

भारतीय कॉर्पोरेट जगतात कर्मचारी बर्नआउट, अर्थात कामाचा प्रचंड थकवा आणि मानसिक ताण हे नवं संकट उभं राहिलंय. याचा सामना करण्यासाठी कंपन्या नवनवीन उपाययोजना राबवत आहेत. कर्मचाऱ्यांसाठी हॅपिनेस सर्व्हे आणि मूव्ही नाइट्स पासून ते पॉवर नॅप्स आणि डिजिटल डिटॉक्स पर्यंत असे नवनवीन प्रयोग केले जात आहेत.
मेडीबडी आणि भारतीय उद्योग महासंघ (CII) यांच्या संयुक्त अहवालानुसार, भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रातील परिस्थिती चिंताजनक आहे:
71% कर्मचारी जीवनशैलीशी संबंधित आरोग्य समस्यांना सामोरे जात आहेत.
मानसिक आरोग्याशी संबंधित ओपीडी क्लेम्समध्ये 30 ते 50 टक्क्यांची वाढ झाली आहे.
86% कर्मचारी कामाच्या ठिकाणच्या तणावामुळे (Workplace Stress) मानसिक आरोग्य समस्यांशी झुंजत आहेत.
याहूनही गंभीर बाब म्हणजे, कामाच्या ठिकाणी वाढलेला तणाव थेट कर्मचारी गळतीला (Attrition) कारणीभूत ठरत आहे. foundit Appraisal Trends Report 2025 नुसार, पगारवाढ मिळूनही तब्बल 86% कर्मचारी पुढील काही महिन्यांत नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत.
विशेष म्हणजे, ज्यांना २० टक्क्यांपेक्षा जास्त पगारवाढ मिळाली आहे, तेच नोकरी सोडण्यास सर्वात जास्त उत्सुक आहेत. यावरून स्पष्ट होते की, कर्मचाऱ्यांसाठी केवळ पैसा महत्त्वाचा नसून, कामाचे वातावरण आणि मानसिक समाधान अधिक महत्त्वाचे ठरत आहे.
या आव्हानाला तोंड देण्यासाठी अनेक कंपन्यांनी ठोस पावले उचलली आहेत. फायनान्शिअल एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत माहिती दिलीये. अन्न आणि सुविधा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपास ग्रुप इंडिया (Compass Group India) कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी मानसिक आरोग्य हेल्पलाईन, कामाच्या दरम्यान नियोजित विश्रांती (Structured Rest Breaks), आणि 'समर्थ' या इन-हाऊस अॅपद्वारे बहुभाषिक कौशल्य विकासाचे कार्यक्रम सुरू केले आहेत.
नोब्रोकर (NoBroker) या प्रॉपटेक स्टार्टअपने कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत क्रिकेट स्पर्धा, ट्रेकिंग, डेस्क योगा यांसारख्या उपक्रमांसोबतच आध्यात्मिक उपक्रम तसेच पौष्टिक आणि आर्थिक आरोग्याविषयी कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. "आम्ही अनुपस्थिती, आनंद निर्देशांक (Happiness Index), आणि कार्यक्षमतेतील घट या तीन गोष्टींकडे लक्ष ठेवतो. या तीन गोष्टींवर परिणाम अथवा बदल झाल्याचे लक्षात आले की २४ तासांच्या आत त्यांच्याशी संपर्क साधतो", असं कंपनीने म्हटलंय.
ड्युरोफ्लेक्स ग्रुप (Duroflex Group) या स्लीप सोल्यूशन्स कंपनीने कार्यालयात पॉवर नॅप पॉड्स बसवले आहेत. "सतत 'ऑलवेज-ऑन' राहण्याच्या संस्कृतीमुळे कर्मचाऱ्यांच्या झोपेवर परिणाम होतो, जे बर्नआउटचे प्रमुख कारण आहे," असे CHRO ऋतु भारद्वाज मोइत्रा यांनी सांगितले. त्यांच्या मते, कामाच्या दरम्यान घेतलेली एक छोटी डुलकी (Power Nap) लक्ष केंद्रित करण्यास, तणाव कमी करण्यास आणि सर्जनशीलता वाढविण्यात मदत करते.
भारतीय कंपन्यांच्या कार्यपद्धतीतील हा बदल आगामी काळात इतर कंपन्यांसाठीही दिशादर्शक ठरेल, अशा आशा व्यक्त होत आहे.