सुधारायचे असेल, तर मुळात या विषयावर संकोच न बाळगता चर्चा व्हायला हवी. महिलांच्या आरोग्याविषयक चर्चा घडल्या, तरच आरोग्याला बाधा पोहोचवणार्या लक्षणांबद्दल माहिती मिळेल आणि उपाययोजना अंमलात आणता येतील. महिलांनो, पाळीतील रक्ताचे रंग तुमच्या शरीरातील बिघाड दर्शवतो, हे नीट समजून घ्या.
मासिक पाळीच्या सुरुवातीला महिलांच्या मूत्र विसर्जनाच्या मार्गातून गडद लाल रंगाचा रक्तप्रवाह बाहेर येत असतो. पहिले दोन दिवस जास्त प्रमाणात रक्तस्राव होतो. या दिवसांत तुम्हाला गडद रंगाचे ताजे रक्त मूत्र विसर्जनातून बाहेर जात असल्याचे दिसून येते. हा रक्तस्राव गर्भाशयाच्या आतील अस्तराची गळती जलद आणि प्रभावीपणे होत असल्याचे दर्शवतो. गडद लाल रंग निरोगी रक्तस्रावाची खूण मानली जाते.
गडद लाल रंगाचा रक्तस्राव हा महिलांचे हार्मोन्सचे संतुलन योग्य सुरू असल्याचे दर्शवतो. गर्भाशय उत्तम असेल, तर हार्मोन्सची पातळी संतुलित राहते. सततच्या रक्तस्रावामुळे दर तासाला सॅनिटरी नॅपकिन बदलावे लागत असल्यास संबंधित महिलेला एंडोमेट्रियल पॉलिप्स किंवा हार्मोनल असंतुलनसारखी गंभीर समस्या झाल्याचे संकेत देते.
भारतीय महिला कोणत्या सामान्य कारणांसाठी स्त्री रोगतज्ज्ञांची भेट घेतात, याबाबत ‘जर्नल ऑफ मिड लाईफ हेल्थ’मध्ये अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. भारतातील 18-24 टक्के प्रजननक्षम वयाच्या महिलांना जास्त मासिक रक्तस्रावाचा अनुभव येतो. या वयोगटातील बहुतांश महिला रक्तस्रावाच्या समस्येवर निराकरण मिळवण्यासाठी स्त्री रोगतज्ज्ञांची भेट घेतात.
मासिक पाळीच्या दिवसांत मूत्र विसर्जनाच्या मार्गातून गडद लाल रंगाचे किंवा मरुन रंगाचे रक्तदिसून येते. गर्भाशयातून रक्त बाहेर येण्यास जास्त वेळ लागत असल्यास बरेचदा रक्त ऑक्सिडाईज होते. हवेशी संपर्क आल्याने रक्त गडद लाल रंगात दिसून येते. महिलांना पाळीच्या शेवटच्या दिवसांत किंवा सकाळी उठल्यावर बरेचदा गडद लाल रंगाचे किंवा मरुन रंगाचे रक्त दिसते.
तुमच्या ओटीपोटात दुखत असेल, या रक्तातून दुर्गंधी येत असेल किंवा नेहमीपेक्षा जास्त काळ हा रंग दिसत असेल, तर निश्चितच हे चांगले लक्षण नाही. महिलांच्या गर्भाशयात रक्तस्रावाचे काही भाग अडकून राहिला की, ओटीपोटातील दुखणी सुरू होतात. गडद किंवा मरुन रंगाच्या रक्तातून दुर्गंधी येते. या समस्या बाळंतपणानंतर किंवा गर्भपातानंतर प्रकर्षाने दिसून येतात. या समस्यांकडे दुर्लक्ष न करता तातडीने स्त्री रोगतज्ज्ञांची भेट घ्या.
मासिक पाळीच्या दिवसांत तपकिरी रंगाचे किंवा गंजलेल्या भांड्यावर दिसून येणार्या रंगासारखे रक्त दिसले, तर ते बरेचदा अगोदरच्या मासिक पाळीतील चक्रात बाहेर न पडलेले रक्त असते. हे रक्त वेळीच बाहेर न पडल्याने हवेच्या संपर्कात जास्त काळ राहते. परिणामी, मासिक पाळीतील रक्त तपकिरी रंगाचे दिसून येते. अनेकदा पाळीच्या सुरुवातीला किंवा अखेरच्या दिवसांत महिलांना अशा तपकिरी रंगाचा रक्तस्राव झाल्याचा अनुभव येतो. कधीकधी हे अडकलेले रक्त मासिक पाळी नसतानाही रक्ताऐवजी डाग म्हणून शरीराबाहेर पडते. ही चिंतेची बाब नाही. अनियमित मासिक पाळी, पोटदुखी किंवा तपकिरी रंगाचे डाग आदी समस्या सतत जाणवू लागल्यास थायरॉईडचे लक्षण मानले जाते. बरेचदा हार्मोनल गर्भनिरोधक गोळ्यांमुळेही या समस्यांचा सामना करावा लागतो. महिलांना पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोमची (पीसीओएस) लागण झाल्यास ही लक्षणे आढळतात. इंडियन जर्नल ऑफ एंडोक्राइनोलॉजी अँड मेटाबॉलिझमनुसार, भारतातील प्रजननक्षम वयाच्या सुमारे 20 टक्के महिलांना पीसीओएस हा आजार होतोय. या आजारांच्या लक्षणांबाबत दुर्लक्ष करू नका.
मासिक पाळीच्या दिवसांत अनेकदा गुलाबी रंगाचा रक्तस्रावही दिसतो. अनेकदा गर्भाशयाच्या मुखातील द्रवामुळे मासिक पाळीतील रक्त पातळ होते. रक्त पातळ झाल्याने गुलाबी रंग येतो. मासिक पाळीतील रक्तस्राव सर्वसामान्य असल्यास गुलाबी रंगाचा रक्तस्राव होणे सर्वसामान्य आहे. पाळीच्या सुरुवातीला किंवा अखेरच्या दिवसांत गुलाबी रंगाचा थोडाफार रक्तस्राव होतो. सातत्याने गुलाबी रंगाचा रक्तस्राव शरीरात इस्ट्रोजन या हार्मोनची पातळी कमी झाल्याचे संकेत देतो. खाण्याच्या सवयींमधील बदल, कमी वजन किंवा अतिव्यायामामुळेही गुलाबी रंगाचा रक्तस्राव होतो. केवळ ठरावीक महिलांसाठी ही सामान्य बाब ठरते; मात्र भारतात अनेक महिलांना अनेमियासारखा गंभीर आजाराची लागण होत असताना गुलाबी रंगाचा रक्तस्राव धोक्याचे लक्षण ठरते. शरीरात हिमोग्लोबिनची पातळी घटल्यास गुलाबी रंगाचा रक्तस्राव होतो. अलीकडच्या एका ताज्या अहवालानुसार, 15 ते 49 वयोगटातील महिलांना मोठ्या संख्येने अनॅमियाचा त्रास उद्भवत असल्याचे आढळून आले आहे. गुलाबी रंगाचा रक्तस्राव होत असेल आणि सतत थकवा जाणवत असेल, तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. चक्कर येणे, धाप लागणे हा प्रकार वाढल्यास तातडीने रक्त तपासणी करून घ्या. ही सर्व लक्षणे अनॅमियासारख्या गंभीर आजाराची असू शकतात.
पाळीच्या दिवसांत राखाडी रंगाचा रक्तस्राव होत असेल किंवा राखाडी रंगाच्या पेशी दिसून येत असल्यास ही धोक्याची घंटा वेळीच समजून घ्या. या रक्ताला दुर्गंधी येते, खाज सुटते किंवा असामान्य स्राव होतो. बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे मासिक पाळीतील रक्त हे राखाडी रंगाचे होते. प्रसूतीनंतर महिलांच्या रक्तप्रवाहात राखाडी रंगाच्या पेशी दिसून येतात. गर्भाशयात काही भाग राहिल्यास राखाडी रंगाचा रक्तस्राव होतो. या महिलांनी तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, विकसनशील देशांमधील महिला प्रजनन मार्गातील संक्रमणामुळे गंभीर आजारांचा सामना करतात. उपचाराविना शरीरात कायम राहिलेले संक्रमण हे वंध्यत्व आणि दीर्घकाळ चालणार्या ओटीपोटातील वेदनांचे प्रमुख कारण मानले जाते. मासिक पाळीत राखाडी रंगाचा रक्तस्राव होत असल्यास तातडीने स्त्री रोगतज्ज्ञांची भेट घ्या.
मासिक पाळीत काळ्या रंगाचा रक्तस्राव आढळून आल्यास तुमची घाबरगुंडी उडेल. हे सहसा जुने रक्त असते. त्यामुळे घाबरून जाऊ नका. गर्भाशयाच्या मुखातील अरुंदपणा, एंडोमेट्रियल ऊतींचा साठा होणे किंवा अगदी कमी रक्तस्राव झाल्यामुळे रक्त गर्भाशयात सामान्यपेक्षा जास्त काळ अडकून राहते. या साठलेल्या रक्ताचा रंग काळा पडतो.
काळ्या रंगाच्या रक्तप्रवाहासह तीव्र पोटदुखी, अनियमित मासिक पाळी, दुर्गंधी येत असेल, तर महिलांना एंडोमेट्रिओसिस, फायब्रॉईडस् किंवा संसर्गासारख्या गंभीर आजारांची लागण झाल्याचे दिसून येते. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नये. वेळीच निदान झाल्यास उपचार सुरू करता येतात. परिणामी, संसर्ग तसेच इतर आजार आटोक्यात येतात.
मासिक पाळीतील रक्तस्रावातील बदलते रंग वेळीच ओळखले, तर महिलांचे आरोग्य अबाधित राखण्यास मदत होईल. दुर्दैवाने भारतीय महिला यांसारख्या अनेक गंभीर आजारांबद्दल अपुर्या माहितीमुळे अनभिज्ञ राहतात. महिलांच्या आरोग्याबाबत अद्यापही खुलेआम चर्चा होत नसल्याने या आजारांबाबत फारशी जनजागृती होत नाही. परिणामी, या आजारांचे वेळीच निदान होण्यासही दिरंगाई होते.
प्रत्येक महिलेच्या मासिक पाळीचा रंग वेगळा असतो. पाळीच्या दिवसांत वेगवेगळ्या रंगातून रक्तस्राव होतो. रक्तस्रावातील रंगाचे बदल सर्वसामान्य असले, तरीही सतत बदलत्या रंगाच्या रक्तस्रावाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या दिवसांतील सततच्या गंभीर स्वरूपातील लक्षणांकडेही कानाडोळा करता कामा नये. भारतात, विशेषतः ग्रामीण आणि कमी उत्त्पन्न असलेल्या भागांमध्ये महिलांना मासिक पाळीच्या आरोग्याबद्दल शिक्षण दिले जात नाही.
प्रत्येक महिलेला मासिक पाळीतील स्वच्छता तसेच या दिवसांतील बदल आणि लक्षणांबद्दल पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. पाळीच्या रंगाचा बदल लक्षात घेतल्यास तुम्हाला धोक्याची लक्षणे ओळखता येतील. विद्यार्थिनी असो, नोकरदार महिला असो वा नुकतीच प्रसूत झालेली महिला असो, तुम्हांला रक्तस्रावातील रंगाचे बदल टिपता आले पाहिजेत. यामुळे तुम्ही स्वतःच्या प्रजननक्षमतेची काळजी घेऊ शकता. मासिक पाळीच्या दिवसांत आवश्यक काळजीबद्दलही पुरेशी माहिती मिळाल्याने महिलांना स्वतःचे आरोग्य जपता येते.