Gut Health : केवळ अपचन की आतड्यांचा आजार? मूळ कारण शोधण्यासाठी 'या' चाचण्या कराच!

जाणून घ्या आतड्यांच्याआरोग्याची खरी स्थिती तपासणाऱ्या महत्त्वाच्या चाचण्या
Gut Health : केवळ अपचन की आतड्यांचा आजार?  मूळ कारण शोधण्यासाठी 'या' चाचण्या कराच!
Published on
Updated on

डॉ. मनोज कुंभार

सतत जाणवणारे पोट फुगणे किंवा गॅस होणे (ब्लोटिंग) हे केवळ खाण्यापिण्याच्या सवयींमुळे नसून आतड्यांमधील बिघाडाचे लक्षण असू शकते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रौढ व्यक्ती पोटाच्या अशा समस्यांनी त्रस्त असतात. या समस्येचे मूळ कारण शोधण्यासाठी काही महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या उपयुक्त ठरतात.

फूड इन्टॉलरन्स टेस्ट : आनुवंशिक किंवा इतर कारणांमुळे विशिष्ट अन्नपदार्थ पचवणे शरीराला कठीण जाते. या चाचणीद्वारे लॅक्टोज किंवा ग्लूटेन (गव्हातील प्रोटीन) यांसारख्या घटकांमुळे पोट फुगते का, हे अचूक समजते आणि त्यानुसार आहारात बदल करणे शक्य होते.

गट मायक्रोबायोम टेस्ट : यामध्ये पोटातील चांगल्या आणि वाईट जीवाणूंच्या (बॅक्टेरिया) प्रमाणाचे विश्लेषण केले जाते. जीवाणूंचे संतुलन बिघडल्यास पोटाचे विकार वाढतात, ज्याचे निदान या चाचणीद्वारे होते.

ब्रीथ टेस्ट फॉर सीबो : या नॉन-इन्व्हेसिव्ह चाचणीत रुग्णाला ग्लुकोजचे पाणी प्यायला देऊन त्याच्या श्वासातील हायड्रोजन आणि मिथेन वायूचे प्रमाण मोजले जाते. वायूचे वाढलेले प्रमाण आतड्यात अतिरिक्त जीवाणू असल्याचे दर्शवते, ज्यामुळे गॅस आणि पोट फुगण्याचा त्रास होतो.

स्टूल टेस्ट : जेव्हा पोट फुगण्याचा त्रास जुनाट किंवा तीव्र स्वरूपाचा असतो तेव्हा डॉक्टर ही चाचणी सुचवतात. यातून आतड्यातील संसर्ग, सूज किंवा इतर गंभीर पचनविकारांचे स्पष्ट निदान होते.

एंडोस्कोपी किंवा इमेजिंग चाचण्या : सतत किंवा गंभीर त्रास असल्यास एका लवचिक नळीला लहान कॅमेरा जोडून आतड्याच्या आतील भागाची तपासणी केली जाते. यामुळे अल्सर, अंतर्गत सूज किंवा रचनात्मक दोष स्पष्टपणे दिसतात आणि अचूक उपचार करणे सोपे होते. वारंवार पोट दुखणे, अचानक पोट फुगणे, मलविसर्जनाच्या अनियंत्रित सवयी आणि सतत येणारा थकवा ही या चाचण्या करून घेण्याची मुख्य लक्षणे आहेत. नैसर्गिकरीत्या आरोग्य सुधारण्यासाठी आहारात फायबरचे प्रमाण वाढवणे, पुरेसे पाणी पिणे, प्रोबायोटिक्सचा समावेश करणे आणि ताणतणावाचे व्यवस्थापन करणे आवश्यक मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news