गॅजेट्सचा मोह आरोग्याला घातक, यावर उपाय काय?

गॅजेट्सचा मोह आरोग्याला घातक, यावर उपाय काय?

[author title="डॉ. मनोज कुंभार" image="http://"][/author]

रोजच्या आयुष्यात विविध इलेक्ट्रॉनिक आयटम्सना स्टेटस सिम्बॉल म्हणूनही पाहिले जाते. पण तरीही या वस्तू आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायकही ठरू शकतात. त्यामुळे या वस्तूंपासून दूर राहणे अधिक हितकारक ठरू शकते. आजच्या काळात आपल्या सर्वांचा जवळचा दोस्त आहे, स्मार्टफोन किंवा लॅपटॉप. आपण तासन् तास मोबाईल किंवा लॅपटॉप घेऊन बसतो. पण आपला हा मित्र आरोग्याचा शत्रू आहे, हे अनेकांना माहीत नसते.

इलेक्ट्रॉनिक गॅजेटस स्टेटस सिम्बॉल

मुळातच, हल्ली नवनवीन इलेक्ट्रॉनिक गॅजेटसनी आपल्या आयुष्यात नुसता शिरकावच केला नाहीये, तर ते स्टेटस सिम्बॉल बनले आहेत. त्यामुळे काम सोडून अनेकदा लोक या गॅजेटस्मध्ये वेळ घालवतात. कामासाठी या गॅजेटस्चा उपयोग दीर्घकाळासाठी वापर करणे अपरिहार्य असू शकते. पण विनाकारण सतत इलेक्ट्रॉनिक गॅजेटला चिटकून राहणे योग्य नाही. अनेक जण चित्रपट पाहणे, व्हिडीओ गेम खेळणे किंवा सोशल मीडिया यासाठी कॉम्प्युटरवर चिकटून राहातात. पण मोबाईल, स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर यांच्या अतिवापरामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. यामध्ये शारीरिक सक्रियता कमी होणे, झोप अपूर्ण राहणे किंवा झोपेचे वेळापत्रक बदलणे इत्यादींचा समावेश होतो.

कॉम्प्युटरसमाेर अधिक वेळ व्‍यतित करणे राेगाला निमंत्रण

लॅपटॉपवर काम केल्यामुळे मानेमध्ये वेदना होणे, ही सध्या मोठी आरोग्यसमस्या म्हणून समोर येत आहे. लंडन विद्यापीठाच्या एका संशोधनानुसार जे लोक कॉम्प्युटरवर चार तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ घालवत असतात, त्यांना इतरांच्या तुलनेत हृदयविकार होण्याची शंका 125 टक्के अधिक असते. संशोधनातून हे स्पष्ट झाले की, कॉम्प्युटरवर जास्त वेळ घालवणार्‍या लोकांना मृत्यूचा धोका इतर लोकांच्या तुलनेत 45 टक्के जास्त असतो. तसे पाहता, टीव्ही पाहण्याचे वेडही अनेकांना असते. विशेषतः महिला वर्गासाठी टीव्ही पाहणे ही सर्वात आवडती बाब आहे. त्या तासन् तास टीव्हीसमोर बसलेल्या असतात.

स्मार्टफोनचा अतिवापर घातक

जास्त टीव्ही पाहणेही चुकीचे असते. तासन् तास टीव्ही पाहिल्याने टाईप-2 प्रकारातील मधुमेह होतो आणि हृदयविकाराचा धोका 20 टक्क्यांनी वाढतो. हॉवर्ड विद्यापीठातील संशोधनानुसार, वायरलेस उपकरणांमधून निघणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणे ही कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतात. स्मार्टफोन ही आज आपली गरज आहे; पण त्याचे व्यसनही आपल्याला लागले आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधनानुसार, कमी वयात मोबाईल फोन वापरल्यास मेंदूचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. मोबाईलवर खूप मोठ्या आवाजात गाणी ऐकणेदेखील आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे बहिरेपण येऊ शकते.

रोज मोबाईलवर चार तासांहून अधिक वेळ बोलत असाल, तर आपला स्वभाव रागीट होण्याची शक्यता असते. एका संशोधनानुसार, मोबाईल फोनमध्ये टॉयलेटच्या फ्लश हँडलवर असणार्‍या जीवाणूंपेक्षा साधारणपणे 18 पट हानिकारक जीवाणू असतात. त्यांच्यामुळे पोटात गंभीर आजाराची शक्यता असते.

प्रतिबंध करू शकलो नाही तरी बचाव करणे गरजेचे

ज्याप्रमाणे झोपणे, खाणे पिणे, काम करणे या कोणत्याही गोष्टी अतिप्रमाणात करणे हानिकारक आहे तसेच गरजेपेक्षा जास्त वेळ गॅजेटसचा वापर करणे आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. तसेच मेंदूचे हानिकारक नुकसानही होते. त्यामुळे स्मरणशक्तीवरही परिणाम होतो. मेंदूची कार्यक्षमता प्रभावित होते. शरीराचे चक्र बिघडते. यकृतासंबंंधीच्या तक्रारी भेडसावतात. हृदयावर परिणाम होतो. मधुमेह, अशक्तपणा, हाडे कमजोर होणे, डोळे खराब होणे यांसारखे त्रास होतात. या सर्वांवर उपाय काय? तर प्रतिबंध करू शकलो नाही तरी बचाव करणे गरजेचे आहे. गरज आहे तितकाच वापर करावा. जास्त वापर केल्यास आजार जडणारच.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news