

डॉ. मनोज शिंगाडे
काही व्यक्ती परागकणांच्या संपर्कात येताच शिंका येण्यास सुरुवात होते, असे अनेकदा आपल्या निदर्शनास आले असेल. हे एका विशिष्ट प्रकारच्या अॅलर्जीमुळे घडते. अॅलर्जीमध्ये शरीर काही बाह्य कणांप्रति अतिसंवेदनशील बनते. कधीकधी सततच्या शिंकांपेक्षाही ही अॅलर्जी अधिक गंभीर स्वरूप धारण करते. याला अॅलर्जिक र्हायनायटिस असे संबोधले जाते.
अॅलर्जिक र्हायनायटिस हा विशिष्ट अॅलर्जीकारक घटकांमुळे (अॅलर्जन) उद्भवणारा विकार आहे. अॅलर्जीच्या प्रतिक्रियेदरम्यान इम्युनोग्लोब्युलिन ई (आयजीई) या प्रतिपिंडांचे (अँटिबॉडीज) अशा पेशींशी संयोजन होते, ज्या हिस्टामिन नामक रसायन फुफ्फुसे, त्वचा आणि श्लेष्मल त्वचेत (म्युकस मेम्ब्रेन) स्रवतात. हे हिस्टामिन रक्तवाहिन्या विस्तारित करते. यामुळे त्वचेवर लालसरपणा आणि पटलात सूज निर्माण होते. याचा परिणाम म्हणून नाक बंद होते व शिंका येऊ लागतात. धुळीचे कण, प्राणी, परागकण, बुरशी, झुरळे, धूर, वायू प्रदूषण, तीव्र गंध, धूर तसेच काही औषधे अशा विविध कारणांमुळे ही अॅलर्जी उद्भवू शकते.
लक्षणे कोणती?
सतत शिंका येणे, डोळे व नाकातून पाणी वाहणे, नाक चोंदणे आणि सातत्याने डोकेदुखी होणे ही ॲलर्जिक र्हायनायटिसची प्रमुख लक्षणे आहेत. ही लक्षणे दीर्घकाळ टिकून राहिल्यास डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होऊ शकतात. ही स्थिती स्वतः फारशी हानिकारक नसली, तरी वेळीच उपचार न घेतल्यास सायनसदाह (सायनसायटिस) व दम्यासारख्या गंभीर विकारांचे कारण बनू शकते.
ऋतुबदलामुळे उद्भवणारी अॅलर्जी वातावरणातील बदल हेही अॅलर्जिक र्हायनायटिसचे एक प्रमुख कारण आहे. काही ऋतूंमध्ये ही अॅलर्जी विशेषत्वाने जाणवू शकते. थंड, धूळमिश्रित किंवा दमट हवामानामुळेही ही अॅलर्जी उद्भवू शकते. आपल्या सभोवतालचे वातावरण आरोग्याच्या स्थितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. फूलझाडांच्या सूक्ष्म परागकणांमुळेही अनेकांना ही अॅलर्जी होऊ शकते. ज्या ठिकाणी फूलझाडांचे प्रमाण अधिक असते, तेथे हा विकार सहजपणे बळावू शकतो.
आहारामुळे उद्भवणारी अॅलर्जी
काही व्यक्तींना विशिष्ट अन्नपदार्थांचीही अॅलर्जी असते. कफ वाढवणार्या पदार्थांचे अतिसेवन शरीरात कफाचे प्रमाण वाढवू शकते, ज्यामुळे हा विकार होण्याची शक्यता बळावते. अतिशय थंड व जड आहार शरीरास हानिकारक ठरू शकतो. दुग्धजन्य पदार्थ, गोड पदार्थ, अनारोग्यकारक खाद्य आणि कच्चे अन्न यांचे अतिसेवन केल्यास संसर्गाची शक्यता वाढते. आयुर्वेदानुसार शरीरातील कफदोषाच्या असंतुलनामुळेही अॅलर्जिक र्हायनायटिस उदभवू शकतो.
जीवनशैलीमुळे उद्भवणारी अॅलर्जी
काही वेळा आपल्या दैनंदिन सवयीच या अॅलर्जीस कारणीभूत ठरतात. अंथरूण-पांघरूण अस्वच्छ असल्यास अॅलर्जीकारक कण शरीरात सहजपणे प्रवेश करतात. धूम्रपान करणार्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहणेही धूम्रपानाची अॅलर्जी असणार्यांसाठी हानिकारक ठरू शकते. याखेरीज मऊ खेळणी, पाळीव प्राणी, झुरळे, भिंतीवरील कागद (वॉलपेपर), घरातील रोपे, बुरशी तसेच काही औषधांमुळेही ही अॅलर्जी होऊ शकते. अशा प्रकारची वर्षभरात कधीही उद्भवू शकते. योग्य वेळी लक्षणे ओळखून त्यावर उपाययोजना केल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते.