

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : अचानक पडणारा पाऊस, थंडी आणि मध्येच ऊन वाढल्याने येणारा घाम यामुळे शरीर सातत्याने ओले राहत आहे. काखेत, मांड्या, डोके, मानेवर घाम जमा झाल्याने तीव्रतेने खाज येते. याचे रूपांतर पुढे घामोळ्या आणि फंगल इन्फेक्शनमध्ये होत आहे.
मागील काही दिवसांपासून त्वचेचे फंगल इन्फेक्शन (बुरशीजन्य संसर्ग) होत असलेले रुग्ण वाढत असून त्वचेचा संसर्ग टाळण्यासाठी अंग कोरडे असणे, घट्ट कपडे टाळून पातळ व सैल कपडे घालण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. त्वचेचे फंगल इन्फेक्शन हे कोणत्याही काळात होऊ शकते. विशेष करून जेव्हा त्वचा ओली राहते त्या ठिकाणी या बुरशीजन्य आजाराची वाढ होते. खास करून काखेत, जांघेत हा संसर्ग झालेला दिसून येतो. सध्या त्वचारोग उपचारासाठी येणार्या रुग्णांपैकी या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण जास्त असून 30 ते 40 टक्के इतके आहे. त्यामुळे संबंधित रुग्णांनी यावर त्वचारोगतज्ज्ञांकडे जाऊन उपचार करणे गरजेचे आहे.
फंगल इन्फेक्शनचे रुग्ण वाढलेले आहेत. सुरुवातीला जांघेत, काखेत त्याचे चट्टे दिसून येतात व उपचार न केल्यास शरीरावर इतर ठिकाणी दिसून येतात. त्वचेचा कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यावर मेडिकलमधून परस्पर मलम न घेता त्वचारोगतज्ज्ञांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्यानुसार योग्य ती औषधे घ्यावीत. स्वतः स्टिरॉईडयुक्त औषधे लावल्याने मग त्यावरील औषधांचाही फारसा उपयोग होत नाही. शिवाय इन्फेक्शन वाढते.
– डॉ. स्वाती थोरात, त्वचारोगतज्ज्ञ, सीपीआर रुग्णालय