

फळं ही आपल्या दैनंदिन आहारातील एक महत्त्वपूर्ण आणि पोषणमूल्यांनी भरलेली घटक असतात. त्यात नैसर्गिक साखर, फायबर्स, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आदी आरोग्यदायी घटक भरपूर प्रमाणात असतात. मात्र, मधुमेह (Diabetes) असलेल्या व्यक्तींसाठी ही साखर आरोग्यासाठी धोका निर्माण करू शकते. त्यामुळे मधुमेहग्रस्तांनी फळं निवडताना अधिक सजग आणि जागरूक राहणे अत्यावश्यक आहे.
फळांमध्ये फ्रुक्टोज नावाची नैसर्गिक साखर असते. सामान्यतः ही साखर शरीराला हानी पोहोचवत नाही, परंतु मधुमेह असलेल्या रुग्णांच्या शरीरात इन्सुलिनचं प्रमाण कमी असल्याने ही साखर त्वरीत ग्लुकोजमध्ये रूपांतरित होते आणि रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. यामुळे काही फळांचं सेवन मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकतं.
आंबा ‘फळांचा राजा’ मानला जातो. त्यात फायबर्स आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असले तरी एका मध्यम आकाराच्या आंब्यात सुमारे 46 ग्रॅम साखर असते.
आंबा खाल्ल्यानंतर रक्तातील साखर झपाट्याने वाढते.
मधुमेहासह लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींनी तर आंब्याचं सेवन अत्यंत मर्यादित प्रमाणात करावं किंवा पूर्णतः टाळावं.
द्राक्षं व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत असतात. मात्र एका कप द्राक्षांमध्ये जवळपास 23 ग्रॅम साखर असते.
ही साखर त्वरीत रक्तप्रवाहात शोषली जाते आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी तीव्रपणे वाढते.
त्यामुळे मधुमेहग्रस्तांनी द्राक्षांचं सेवन मर्यादित करावं किंवा टाळावं.
अंजीर हे शरीरासाठी पोषक फळ असून त्यात फायबर्स, अँटीऑक्सिडंट्स असतात.
मात्र, त्यातही अधिक प्रमाणात नैसर्गिक साखर असते जी रक्तशर्करा झपाट्याने वाढवते.
त्यामुळे अंजीर देखील मधुमेहींनी शक्यतो टाळावं.
ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index – GI) हा एखाद्या अन्नपदार्थामुळे रक्तातील साखरेची पातळी किती वेगाने वाढते हे दर्शवणारा महत्त्वाचा निकष आहे.
GI 55 पेक्षा कमी असलेले अन्न मधुमेहग्रस्तांसाठी सुरक्षित मानले जाते.
GI 70 पेक्षा जास्त असेल तर ते पदार्थ रक्तशर्करासाठी धोकादायक असतात.
सावधपणे फळांची निवड करा:
सफरचंद, पेरू, स्ट्रॉबेरी, आवळा, ब्लूबेरी, जामुन यासारखी साखरेचं प्रमाण कमी आणि GI कमी असलेली फळं निवडा.
आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या:
प्रत्येक रुग्णाची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसारच आहार ठरवा.
फळं खाण्याची वेळ आणि प्रमाण:
एकावेळी जास्त प्रमाणात फळं खाण्यापेक्षा, अल्प प्रमाणात आणि विशिष्ट वेळेवर खाणं अधिक फायदेशीर ठरतं.
शक्यतो संपूर्ण फळ खा, रस टाळा:
फळांचा रस काढल्यास फायबर्स कमी होतात आणि साखर जास्त प्रमाणात रक्तात मिसळते.