

डॉ. भारत लुणावत
थायरॉईडचे निदान झाल्यानंतर अनेकांना असे वाटू लागते की, आपले वजन केवळ याच कारणामुळे झपाट्याने वाढत आहे; मात्र हे खरोखरच सत्य आहे का?
अनेक महिला असे म्हणताना आढळतात की, आम्हाला वजन वाढवणारा थायरॉईड आहे, त्यामुळेच आमचे वजन सतत वाढत आहे. हायपोथायरॉईडिझम असलेल्या बहुतांश रुग्णांना असे वाटते की, आपले वजन केवळ थायरॉईडमुळेच वाढत आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे आपल्या हाती नाही; मात्र ही धारणा खरोखरच योग्य आहे का की हे केवळ एक निमित्त आहे?
वस्तुतः लठ्ठपणा हा थायरॉईडमुळे वाढत नाही, तर व्यक्ती अधिकाधिक लठ्ठ होत गेल्यामुळेच तिचा थायरॉईड बिघडत जातो. अतिरिक्त वजनवाढीमुळे शरीरात लेप्टिन तसेच इतर दाहजनक सायटोकाइन्स स्रवू लागतात. यामुळे शरीरात दीर्घकाळ दाहावस्था (इन्फ्लेमेशन) टिकून राहते आणि विविध प्रकारच्या स्वयंप्रतिरक्षा (ऑटोइम्यून) प्रतिक्रियाही घडू लागतात. याचा फटका थायरॉईड ग्रंथीलाही बसतो आणि हाशिमोटो थायरॉईडायटिससारखी समस्या उद्भवू लागते. लठ्ठपणामुळे इन्सुलिन-प्रतिरोधाची (इन्सुलिन रेझिस्टन्स) समस्याही निर्माण होते, जी थायरॉईड ग्रंथीला योग्य पद्धतीने कार्य करू देत नाही.
लठ्ठपणा शरीरातील अनेक अवयवांना हानी पोहोचवतो, त्यापैकीच एक थायरॉईड ग्रंथीही आहे. त्यामुळे जोपर्यंत लठ्ठपणावर नियंत्रण मिळवले जात नाही, तोपर्यंत थायरॉईडची समस्या कायम राहण्याची शक्यता असते. यासाठी जीवनशैली व आहारावर लक्ष देणे, नियमित व्यायाम करणे आणि स्नायूंच्या बळकटीवर भर देणे आवश्यक आहे.
हायपोथायरॉईडिझममुळे चयापचयाची (मेटाबॉलिझम) गती काहीशी मंदावू शकते, ज्यामुळे काही व्यक्तींचे वजन वाढू लागते. मात्र अत्याधिक लठ्ठपणासाठी संपूर्णतः थायरॉईडलाच जबाबदार धरणे योग्य नाही, कारण हे मोठ्या प्रमाणात व्यक्तीच्या जीवनशैलीवर अवलंबून असते. आहार, शारीरिक हालचाल, पुरेशी झोप आणि मानसिक आरोग्य यांवर योग्य लक्ष दिल्यास वजन निश्चितच नियंत्रणात राखता येऊ शकते. थायरॉईड आणि लठ्ठपणा यांच्यातील नाते हे एकतर्फी नसून परस्परसंबंधित आहे. त्यामुळे केवळ थायरॉईडवर खापर फोडण्याऐवजी स्वतःच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे हाच यावरील खरा उपाय ठरतो.