Diabetes Diet During Diwali: दिवाळीत मधुमेहींनी काय खावे आणि काय टाळावे? डॉक्टरांनी दिल्या महत्त्वाच्या टिप्स

मधुमेह असलेल्या व्यक्तींना दिवाळीच्या काळात आहाराचे नियोजन करणे आवश्यक असते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी काय खावे, कोणते पदार्थ टाळावेत आणि कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या.
Diabetes Diet During Diwali
Diabetes Diet During DiwaliFile Photo
Published on: 
Updated on: 

Diabetes Diet During Diwali

देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत असून, घरोघरी फराळाची रेलचेल सुरू आहे. लाडू, करंजी, चकली, बर्फी आणि गुलाबजाम यांसारख्या पदार्थांचा आस्वाद घेताना अनेकदा खाण्यावर नियंत्रण राहत नाही. मात्र, मधुमेह असलेल्या व्यक्तींना सणासुदीच्या काळात आहाराचे नियोजन करणे आवश्यक असते. मिठाईतील अतिरिक्त साखर आणि फराळातील कर्बोदकांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे दिवाळीचा आनंद घेतानाच रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी काय खावे, कोणते पदार्थ टाळावेत आणि कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

फोर्टिस रुग्णालय, मानेसर येथील सल्लागार एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. अनु मॅथ्यू यांनी दिलेल्या माहितीनुसार, सणासुदीच्या काळात मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखरेची पातळी वाढण्याबरोबरच ती अचानक कमी होण्याचाही धोका असतो. विशेषतः उपवास करणाऱ्या आणि इन्सुलिन किंवा काही विशिष्ट औषधे घेणाऱ्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर कमी होण्याची शक्यता असते. तसेच उपवास केल्यानंतर एकाच वेळी जास्त खाण्याच्या सवयीमुळे डायबेटिक कीटोअॅसिडोसिससारख्या गंभीर समस्येचा धोका वाढू शकतो.

त्यामुळे सणासुदीच्या काळात कर्बोदकांचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाताना विशेष काळजी घ्यावी. असे पदार्थ प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांसोबत खावेत. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याचा धोका कमी होण्यास मदत होते.

Diabetes Diet During Diwali
Healthy lifestyle tips: दिवसभर थकवा जाणवतोय? त्वरित बदला तुमच्या या ५ सवयी

शुगर फ्री मिठाईही पूर्णपणे सुरक्षित नाही

अनेक मधुमेही रुग्ण साखरेऐवजी शुगर फ्री मिठाईला पसंती देतात. मात्र, अशा मिठाया पूर्णपणे सुरक्षित असतातच असे नाही. त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या काही घटकांमुळेही रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी दिवसातून दोन ते तीन वेळा रक्तातील साखरेची तपासणी करावी. उपवास करायचा असल्यास आधी डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य नियोजन करावे. उपवासाच्या काळात इन्सुलिन घेणे स्वतःहून बंद करू नये. विशेषतः टाइप-१ मधुमेह असलेल्या रुग्णांनी याबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच मिठाई रिकाम्या पोटी खाण्याऐवजी जेवणानंतर मर्यादित प्रमाणात खावी. जेवण झाल्यानंतर थोडे चालणेही फायदेशीर ठरते.

दिवाळीत मधुमेहींनी काय खावे?

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी दिवाळीच्या काळात आहारात काही बदल करणे गरजेचे आहे. शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळेल आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहील, अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. हिरव्या पालेभाज्या, पनीर, टोफू, दही, अंडी आणि कमी चरबीयुक्त चिकन यांसारखे पदार्थ खावेत. मैदा आणि रिफाइंड कर्बोदकांऐवजी ब्राऊन राइस, गहू, बाजरी, ओट्स आणि डाळी यांचा आहारात समावेश करा. पॅकेटमधील नमकीन आणि प्रक्रिया केलेल्या स्नॅक्सऐवजी भाजलेले सुकामेवा किंवा चणा चाट खा. घरी मिठाई तयार करताना कमी कॅलरी असलेल्या किंवा नैसर्गिक गोडवा देणाऱ्या पदार्थांचा मर्यादित वापर करा.

कोणते पदार्थ खाणे टाळावे?

दिवाळीत आवडीचे पदार्थ खाण्याचा मोह होणे स्वाभाविक आहे. मात्र, मधुमेहाच्या रुग्णांनी काही पदार्थांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आवडती मिठाई खायची असल्यास जेवणानंतर साधारण २५ ग्रॅमपर्यंतच खावी. चकली, समोसा आणि इतर तळलेल्या पदार्थांचे सेवन कमी करावे. गोड पेये, सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅकेटमधील फळांचे रस पिणे टाळावे. फळांचा रस पिण्याऐवजी संपूर्ण फळ खाण्याला प्राधान्य द्यावे.

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?

दिवाळीच्या काळात आहारासोबतच दैनंदिन दिनचर्येकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. आवडती मिठाई खाता यावी म्हणून जेवण वगळण्याची चूक करू नका. यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होऊ शकतात. तसेच नंतर जास्त खाण्याची शक्यता वाढते. सणाच्या धावपळीत मधुमेहाची औषधे किंवा इन्सुलिन घेण्यास विसरू नका. डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळापत्रकाचे पालन करा. दिवाळीच्या दिवसांत आहारात बदल होत असल्याने रक्तातील साखरेची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे पातळीत होणारे बदल वेळीच लक्षात येऊ शकतात. जड जेवण केल्यानंतर १५ ते ३० मिनिटे चालावे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. दिवसभर पुरेसे पाणी पित राहा. शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहिल्यास मूत्रपिंडांना अतिरिक्त साखर बाहेर टाकण्यास मदत होते.

Diabetes Diet During Diwali
Shamonda virus: शामोंडा विषाणुचा मानवातील पहिला रुग्ण फ्रान्समध्ये आढळला; काय आहे हा धोकादायक आजार आणि त्याची लक्षणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.