

"पंचकर्म" हा शब्द संस्कृतमधील असून "पंच" म्हणजे पाच आणि "कर्म" म्हणजे क्रिया किंवा उपचार. याचा अर्थ पाच विशिष्ट वैद्यकीय प्रक्रिया, ज्याद्वारे शरीरातून साचलेले दोष (विकार), विषारी घटक आणि अपान ऊर्जा बाहेर टाकली जाते. आम्ही वैद्य अशुतोश जेरे यांच्याशी चर्चा केली दरम्यान ते म्हणाले, पंचकर्म हा आयुर्वेदातील एक अत्यंत प्रभावी आणि मूलभूत उपचार पद्धती आहे, जी फक्त आजार बरा करत नाही तर शरीर, मन आणि आत्म्याचं शुद्धीकरणदेखील करतो.
वमन (Vaman – औषधी वांती देणे):
कफदोष वाढल्यास वापरले जाते. औषधाच्या साहाय्याने उलटी करवून शरीरातून दोष काढले जातात.
उपयोग: अॅलर्जी, त्वचारोग, दमा, कफसंबंधी विकार.
विरेचन (Virechan – औषधी जुलाब देणे):
पित्तदोषाचे शुद्धीकरण करण्यासाठी वापरले जाते.
उपयोग: त्वचाविकार, अॅसिडिटी, पित्तविकार, लीवर व आतड्यांचे विकार.
बस्ती (Basti – एनिमा/बुतीचा उपचार):
वातदोषासाठी अतिशय प्रभावी. औषधी तेल किंवा काढा गुदमार्गाने दिला जातो.
उपयोग: सांधेदुखी, पाठदुखी, स्नायू विकार, संधिवात, अपचन, स्त्रियांचे विकार.
नस्य (Nasya – नाकाद्वारे औषध देणे):
डोक्याशी संबंधित विकारांवर वापरले जाते. औषध नाकात टाकले जाते.
उपयोग: सायनस, डोकेदुखी, अॅलर्जी, केस गळणे, मेंदूशी संबंधित विकार.
रक्तमोक्षण (Raktamokshan – रक्तशुद्धी):
दूषित रक्त बाहेर काढले जाते.
उपयोग: फोड, त्वचाविकार, सोरायसिस, संधिवात, उच्च रक्तदाब.
वैद्य अशुतोष जेरे यांच्या मते, ऋतुनुसार पंचकर्म करणे अत्यंत आवश्यक आहे कारण प्रत्येक ऋतूमध्ये शरीरातील वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांचे प्रमाण बदलते. उदाहरणार्थ, पावसाळ्यात वात वाढतो, हिवाळ्यात कफ साचतो आणि उन्हाळ्यात पित्त प्रखर होते. हे दोष जर वेळेवर संतुलित केले नाहीत, तर अनेक आजारांना आमंत्रण मिळते. म्हणूनच आयुर्वेदात ऋतुनुसार वमन, विरेचन, बस्ती यांसारख्या पंचकर्म उपचारांची शिफारस केली जाते. यामुळे शरीर शुद्ध होते, चयापचय सुधारतो, प्रतिकारशक्ती वाढते आणि मनही शांत राहते. या प्रकारे ऋतुनुसार पंचकर्म घेतल्याने संपूर्ण आरोग्य टिकवून ठेवता येते.
वसंत ऋतू (उन्हाळा सुरू होण्याआधी) – वमन (कफ शुद्धी)
शरद ऋतू (ऑक्टोबर हिट) – पित्त शमक उपाय व विरेचन
वर्षा ऋतू (पावसाळा) – बस्ती (वात शमन)
हेमंत व शिशिर (हिवाळा) – अभ्यंगन
ज्यांना शारीरिक-मानसिक थकवा जाणवतो
नियमित डिटॉक्स करायचा असेल
स्थूलता, अपचन, पचनतंत्रातील विकार, त्वचा किंवा सांधेदुखीचे त्रास असलेले
आयुर्वेद उपचारात विश्वास असलेले
प्रौढ व ज्येष्ठ नागरिक (वैद्यांच्या सल्ल्याने)
गर्भवती महिला, लहान मुले, खूप अशक्त किंवा रुग्णावस्थेत असलेले व्यक्तींनी वैद्यांच्या सल्ल्याशिवाय पंचकर्म करू नये.
शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकते
पचनक्रिया सुधारते
वजन कमी होण्यास मदत
ताजेतवानेपणा आणि मानसिक स्थैर्य
त्वचा व केसांचे आरोग्य सुधारते
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
पंचकर्म हा शरीराच्या सर्वांगीण आरोग्यासाठी एक शास्त्रशुद्ध आणि नैसर्गिक उपाय आहे. नियमित अंतराने हे उपचार केल्यास शरीर सुदृढ आणि चैतन्यशील राहते. मात्र, हे उपचार नेहमी अनुभवी आणि पात्र आयुर्वेदिक वैद्यांच्या देखरेखीखालीच करावेत.
“आजकाल अनेकजण पंचकर्म फक्त वजन कमी करण्यासाठी किंवा शरीरातील घाण बाहेर काढण्यासाठी डिटॉक्स करतात. पंचकर्म म्हणजे केवळ शरीराची शुद्धी नाही, तर ‘सत्त्वशुद्धी’ म्हणजेच आपल्या मनातील आणि भावनांमधील नकारात्मकता बाहेर काढण्याचा हा एक मार्ग आहे. यामध्ये केवळ पाच मुख्य उपचार नसतात, तर त्याआधी ‘पूर्वकर्म’ उदा. तेलाने मालिश करणे, वाफेने घाम काढणे आणि उपचारानंतर ‘उत्तरकर्म’ उदा. योग्य आहार आणि जीवनशैलीचे पालन हे सर्व टप्पे योग्य पद्धतीने पूर्ण केल्यास पंचकर्माचा फायदा आयुष्यभर टिकतो.” “पंचकर्मानंतर केवळ शरीरच सुधारत नाही, तर व्यक्तीच्या मनाची एकाग्रता, झोपेची गुणवत्ता, स्मरणशक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमताही वाढते. ही प्रक्रिया म्हणजे शरीराला ‘रिबूट’ करण्यासारखी आहे, ज्यामुळे आपली संपूर्ण सिस्टीम पुन्हा सुरळीतपणे काम करू लागते.”
वैद्य अशुतोश जेरे MD आयुर्वेद, कोल्हापूर