

सकाळची वाढलेली शुगर ही मधुमेहींसाठी एक मोठी डोकेदुखी ठरते. दिवसभर सर्व पथ्यं पाळूनही, सकाळी काहीही न खाता रक्तातील साखर वाढलेली दिसली की संपूर्ण दिवसाचा उत्साहच निघून जातो. यालाच 'डॉन फेनोमेनन' (Dawn Phenomenon) म्हणतात. हा तुमच्या रात्रीच्या जेवणाचा परिणाम नसून, तुमच्या शरीरात झोपेत होणाऱ्या एका नैसर्गिक बदलाचा खेळ आहे. चला, यामागचं विज्ञान आणि त्यावर नियंत्रण मिळवण्याचे सोपे मार्ग जाणून घेऊया.
सल्लागार आहारतज्ज्ञ कनिक्का मल्होत्रा यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगीतले आहे की, "ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्यात साधारणपणे पहाटे 2 ते रात्री 8 च्या दरम्यान रक्तातील साखर आपोआप वाढते. याचे कारण म्हणजे, या वेळेत आपले शरीर कॉर्टिसोल आणि ग्रोथ हार्मोनसारखे काही विशिष्ट हार्मोन्स (संप्रेरके) तयार करते."
आपल्याला दिवसाची सुरुवात करण्यासाठी ऊर्जा मिळावी यासाठी, हे हार्मोन्स आपल्या यकृताला (लिव्हरला) रक्तामध्ये साखर सोडण्याचा संदेश देतात.
फरक काय आहे?
दिवसभरात जेवणानंतर किंवा व्यायामानंतर वाढणारी साखर आपल्या खाण्यापिण्याशी संबंधित असते.
पण 'डॉन फेनोमेनन'मुळे वाढणारी साखर ही खाण्यापिण्यामुळे नाही, तर शरीराच्या नैसर्गिक घड्याळामुळे आणि हार्मोन्समधील बदलांमुळे वाढते.
निरोगी व्यक्तीमध्ये, इन्सुलिन ही वाढलेली साखर नियंत्रणात आणते. पण मधुमेही रुग्णांमध्ये इन्सुलिन योग्यप्रकारे काम करत नसल्यामुळे, ही साखर तशीच वाढलेली राहते आणि सकाळी तपासल्यावर जास्त दिसते.
तज्ज्ञांच्या मते, टाइप १ किंवा टाइप २ मधुमेह असलेल्या सुमारे ५०% लोकांना याचा अनुभव येतो. विशेषतः खालील लोकांना याचा धोका जास्त असतो:
ज्यांची शुगर नियंत्रणात नसते.
ज्यांच्या शरीरात इन्सुलिनचा प्रतिकार जास्त असतो.
वृद्ध व्यक्ती.
ज्यांची झोप पूर्ण होत नाही किंवा झोपेचे वेळापत्रक बिघडलेले असते, अशा लोकांना याचा धोका जास्त असतो
'डॉन फेनोमेनन' पूर्णपणे थांबवता येत नसले तरी, काही गोष्टींची काळजी घेऊन त्यावर नियंत्रण मिळवता येते.
औषधांची वेळ बदला: तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने रात्रीची औषधे किंवा इन्सुलिन घेण्याची वेळ बदलून झोपेच्या जवळ आणता येते.
रात्रीचे जेवण: रात्रीचे जेवण लवकर करा आणि झोपण्यापूर्वी जास्त कर्बोदके (उदा. भात, बटाटा, गोड पदार्थ) असलेले पदार्थ खाणे टाळा.
हलका व्यायाम: संध्याकाळी किंवा रात्रीच्या जेवणानंतर हलके चालणे किंवा व्यायाम करणे फायदेशीर ठरू शकते.
डॉक्टरांचा सल्ला: काहीवेळा डॉक्टर औषधांमध्ये बदल सुचवू शकतात किंवा इन्सुलिन पंप वापरण्याचा सल्ला देऊ शकतात.
तुमच्या आहारात, व्यायामात किंवा औषधांमध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. ते तुमच्या प्रकृतीनुसार योग्य मार्गदर्शन करतील.