

पावसाळ्याच्या दिवसांत शरीर फिट ठेवणं आणि चांगली झोप घेणं या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी महत्त्वाच्या असतात. मात्र, झोपण्यापूर्वी काही अन्नपदार्थांचे सेवन केल्यास झोपेवर, पचनावर आणि एकूणच आरोग्यावर वाईट परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर आहारतज्ज्ञ आरती भगत यांनी काही महत्त्वाचे आहारविषयक सल्ले दिले आहेत.
तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात पचनशक्ती कमी होते. त्यामुळे झोपण्यापूर्वी मसालेदार, तळलेले, साखरेचे किंवा कॅफेनयुक्त पदार्थ टाळावेत.
कॅफेनयुक्त पेये (कॉफी, चहा, कोल्ड्रिंक) झोपेस अडथळा निर्माण करतात.
मद्यपान केल्याने झोप लागली तरी ती खोल नसते आणि वारंवार जाग येते. यामुळे डिहायड्रेशन होऊन तोंड कोरडे पडते.
जास्त साखर असलेले पदार्थ ग्लुकोज पातळी वाढवतात, त्यामुळे शरीर अधिक सक्रिय राहते व झोप येत नाही.
तज्ज्ञ आरती भगत सांगतात की, रात्री झोपण्यापूर्वी गरम दूध प्यायल्याने शांत झोप लागते.
दुधात जायफळ, हळद, केसर किंवा बदाम घालून घेतल्यास झोप सुधारते आणि शरीरही निरोगी राहते.
इलायची घालून दूध पिणे पचन सुधारते आणि झोपेवर सकारात्मक परिणाम होतो.
चांगली झोप म्हणजे चांगले आरोग्य. म्हणूनच, झोपेपूर्वी काय खावे आणि काय टाळावे याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः पावसाळ्यात, पचनसंस्था संवेदनशील असल्याने अधिक खबरदारी आवश्यक आहे.