डॉ. भारत लुणावत
योगसाधना ही आजच्या आधुनिक काळातही प्रभावी उपचारपद्धती म्हणून पुढे जगभरात मान्यता मिळत आहे. अलीकडील काळात लाईफस्टाईल डिसिजेस म्हणून पुढे आलेल्या समस्यांमध्येही योगासने फायदेशीर ठरत आहेत. रक्तदाबाचे उदाहरण घेतल्यास यासाठी म्हणून खास योगासनेही आहेत, जी नियमितपणे केल्यास रक्तवाहिन्यांचे आकुंचन दूर होते. तसेच मनही शांत राहते. रक्तप्रवाह सुरळीत राहिल्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो
पवनमुक्तासनः ज्यांना पोटात वायू धरण्याचे विकार असतात त्यांना पवनमुक्तासनाचा फायदा होतो. पवनमुक्तासन केल्याने आतड्यांमध्ये निर्माण होणारा वायू शोषून घेण्याची क्षमता वाढते. त्याचबरोबर रक्तदाबही योग्य पातळी येतो. पवनमुक्तासनाचा मेंदूवरही सकारात्मक परिणाम होतो. हे आसन केल्याने आनंदी न्युरोकेमिकल्स तयार होतात जे व्यक्तीला आतूनच आराम मिळाल्याची जाणीव करून देतात.
भुजंगासन : भुजंगासन केल्याने शरीर लवचिक होते आणि कंबरदुखी आणि पोटाची वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर भुजंगासन केल्याने तणाव दूर होतो शिवाय उच्च रक्तदाबामध्ये आराम मिळतो. भुजंगासनाचा सराव केल्याने शरीरात थकवा, चिंता, तणाव दूर करणाऱ्या हार्मोनस्चा स्राव वाढतो. भुजंगासनाचा नियमित सराव मधुमेह आणि अस्थमा या दोन्हीच्या रुग्णांना होतो.
मर्कटासन : इंग्रजीत याला मंकी पोझ असेही म्हणतात; पण हे झोपून करण्याचे आसन आहे. त्यामुळे सायकल वेदना, पोटदुखी, पोटात वायू होणे, कंबरदुखी, अपचन, नितंबांचे दुखणे, अनिद्रा, थकवा आणि तणाव आदी त्रासांमध्ये आराम मिळतो. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी याचा फायदा होतो. शरीराचे मुख्य अवयव म्हणजे मूत्रपिंड, अन्नाशय आणि यकृतसारखे अवयव सक्रिय करण्यास मदत करतात. या आसनामुळे एकाग्रता वाढते. तसेच मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे आसन फायदेशीर आहे.
प्राणायाम: श्वासाची गती आणि रक्ताभिसरण सामान्य करण्यासाठी प्राणायाम अत्यंत प्रभावी आहे. श्वास आणि रक्ताभिसरण यांच्याशी हृदयाचा महत्त्वाचा संबंध असतो. उच्च रक्तदाबाने ग्रस्त रुग्णांनी भ्रामरी प्राणायाम आणि उज्जायी प्राणायाम केला पाहिजे. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. अनुलोम-विलोम हे प्राणायामाचे प्रकार चिंता कमी करतात आणि हृदयाचे ठोके सुरळीत करतात. हे प्राणायाम आपण घरच्या घरी करू शकतो. रक्तदाब आणि योगासने
शवासन : या आसनामध्ये झोपून १०० वेळा श्वास आत घ्यायचा आणि सोडायचा. शवासन हे सर्वात सोपे आणि सर्वात कठीण आसन मानले जाते. सोपे अशासाठी की, त्यात शारीरिक हालचाल करावी लागत नाही. फक्त शांतपणे पाठीवर झोपावे लागते; पण कठीण अशासाठी की, सर्वच इंद्रियांचे नियंत्रण करावे लागते जेणेकरून मन इकडे-तिकडे भटकू नये. श्वासावर लक्ष केंद्रित करायचे असते. श्वास घेताना आणि सोडताना प्रत्येक श्वासाबरोबर सकारात्मकता आत जाते आहे आणि नकारात्मकता प्रत्येक श्वासाबरोबर बाहेर सोडली जात आहे. असे कमीत कमी ७-८ मिनिटे केल्यास शरीराला आराम मिळतो. मन प्रफुल्लित, आनंदित होते. रक्तदाबाच्या रुग्णांनाही या आसनाचा खूप फायदा होतो.
या गोष्टी जरुर लक्षात ठेवा :
कोणतेही आसन जेवल्यानंतर तीन तासांनी आणि न्याहारीनंतर १ तासाने केले पाहिजे. निरोगी राहण्यासाठी सकाळच्या वेळेत कमीत कमी २०-२५ मिनिटे योग, ध्यान केले पाहिजे. आसन करताना पहिल्यांदा सूक्ष्म आसन जरुर करावे. काही समस्या जाणवली, तर योगअभ्यास करणे थांबवा. आसन करताना अडचणी येत असल्यास एखाद्या तज्ज्ञाकडून शिकून मगच ती आसने करावीत.