

मधुमेही आईच्या पोटी वाढणार्या बाळाला सतत जास्त प्रमाणात रक्तातील साखरेचा संपर्क येतो आणि त्यामुळे त्याच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.
गर्भावस्थेत मधुमेह दोन प्रकारचा असतो. पहिला म्हणजे गर्भावस्थेतच निर्माण होणारा ‘जेस्टेशनल डायबेटीस’ आणि दुसरा म्हणजे गर्भधारणेपूर्वीपासून असलेला ‘प्री-जेस्टेशनल डायबेटीस’ जर गर्भावस्थेत आईचा मधुमेह नीट नियंत्रित ठेवला गेला नाही, तर गर्भाच्या वाढीवर परिणाम होतो आणि प्रसूतीच्या वेळी तसेच त्यानंतर अनेक अडचणी निर्माण होतात.
अशा बाळांचे वजन इतर बाळांच्या तुलनेत जास्त असते. त्यामुळे नैसर्गिक प्रसूती कठीण होते. नसा दुखावण्याची किंवा जखम होण्याची शक्यता वाढते आणि ‘सिझेरियन डिलिव्हरी’चे प्रमाण जास्त दिसते. जन्मल्यानंतर अशा बाळांना पहिल्या काही दिवसांत रक्तशर्करा खूप कमी होण्याची म्हणजेच हायपोग्लायसेमियाची शक्यता जास्त असते. कारण, गर्भावस्थेत आईकडून जास्त प्रमाणात ग्लुकोज मिळाल्यामुळे बाळाच्या शरीरात इन्सुलिनचे प्रमाण जास्त झालेले असते. जन्मानंतर तेच इन्सुलिन रक्तातील साखर पटकन कमी करते आणि रक्तशर्करा स्थिर होण्यासाठी काही दिवस लागतात.
मधुमेही आईच्या बाळांना अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामध्ये पूर्ण वाढ न झालेल्या फुफ्फुसांमुळे श्वसनाचा त्रास, रक्तातील लाल पेशींची जास्त निर्मिती म्हणजेच पॉलिसायथीमिया, बिलिरुबिनचे प्रमाण जास्त झाल्यामुळे जॉन्डिस, हृदयाच्या स्नायूंची जाडी वाढणे यांचा समावेश होतो. आईचा मधुमेह गर्भधारणेच्या सुरुवातीपासूनच नीट नियंत्रित नसेल, तर बाळामध्ये जन्मजात दोष दिसू शकतात. तसेच गर्भपात किंवा स्टिलबर्थ होण्याची शक्यता वाढते.
गर्भावस्थेत रक्तशर्करा नियंत्रित न राहिल्यास बाळाचे वजन जास्त असणे, काही गंभीर प्रकरणांत बाळ लहान असणे, त्वचेचा निळसर रंग, जलद श्वासोच्छवास, वेगवान हृदयगती, अशक्त रडणे, दूध नीट न शोषणे, झटके येणे, चेहरा फुगणे, थरथर कापणे आणि जॉन्डिस या समस्यांचा बाळाला सामना करावा लागू शकतो. तपासण्यांमध्ये गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात अल्ट्रासाऊंड करून गर्भाच्या आकारावर लक्ष ठेवले जाते. क्वचित प्रसंगी गर्भाच्या फुफ्फुसांची परिपक्वता तपासली जाते. जन्मल्यानंतर बाळाची रक्तशर्करा तासाभरात तपासली जाते आणि ती काही दिवस नियमित तपासली जाते. हृदय-फुफ्फुस कार्य तपासले जाते, बिलिरुबिनची पातळी मोजली जाते आणि गरज भासल्यास हृदयाचा इकोकार्डिओग्राम केला जातो.
उपचारांमध्ये रक्तशर्करेचे नियंत्रण महत्त्वाचे असते. जन्मानंतर लगेच स्तनपान किंवा पूरक आहार दिल्यास सौम्य प्रकरणात फायदा होतो. दूध उपलब्ध नसेल, तर डोनर मिल्क किंवा फॉर्म्युला द्यावे लागते. अनेक रुग्णालयांत आता बाळाच्या गालात ग्लुकोज जेल दिले जाते. रक्तशर्करा वाढली नाही, तर शिरेतून द्रव पदार्थासोबत ग्लुकोज दिले जाते. गंभीर प्रकरणांत नाभीच्या शिरेतून काही दिवस साखरेचे द्रावण दिले जाते. कधीकधी श्वसन सहायक औषधे देण्याची गरज भासते.
बहुतेक वेळा बाळाचे त्रास काही तासांत, दिवसांत किंवा आठवड्यांत कमी होतात. हृदयाची जाडी सुधारण्यासाठी मात्र काही महिने लागू शकतात. क्वचित प्रसंगी रक्तशर्करा इतकी कमी होते की, मेंदूला इजा होऊ शकते. गुंतागुंतींमध्ये मृतजन्म, जन्मजात हृदयदोष, अपूर्ण फुफ्फुसे, जास्त बिलिरुबिन, निओनेटल पॉलिसायथीमिया, आतड्यांमध्ये लहान डाव्या कोलन सिंड्रोम यांचा समावेश होतो. प्रतिबंध म्हणून गर्भावस्थेत मधुमेह असलेल्या महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तशर्करा नियंत्रणात ठेवल्यास अनेक समस्या टाळता येतात.
तसेच जन्मानंतर बाळाचे पहिले काही दिवस नीट निरीक्षण केल्यास हायपोग्लायसेमियामुळे होणारे गंभीर परिणाम टाळता येतात.