

डॉ. प्राजक्ता पाटील
आपल्या बोल्ड फॅशन स्टेटमेंटस् आणि थेट विचारांमुळे कायम चर्चेत असणारी उर्फी जावेद त्वचेच्या उपचारांबाबतही तितकीच स्पष्टवक्ती आहे. अलीकडेच तिने पुन्हा एकदा लिप फिलर्सबाबत आपला वैयक्तिक अनुभव शेअर केला आहे. काही वर्षांपूर्वी तिने आपले ओठ भरगच्च दिसावेत यासाठी लिप फिलर्स घेतले होते; मात्र आता हे फिलर्स चुकीच्या पद्धतीने बसवले गेल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिने ते काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
उर्फी जावेदने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती लिप फिलर्स डिझॉल्व (विरघळवून) करून घेताना दिसते. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, हा काही फिल्टर नाहीये. मी फिलर्स डिझॉल्व करवण्याचा निर्णय घेतला. कारण ते चुकीच्या जागी जाऊन बसले होते. मी पुन्हा फिलर्स घेईन, पण अधिक नैसर्गिक पद्धतीने. मी फिलर्सना विरोध करत नाही, पण डिझॉल्व करणे खूप वेदनादायक असते.
या प्रक्रियेदरम्यान उर्फीचे ओठ चांगलेच सुजलेले दिसत होते. याआधीही तिने सांगितले होते की, ती केवळ 18 वर्षांची असताना तिने प्रथम लिप फिलर्स घेतले होते. तेव्हा तिच्याकडे फारसे पैसे नव्हते, पण तिचे ओठ खूप पातळ होते आणि तिला मोठे, फुललेले ओठ हवे होते, यासाठी तिने ही प्रक्रिया केली होती. आता मात्र तिला या कृत्रिम पद्धतीचा परिणाम तिच्या चेहर्यावर चुकीच्या पद्धतीने होत आहे.
लिप फिलर्स हा एक कॉस्मेटिक उपचार असून ओठ मोठे आणि उठावदार दिसावेत यासाठी केले जातात. ही प्रक्रिया तात्पुरती असते आणि काही महिन्यांनी ती नव्याने करून घ्यावी लागते. बहुतेक वेळा ही प्रक्रिया सुरक्षित मानली जाते, मात्र काही दुष्परिणाम होऊ शकतात :
ओठांमध्ये अतिसूज : काही वेळा फिलर्समुळे ओठ गरजेपेक्षा जास्त सुजतात.
इन्फेक्शनचा धोका : इंजेक्शनच्या ठिकाणी बॅक्टेरियल, फंगल किंवा व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका राहतो.
त्वचेला दुखापत: टिश्यू डॅमेज, फोड येणे किंवा त्वचेचा रंग उडणे असे परिणाम होऊ शकतात.
लंप्स किंवा गाठी निर्माण होणे: कधी कधी फिलर्स नीट विरघळत नाहीत आणि एका जागी गाठीसारखे गोळे तयार होतात.
शेप बिघडणे: जर फिलर्स चुकीच्या प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने दिले गेले, तर ओठांचा नैसर्गिक आकारही बिघडू शकतो.
जेव्हा फिलर्स चुकीचे बसतात, तेव्हा ते हायलुरोनिडेस नावाच्या एंजाईमच्या मदतीने डिझॉल्व (विरघळवून) केले जातात. ही प्रक्रिया देखील वेदनादायक असते. उर्फीने याचाही अनुभव सांगितला आणि स्पष्ट शब्दांत इतरांनाही योग्य डॉक्टरकडूनच उपचार करून घेण्याचा सल्ला दिला.
भारतामध्ये लिप फिलर्सचा खर्च शहरानुसार व क्लिनिकनुसार वेगवेगळा असतो. साधारणतः हा खर्च 18 ते 40 हजारांपर्यंत असतो. यामध्ये वापरल्या जाणार्या फिलरच्या प्रमाणावर आणि सेशन्सच्या संख्येवरही खर्च अवलंबून असतो.
लिप फिलर्सचा परिणाम कायमस्वरूपी नसतो. बहुतेक फिलर्स हायलुरोनिक अॅसिडपासून बनवलेले असतात आणि ते सुमारे 6 महिने ते 1 वर्ष टिकतात. शरीर हळूहळू हा पदार्थ शोषून घेतो आणि ओठ पुन्हा त्यांच्या मूळ स्वरूपात परतू लागतात. हे किती काळ टिकेल हे व्यक्तीच्या शरीरघटकांवर आणि वापरलेल्या फिलरच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.
लिप फिलरचा परिणाम संपल्यानंतर ओठ हळूहळू त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत परततात. हायलुरोनिक अॅसिड शरीरात पूर्णपणे शोषले जाते आणि कोणताही कायमस्वरूपी बदल राहत नाही. मात्र, अनेक वेळा वारंवार लिप फिलर्स घेतल्यामुळे ओठांची त्वचा सैल होऊ शकते आणि नैसर्गिक रचना किंचित बदलू शकते.
लिप फिलर ही एक नॉन सर्जिकल प्रक्रिया आहे. यात केवळ इंजेक्शनद्वारे हायलुरोनिक अॅसिड ओठांमध्ये इंजेक्ट केले जाते. संपूर्ण प्रक्रिया 15 ते 30 मिनिटांत पूर्ण होते आणि त्यानंतर लगेच दैनंदिन कामकाज सुरू करता येते.