

डॉ. भारत लुणावत
कडाक्याच्या उन्हाळ्यात एसीचे तापमान तापमान 25 ते 28 अंश सेल्सिअसच्या दरम्यान ठेवणे आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठीही आदर्श मानले जाते.
जेव्हा आपण खोलीचे तापमान 18 किंवा 20 अंशांपर्यंत खाली आणतो, तेव्हा बाहेरील अतिउष्ण तापमान आणि खोलीतील अतिथंड तापमान यामध्ये मोठी तफावत निर्माण होते. अशा परिस्थितीत जेव्हा एखादी व्यक्ती थंड खोलीतून अचानक बाहेरच्या उष्ण वातावरणात जाते किंवा बाहेरून आत येते, तेव्हा शरीराच्या तापमान नियंत्रण यंत्रणेवर (थर्मोरेग्युलेशन) मोठा ताण येतो. यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे किंवा स्नायूंमध्ये कडकपणा जाणवू शकतो.
अतिथंड वातावरणात दीर्घकाळ राहिल्याने श्वासोच्छ्वासाचे विकार, सांधेदुखी आणि कोरड्या त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. विशेषतः ज्यांना दमा किंवा सायनसचा त्रास आहे, त्यांच्यासाठी अतिथंड हवा घातक ठरू शकते. वातानुकूलित यंत्रणेमुळे हवेतील आर्द्रता कमी होते. यामुळे डोळे आणि घसा कोरडा पडतो. या त्रासापासून वाचण्यासाठी ‘एसी’ सुरू असताना खोलीत पाण्याचे छोटे भांडे ठेवावे, जेणेकरून हवेतील ओलावा टिकून राहील.