

Early Childhood Sugar Intake Long Term Health Benefits
आयुष्याच्या पहिल्या १,००० दिवसांत (गर्भाधारणेपासून ते बालकाच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंत) साखरेचे सेवन मर्यादित ठेवल्यास जैविक वयोमान वाढण्याचा वेग मंदावतो आणि पुढील तब्बल पाच दशकांनंतर कर्करोगाचा धोका कमी होतो, असे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे.
'प्रोसीडिंग्ज ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस' (PNAS) या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात बालपणातील साखरेच्या सेवनाचा प्रौढावस्थेतील आरोग्यावर कसा परिणाम होतो, याचा शोध घेण्यात आला. यासाठी १९५१ ते १९५६ दरम्यान जन्माला आलेल्या 'युके बायोबँक'मधील ६४,००० हून अधिक सहभागींच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले.
संशोधकांनी दुसऱ्या महायुद्धानंतरच्या ब्रिटनमधील एका नैसर्गिक प्रयोगाचा आधार घेतला, जेव्हा सप्टेंबर १९५३ मध्ये साखरेचे रेशनिंग (वाटप) संपले होते. रेशनिंग संपल्यानंतर ब्रिटनमध्ये साखरेचा सरासरी दैनंदिन वापर सुमारे ४१ ग्रॅमवरून थेट ८० ग्रॅमपर्यंत म्हणजे दुप्पट झाला, तर इतर प्रमुख अन्नपदार्थांचा वापर स्थिर राहिला.
कर्करोगाच्या धोक्यात घट: ज्यांचा आयुष्याचा पहिला १,००० दिवसांचा काळ साखरेच्या रेशनिंगदरम्यान गेला, त्यांच्यात प्रौढावस्थेत यकृत, गुदाशय, फुफ्फुस, प्रोस्टेट आणि स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी आढळून आले.
जैविक वय कमी: रेशनिंग काळात जन्मलेल्या लोकांच्या पेशींमधील 'टेलॉमियर्स' (गुणसूत्रांचे संरक्षण करणारे घटक) अधिक लांब असल्याचे आढळले. यामुळे त्यांचे जैविक वय सुमारे दोन वर्षांनी कमी असल्याचे स्पष्ट झाले. तसेच, दीर्घकालीन दाह आणि प्रतिकात्मक प्रणालीशी संबंधित 'ग्रँझाइम बी' या प्रथिनाचे प्रमाणही त्यांच्यात कमी होते.
दीर्घकालीन सवयी: साखरेच्या मर्यादांमध्ये वाढलेल्या व्यक्ती ५० वर्षांनंतरही कमी साखरेचे सेवन करत होत्या आणि अधिक पौष्टिक आहार घेत होत्या. बालपणातील या सवयी आयुष्यभर टिकून राहिल्याचे दिसले.
स्मृतीभ्रंशाचा (डीमेन्शिया) धोका कमी: सुरुवातीच्या काळात साखरेवर नियंत्रण ठेवल्यास मेंदूचे आरोग्य चांगले राहून भविष्यात डिमेन्शियाचा धोका कमी होण्यास मदत होते.
"बालपणातील आहाराचा आरोग्यावर परिणाम होतो हे अपेक्षित असले, तरी केवळ पहिल्या १,००० दिवसांतील साखरेच्या सेवनाचा फरक ५० वर्षांनंतरही आरोग्यावर आणि आहाराच्या सवयींवर दिसून येणे हे खरोखरच आश्चर्यकारक आहे," असे कॅम्ब्रिज विद्यापीठाचे संशोधक वायलाँग झँग यांनी स्पष्ट केले. हे संशोधन ब्रिटनमधील महायुद्धानंतरच्या काळातील लोकांवर आधारित असून, केवळ साखरेचा वापर कमी केल्यानेच हे सर्व फायदे झाले असा थेट निष्कर्ष काढता येत नसला तरी, सुरुवातीच्या काळातील योग्य पोषण आयुष्यभरासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते, हे यातून स्पष्ट होते.