High Blood Pressure : उच्च रक्तदाबामुळे येऊ शकतं कायमचं अंधत्व? वाचा काय सांगते वैद्यकीय शास्त्र

रक्तवाहिन्या अरुंद होऊन रेटिनामध्ये रक्तस्राव होण्याचा धोका
High Blood Pressure
उच्च रक्तदाबामुळे येऊ शकतं कायमचं अंधत्व? वाचा काय सांगते वैद्यकीय शास्त्र
Published on
Updated on

डॉ. मनोज कुंभार

उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर हृदयासाठीच हानिकारक ठरू शकते, हे बहुतेकांना माहीत झाले आहे; पण डोळ्यांच्या आरोग्यासाठीही ते तितकेच घातक ठरू शकते.

दीर्घकाळ वाढत्या स्वरूपात राहिलेल्या रक्तदानामुळे डोळ्यांमधील पडदा म्हणजेच रेटिनाचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा रुग्णांनी नियमितपणे रेटिनाची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. रक्तदाब पातळी सतत वधारलेली असेल, तर डोळ्यांच्या रेटिनाला रक्तपुरवठा करणार्‍या सूक्ष्म रक्तवाहिन्या कडक होतात आणि अरुंद होतात. या स्थितीला वैद्यकीय भाषेत ‘हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी’ असे म्हटले जाते. रक्तवाहिन्यांवर जास्त दाब आल्यामुळे काही वेळा त्या फुटतात आणि रेटिनामध्ये रक्तस्राव होतो. यामुळे डोळ्यांना सूज येणे, दृष्टी अंधूक होणे आणि गंभीर प्रकरणांमध्ये कायमचे अंधत्व येण्याचा धोका वाढतो. विशेष म्हणजे, या समस्येची सुरुवातीची लक्षणे सहज दिसून येत नाहीत. त्यामुळे आजार गंभीर होईपर्यंत रुग्णाला याची जाणीव होत नाही.

उच्च रक्तदाबामुळे डोळ्यांच्या इतर भागांवरही विपरीत परिणाम होतो. रेटिनाच्या खाली असलेल्या रक्तवाहिन्यांच्या थरामध्ये द्रव पदार्थ जमा झाल्यामुळे ‘कोरिओडोपॅथी’ नावाची समस्या उद्‌भवू शकते. याशिवाय, डोळ्यांकडून मेंदूकडे दृश्य संकेत घेऊन जाणार्‍या ऑप्टिक नर्व्ह म्हणजेच दृष्टीच्या नसला रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे ’ऑप्टिक न्यूरोपॅथी’ होते, ज्यामुळे अचानक दृष्टी जाऊ शकते.

या सर्व गंभीर गुंतागुंती टाळण्यासाठी उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी वर्षातून किमान एकदा तरी डोळ्यांच्या तज्ज्ञांकडून रेटिनाची सविस्तर तपासणी करून घेणे आवश्यक आहे. केवळ चष्म्याच्या नंबरची तपासणी करणे पुरेसे नसते, तर डोळ्यात ड्रॉप्स घालून पडद्याची तपासणी करणे गरजेचे असते.

ही समस्या टाळण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी आणि रक्तदाब नेहमी नियंत्रणात ठेवणे, आहारात मिठाचे प्रमाण कमी करणे, नियमित व्यायाम करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news