

आपण चारचौघांसमवेत गप्पा मारत बसलो असताना अचानक शरीराच्या एखाद्या भागाला खाज सुटते अशा वेळी चारचौघांसमोर तो भाग खाजवणे आपल्याला योग्य वाटत नाही. मात्र, आलेली खाज थांबवताही येत नाही. अशा वेळी आपली अवस्था बिकट बनते.शरीराच्या वेगवेगळ्या भागात खाज उठण्याची समस्या अनेकांना जाणवते. या समस्येवर वेळीच उपाय केला पाहिजे. आपल्या त्वचेला अनेक प्रकारच्या संसर्गांना तोंड द्यावे लागत असते. एक्झिमा हे अशाच संसर्गापैकी एका संसर्गाचे नाव आहे. हा संसर्ग होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. शरीराची पचनशक्ती बिघडल्यामुळे खाज उठू शकते. 'सरकॉप्टस' नावाच्या घटकामुळे ही खाज उठते. एक्झिमा या व्याधीमुळे संपूर्ण शरीरावर खाज उठते. ही खाज कशी आटोक्यात आणायची हे आपल्याला कळेनासे होते. त्यामुळे चारचौघांत आपली स्थिती अवघडल्यासारखी होते.
एक्झिमा होण्याची कारणे वेगवेगळी आहेत. त्वचेला अॅलर्जी होऊ शकणार्या घटकांच्या संपर्कात आल्यामुळे एक्झिमा होतो. घरात धुळीमुळे सुद्धा ही अॅलर्जी होऊ शकते. घराच्या किंवा स्वच्छतागृहाच्या साफसफाईसाठी वापरली जाणारी औषधे, सफाईची साधने यांचाही त्वचेवर विपरीत परिणाम होतो.खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी, बद्धकोष्टता, दम्याच्या उपचारावर घेतली जाणारी काही औषधे यामुळेही एक्झिमा होऊ शकतो. एखाद्याला एखाद्या गोष्टीची अॅलर्जी असेल तर त्याला एक्झिमा होण्याची दाट शक्यता असते. ज्यांना एखाद्या वस्तूची, पदार्थाची अनुवंशिक अॅलर्जी असते अशांना एक्झिमा होतो असे अनेकदा अनुभवास येते.
दोन महिन्यांच्या बाळापासून दीड वर्षाच्या बाळापर्यंत एक्झिमा होतो. लहान मुलांमध्ये चेहरा, मान, कान या शरीराच्या अवयवांवर एक्झिमाचा परिणाम होतो, असे दिसून येते. प्रौढ व्यक्तींना तसेच तरुणांना कोपर्याच्या आतल्या भागावर तसेच गुडघ्यावर एक्झिमा होऊ शकतो. जीरोसीस एक्झिमा नावाच्या प्रकारात त्वचा पूर्णतः कोरडी होऊन जाते. ही व्याधी वृद्ध नागरिकांना अधिक प्रमाणात होते. हिवाळ्याच्या काळात ही व्याधी होण्याचे प्रमाण जास्त असते.
हिवाळ्यात त्वचा कोरडी होण्याचे प्रमाण वाढते. अशा व्यक्तींनी जास्त वेळ अंघोळ करू नये. तसेच बाथरूमध्येही खूप वेळ थांबू नये. साबणाचा वापर पूर्णपणे टाळावा. मॉईश्चरायझरचा वापर करावा. शरीराच्या काही भागांवर आग होते किंवा खाजू लागते, तेव्हा ही व्याधी झाली आहे असे समजले जाते. रात्रीच्या वेळेला खाज उठण्याचे तसेच त्वचेची आग होण्याचे प्रमाण वाढते. ज्या भागावर खाज उठत असेल त्या भागातून काही वेळा पाणीही येते. त्वचा कडक होऊन ती फाटू लागते. एक्झिमामुळे त्वचा खडबडीत होऊन जाते. अशा त्वचेवर वारंवार खाजवण्याची इच्छा होऊ लागते. या व्याधीवर उपचार करण्यासाठी अँटिबायोटिक्स औषधांचा वापर केला जातो.
एक्झिमा व्याधी झालेल्या लोकांनी सुगंधी साबण, सौंदर्य प्रसाधने, डिटर्जंट पावडर यांचा वापर टाळावा. उन्हाळ्यापासून बचाव करावा. तापमानत बदल झाल्यामुळे एक्झिमा झालेल्या भागात खूप खाज उठते. अशा वेळी खाजवायचे टाळावे. ही व्याधी झालेल्या रुग्णांनी शरीराला घट्ट बसतील असे कपडे वापरणे टाळावेत. अशा व्यक्तींनी उन्हात बसून सूर्यप्रकाश अंगावर घ्यावा. खाजू लागल्यावर कोमट पाण्याने अंघोळ करावी. अंघोळीनंतर लगेचच शरीराला ऑलिव्ह ऑईल लावावे. या तेलाने शरीराला हळूहळू मसाज केल्यास आराम मिळतो. खाज उठणार्या भागावर नारळाचे तेल लावावे. ओमेगा थ्री तेलाने शरीराला मसाज केल्यासही आराम मिळतो.