

उन्हाळ्यात आतड्यांमध्ये संसर्ग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे उलट्या आणि जुलाब होतात. हे वेळीच थांबवले नाही, तर शरीरातील पाण्याचे प्रमाण खूप कमी होते. त्यावेळच्या स्थितीला डायरिया म्हणतात.
उन्हाळ्याच्या दिवसांत जेवणाच्या पदार्थांमध्ये जंतूंची वाढ लवकर होते. बुरशीचे प्रमाणही दुप्पट होते. त्यामुळे स्वयंपाक करताना स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. तयार झालेले अन्न उघडे ठेवू नये. त्यावर माश्या बसू देऊ नयेत. तयार जेवण खराब झाले, तर त्या अन्नातून विषबाधा होण्याचा धोका संभवतो. या दिवसात शरीरातील पाणी कमी झाल्यास, पचनशक्ती कमजोर झाल्यास, पोटात जीवाणूंचा संसर्ग झाल्यास डायरिया होऊ शकतो.
लक्षणे : डायरियाचे मुख्य लक्षण म्हणजे पातळ जुलाब. साधारणपणे रुग्णाला चोवीस तासांत चार-पाच वेळा पातळ जुलाब होतात. त्याशिवाय पोटाच्या खालच्या बाजूला वेदना होतात. कधी तरी पोटात पीळ पडल्यासारखे दुखते. त्यातच ताप आणि अशक्तपणामुळे मरगळल्यासारखे होते. काही रुग्णांमध्ये जुलाबाबरोबर उलट्याही होतात. अशक्तपणामुळे डोळ्यापुढे अंधारी येऊन चक्कर येते. त्याशिवाय शरीरातील पाणी कमी झाल्याने त्वचा निस्तेज होते.
काय असतो धोका?
सतत जुलाब झाल्याने शरीरातील आवश्यक पाण्याचे प्रमाण खूप कमी होते. त्याचबरोबर शरीरातील मिठाचे प्रमाण कमी होत असल्याने शरीर अशक्त होते. पाणी आणि मिठाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाल्यास ही अवस्था जीवघेणी ठरू शकते.
लहान मुलांमध्ये जास्त नुकसान : मुलांना वारंवार संसर्ग झाल्यास मोेठेपणी त्यांची प्रतिकारशक्ती वाढते, असे काही लोक मानतात; पण डायरियासारख्या रोगांमुळे लहान मुलांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. ती कुपोषित राहिल्यामुळे त्याची शक्ती वाढत नाही. आतड्यांमध्ये सतत संसर्ग झाल्यामुळे पोषण कमी होऊन मुलांना जीवनसत्त्वांची कमतरता भासते, ज्यामध्ये बी 12, डी जीवनसत्त्वाची कमतरता आणि ते शोषून घेण्याची क्षमताही घटते. हल्ली सर्वत्र उपलब्ध असणार्या ओआरएसच्या द्रव्यामुळे डायरियाने होणार्या मृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे. डायरियाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण, रोटाव्हायरस लस देण्यासाठी प्रोत्साहन देणे आदी गोष्टींवर भर दिला जातो.
आहार कमी, पेय जास्त : उन्हाळ्यामुळे आतड्यांची पचनशक्ती मंदावलेली असतेच, त्यात डायरिया झाल्यावर पचनशक्ती अजून खालावते त्यामुळे जेवण पचायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे डायरियाच्या रुग्णाने हलका आणि पचनास हलका आहार घ्यावा. एकाच वेळी न खाता थोड्या थोड्या वेळाने खावे. तेलकट पदार्थ, भाज्या, पोळी, भात खाण्यापेक्षा पातळ पदार्थ खाण्यास प्राधान्य द्यावे. दही आणि ताक यांचे जास्तीत जास्त सेवन करावे. त्यात काळे मीठ टाकावे. आंब्याचे पन्हे, लिंबू पाणी प्यावे. यातून मिळणारी जीवनसत्त्वे शरीराला आवश्यक ताकद देतात; मात्र बाहेर रस्त्यावर कापलेली फळे खाणे टाळावेच. कापलेल्या फळांवर बसलेल्या माश्यांमुळे ते पदार्थ दूषित होतात. ताजी फळेसुद्धा स्वच्छ धुतल्याशिवाय खाऊ नये. खरबूज आणि टरबूज यांच्यासारखी फळे उन्हाळ्यात खावीत.
बाहेर पडताना काही काळजी घ्या…
* उन्हाची वेळ टाळावी.
* फिरायला जाण्यासाठी सकाळी अथवा संध्याकाळची वेळ निवडावी.
* दुपारी बाहेर पडायचे असेल, तर डोके आणि कान झाकून बाहेर पडा.
* उन्हाळ्यात बाहेर पडताना छत्री आणि टोपी वापरावी.
* प्रवास करताना भरपूर पाणी प्यावे; मात्र पाणी स्वच्छ असण्याकडे लक्ष द्या.
* अधूनमधून साखर-मिठाचे पाणी प्यावे. इलेक्ट्रॉलचे सेवन करा.
* प्रवासात वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांची काळजी घ्यावी, त्यांना डायरियाचा संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त आहे.
* प्रवासात पेय पदार्थांचे प्रमाण जास्त असावे. त्याशिवाय खाण्यापिण्याच्या वेळा पाळाव्यात.
* या दिवसांत अन्नातून विषबाधा होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी ताजे शिजवलेले अन्न खावे. पेय पदार्थ जास्त प्रमाणात घ्यावे. डायरियापासून बचाव करण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा. टरबूज, खरबूज, काकडी यासारख्या पाणीदार फळे भाज्या खाव्यात. त्या खाताना स्वच्छ पाण्यात धुवून मगच खाव्यात.
डॉ. मनोज शिंगाडे